पंतप्रधान कार्यालय
प्रधानमंत्री किसान योजना आणि इतर योजनांच्या शुभारंभप्रसंगी गोरखपूर उत्तरप्रदेश येथे पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
24 FEB 2019 6:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2019
जय जवान जय किसान
जय जवान जय किसान
जय जवान जय किसान
व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि गोरखपूरमध्ये मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या प्रिय शेतकरी बंधू आणि भगिनींनो.... तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशभरातून जोडल्या गेलेल्या शेतकरी बंधू आणि भगिनींचे मी पुन्हा एकदा स्वागत करतो.
आज गोरखनाथांच्या ह्या कार्यक्रमातून, गोरखपूरच्या धरतीवर होत असेलल्या ह्या कार्यक्रमात हिंदुस्थानातील दोन लाख गावांच्या सामायिक सेवा केंद्रातून शेकडो शेतकरी उपस्थित आहेत आणि ह्या प्रसंगाचे साक्षीदार झाले आहेत, नव्हे सहभागी झाले आहेत.
मित्रांनो, बाबा गोरखनाथ यांच्या भूमीत आपल्याला भेटण्याचे सौभाग्य मला अनेकदा प्राप्त झाले आहे, पण आजचा दिवस देशाच्या इतिहासात नोंदला जाईल. आजचा दिवस सामान्य दिवस नाही. लाल बहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसान हा नारा दिला होता. तो मंत्र आज इतक्या वर्षांनी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत, शेतकऱ्यांच्या घरात, शेतकऱ्यांच्या खिशापर्यंत पोहोचविण्याचे जर काम होत आहे, ते आजच्या पवित्र दिवशी होत आहे.
स्वातंत्र्यानंतरची शेतकऱ्यांसाठीची ही सर्वात मोठी योजना आज उत्तर प्रदेशच्या पवित्र भूमीतून माझ्या देशाच्या कोटी कोटी शेतकरी बंधू आणि भगिनींच्या आशीर्वादाने सुरु होत आहे. मी गोरखपूरच्या जनतेचे दुहेरी अभिनंदन करतो. कारण ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या शुभारंभाचे साक्षीदार होत आहेत.
बंधू आणि भगिनींनो, आज गोरखपूर आणि पूर्वांचलच्या विकासाच्या जवळ जवळ 10 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले आहे. 10 हजार कोटी रुपये..... आरोग्य, रस्ते, रेल्वे, रोजगार, गॅस या सारख्या क्षेत्रांशी संबंधित योजना, ह्या परिसरातील लोकांचे जीवन सुलभ बनविणार आहेत. यासाठी, मी गोरखपूरसहित पूर्वांचलचे अभिनंदन करतो.
बंधू आणि भगिनींनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या शुभारंभप्रसंगी मी देशभरातील कोट्यवधी शेतकरी कुटुंबांचे अभिनंदन करतो. तसेच कोट्यवधी पशुपालक, दुग्धव्यवसाय करणारे शेतकरी कुटुंब, तसेच मत्स्यपालन आणि कृषीसंलग्न उद्योग करणाऱ्या बंधू भगिनींना, किसान क्रेडीट कार्ड सुविधेशी जोडले गेल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.
मित्रांनो, आधीच्या सरकारांनी शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या गोष्टीच केल्या, कागदावर योजना बनविल्या पण त्यांचा उद्देश शेतकऱ्यांना सबळ करणे नव्हता, तर छोट्या छोट्या गरजांसाठी त्यांना लाचार बनविण्याचा मनसुबा होता, त्यांची शेतकऱ्यांचे भले करण्याची इच्छा कधीच नव्हती, म्हणून ते शेतकऱ्यांसाठी कधीच योग्य निर्णय घेऊ शकले नाहीत.
बंधू आणि भगिनींनो, ही परिस्थिती बदलण्यासाठी 2014 मध्ये आपण भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार बनविण्याची संधी दिलीत. आम्ही शेतकऱ्यांच्या लहान लहान अडचणी समजून घेण्यासोबतच त्यांच्यासमोर असलेल्या मोठ्या आव्हानांचे संपूर्ण निराकरण करण्यावर देखील भर दिला. शेतकऱ्यांना पूर्णपणे सबळ आणि सक्षम बनवणे हे आमचे ध्येय आहे आणि आम्ही त्या दिशेने वाटचाल करत आहोत. देशातील शेतकऱ्यांना, 2022 पर्यंत उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आवश्यक सर्व साधने आणि स्रोत उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमचे सरकार करत आहे.
मित्रांनो, गेल्या साडे चार वर्षांच्या माझ्या प्रयत्नांनी आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी ‘पीएम किसान सन्मान निधी’ आज उत्तर प्रदेशच्या पवित्र भूमीवरून शेतकऱ्यांच्या चरणी अर्पण करतो. थोड्या वेळापूर्वी ह्या योजनेचा पहिला हफ्ता एक कोटी एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे सौभाग्य काही मिनिटांपूर्वी मला मिळाले, ज्याचे आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
मला सांगितलं गेलं आहे कि देशातील 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील शेतकरी ह्यात सामील आहेत. ह्या शेतकऱ्यांच्या खात्यात 2021 कोटी रुपये जमा झाले आहेत. बाकी शेतकऱ्यांना देखील 2000 रुपयांचा पहिला हफ्ता येत्या काही आठवड्यांत मिळेल आणि जवळ जवळ 12 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दोन हजाराचा पहिला हफ्ता जमा होईल.
बंधू आणि भगिनींनो, मी आपल्याला सांगू इच्छितो, ही तर सुरवात आहे. ह्या योजनेत जवळ जवळ 75 हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचणार आहेत. देशातल्या पाच एकर किंवा त्यापेक्षा कमी शेती असणाऱ्या 12 कोटी अल्पभूधारक शेतकऱ्यांना ह्या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. आता शेतकऱ्यांना बियाणे, खत, औषधे खरेदी, विजेचे बील भरणे तसेच शेतीशी संबंधित अश्या अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी त्रास होणार नाही.
केंद्र सरकार तुमच्या खात्यात दर वर्षी सहा हजार रुपये जमा करणार आहे, त्यातून आवश्यक ती सर्व कामे करता येतील. ह्याच कामांसाठी दोन हजार रुपयांचा पहिला हफ्ता आज अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. यातील काही शेतकऱ्यांना थोड्या वेळापूर्वी प्रमाणपत्र देखील दिले आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या शेतकऱ्यांना आज पहिला हफ्ता मिळाला नाही, त्यांच्या खात्यात ही रक्कम येत्या काही आठवड्यात जमा होईल.
बंधू आणि भगिनींनो, पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत जे पैसे शेतकऱ्यांना दिले जातील, त्यातील पै न पै, केंद्रात असलेल्या मोदी सरकारतर्फे दिली जाईल. राज्य सरकारांना काहीच करावं लागणार नाही. फक्त प्रामाणिकपणे आपआपल्या राज्यातील शेतकऱ्यांची यादी बनवायची आहे. आणि ती लगेच आम्हाला पाठवायची आहे. जर जितकी लवकर हि यादी मिळेल आणि मी उत्तर प्रदेश सरकारचे, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, उत्तराखंड सरकारचे अश्या अनेक सरकारांचे मनापासून अभिनंदन करतो....त्यांनी ह्या कामाला प्राधान्य दिले पण काही सरकारे अशी आहेत जी अजून झोपली आहेत. त्यांना वाटते की ते ह्यावर राजकारण करू शकतील.
मला या सरकारांना सांगायचे आहे की जर तुम्ही तुमच्या राज्यातल्या शेतकऱ्यांची यादी वेळेत केंद्र सरकारकडे पोहचवली नाही आणि जर ते या योजनेच्या लाभांपासून वंचित राहिले, तर या शेतकऱ्यांचे शिव्याशाप, तुमच्या या संकुचित राजकारणाला उद्ध्वस्त करतील. तुमचे विरोधी पक्षाचे सरकार असू शकेल, मात्र शेतकरी तर या देशाचाच असतो. तुमच्या राजकारणासाठी त्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा करु नका.
बंधू आणि भगिनींनो, मी तुम्हाला आणखी एक विनंती करतो की या योजनेसंदर्भात कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. आमच्या विरोधकांनी, या महाभेसळयुक्त लोकांनी जेव्हा संसदेत या योजनेची घोषणा ऐकली, तेव्हा त्यांचे चेहरे एकदम उतरले, तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवर पहिलेच असेल. त्यांना वाटले, सगळे शेतकरी आता मोदी मोदी करतील. आणि म्हणूनच, आता खोटे बोलत आहेत. त्यांनी अफवांचे पिक काढले आहे. शेतकऱ्यांनी हा कावा समजून घ्यायला हवा. ते म्हणताहेत- मोदी आता दोन हजार रुपये देत आहेत, नंतरचे दोन हप्ते पण देतील. मात्र वर्षभरानंतर मोदी हे सगळे पैसे तुमच्याकडून परत घेईल.....
माझ्या शेतकरी बंधू-भगिनींनो,हे जे पैसे तुम्हाला दिले जात आहेत, ते तुमच्या हक्काचे आहेत आणि कोणीही ते तुमच्याकडून परत घेऊ शकत नाही. न मोदी घेऊ शकत आणि ना राज्यातले कुठलेही सरकार तुमच्याकडून हे पैसे परत घेऊ शकत. आणि म्हणूनच, अशा अफवा पसरवणाऱ्या लोकांना तुम्ही चोख प्रत्युत्तर द्या.
माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, जेव्हा केंद्रात शेतकऱ्यांचे हित बघणारे, त्यांची काळजी करणारे सरकार असते, तेव्हाच अशा योजना प्रत्यक्षात अस्तित्वात येऊ शकतात. अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात. आता हा फरक तुम्ही समजून घ्यायला हवा आणि गावागावातल्या शेतकऱ्यांना समजावून सांगायला हवा. मला विश्वास आहे की तुम्ही हे सगळ्यांना सांगाल. खोट्या गोष्टी, अफवा पसरवणाऱ्या लोकांना चोख उत्तर द्याल. मी तुम्हाला सांगतो, हे काँग्रेसचे लोक, ही भेसळ असलेली महाआघाडी सगळे लोक सारखेच आहेत. काँग्रेस असो, सपा असो की बसपा, ह्या सगळ्यांना केवळ निवडणूकांच्या काळात फक्त शेतकऱ्यांची आठवण येते. आणि तेव्हा यांना कर्जमाफीचा ज्वर चढू लागतो. फक्त निवडणुकीच्या काळात कर्जमाफीच्या रेवड्या शेतकऱ्यांच्या हातावर ठेवत, मते मिळवण्याची चलाखी यांनी चांगलीच आत्मसात केली आहे. पण त्यांना लक्षात आले नाही की त्यांचा सामना मोदीशी आहे, आणि असले प्रकार त्यांना महागात पडतील. त्यांची ही चलाखी मी उघडी पाडेन. त्यांचे खोटे जगापुढे आणेन. शेतकऱ्याची खरी सेवा काय असते,मोदी त्यांना दाखवून देईल. आणि म्हणूनच तुम्ही बघितले असेल, संसदेत त्यांचे चेहरे कसे पडले होते. आम्ही केवळ निवडणुकीसाठी ही घोषणा केलेली नाही, आमची भावना प्रामाणिक आहे म्हणूनच आम्ही संसदेत हे बोललो आहोत आणि अर्थसंकल्पात त्यासाठी निधीची तरतूद देखील केली आहे. ह्यातूनच आमची प्रामाणिक भूमिका सिद्ध होते.
आपल्याला आठवत असेल, वर्ष 2008 मध्ये शेतकर्यांवर सहा लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. तेव्हाच्या सरकारने निवडणुकांच्या आधी कर्जमाफीची घोषणा केली, त्यामुळे मग शेतकऱ्याचे सहा लाख रुपयांचे कर्ज माफ व्हायला हवे होते, नाही का मित्रांनो? 2009 मध्ये निवडणुका झाल्या. पुन्हा ते सत्तेवर आले. पुन्हा रिमोट कंट्रोल सुरु झाला. आणि पुढे कर्जमाफीचे काय झाले? देशात कोणालाच माहित नाही, सगळे अंधारात.... आकडा लक्षात आहे ना? सहा लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यापैकी फक्त 52 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. मला सांगा अशी खोटी आश्वासने देणाऱ्या लोकांवर देशातला शेतकरी विश्वास ठेवेल का? असे खोटे बोलणाऱ्या लोकांना शिक्षा मिळायला हवी की नको? आणि मित्रांनो, मोठा गाजावाजा करुन त्यांनी ही कर्जमाफीची यादी बनवली आणि 52 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, त्यातही अनेक लोक शेतकरी नव्हतेच. फक्त 12-13 कोटी शेतकऱ्यांपैकी फक्त 2 ते 3 कोटी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली त्यातही 35 लाख शेतकरी नव्हतेच!ज्यांचा शेतीशी काहीही संबंध नाही, अशा लोकांची त्या यादीत नावे होती. बघा मित्रांनो, इतका मोठा घोटाळा... अशा लोकांना आपण माफ करु शकता का? बंधू भगिनिनो, त्यांनी दहा वर्षात 52 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. मात्र आम्ही जी योजना आणली आहे, ती एका वर्षासाठी नाही, तर प्रत्येक वर्षासाठी आहे. दरवर्षी, वर्षातून तीन हप्त्यात, सरकारी तिजोरीतून 75 हजार कोटी रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. त्यांनी दहा वर्षात 52 हजार कोटी रुपये दिले. आम्ही दहा वर्षात शेतकऱ्यांना साडे सात लाख कोटी रुपये देणार आहोत. कोणी दलाल नाही, कोणी मध्यस्थ नाही. जाती, धर्म, माझे-तुझे, अशा कोणत्याही आधारावर भेदभाव केला जाणार नाही. 5 एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात थेट हे पैसे जमा होणार आहेत.
बंधू-भगिनीनो, यांची ही योजना, दहा वर्षात एकदा मते गोळा करण्यासाठी फक्त शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकणारी योजना होती. एखाद्या गावात जर शंभर शेतकरी असतील, तर त्यांच्यापैकी फक्त 20 जणांनाच त्याचा लाभ मिळू शकला. कुठे 22 तर कुठे 25 जणांना! आमची योजना अशी आहे की ज्यातून 12 कोटी शेतकर्याना थेट लाभ मिळणार आणि दरवर्षी मिळणार. जर आपण शंभर शेतकऱ्यांचा हिशेब धरला, तर त्यापैकी 90 जणांना हा लाभ मिळेल. शेतकऱ्यांना थेट पैसे देऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठी गुंतवणूक आमचे सरकार करत आहे.
मित्रांनो, आधीच्या सरकारप्रमाणेच कर्जमाफीचा निर्णय घेणे आमच्या सरकारसाठी खूप सोपे होते. काहीच कठीण नव्हते. आम्ही अशाच रेवड्या वाटल्या असत्या, आणि निवडणुकीत मतांचे राजकारण केले असते. मात्र असे पाप मोदी कधीही करत नाही. असे पाप करण्याचा विचारही आमच्या मनात येत नाही.
तुम्ही विचार करा, आमचे सरकार, पंतप्रधान कृषी सिंचन योजनेवर सुमारे एक लाख कोटी रुपये खर्च करत आहे. इतकी मोठी रक्कम आम्ही त्यात गुंतवली आहे. कारण देशातल्या ज्या सिंचन योजना तीस-चाळीस वर्षांपासून रखडल्या होत्या, त्या पूर्ण करण्याला आम्ही प्राधान्य दिले आहे. आम्ही देशभरातल्या अशा 99 योजना निवडल्या आहेत, ज्यातल्या 70 पेक्षा अधिक योजना पूर्ण होण्याच्या स्थितीत आहेत. या योजनांमुळे शेतकऱ्यांना लाखो हेक्टर जमिनीवर सिंचनाच्या सुविधा मिळत आहेत. हे तर असे काम आहे, ज्याचा लाभ शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढ्यांनाही मिळणार आहे.
मित्रांनो या सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी कुठेही शेतकऱ्यांना एकही मोर्चा काढावा लागला नाही, कोणताही दबाव नव्हता. सिंचन योजना पूर्ण न करता, कर्जमाफी देणे हा आमच्यासाठी खूप सोपा उपाय होता. मात्र खरे तर कर्जमाफीचा लाभ फक्त वरवर काहीच शेतकऱ्यांना मिळतो. खरा फायदा दलालांना मिळतो. असे शेतकरी, ज्यांनी कोणत्या तरी बँकेतून कर्ज घेतले आहे, त्यांनाच फक्त या कर्जमाफीचा लाभ मिळतो. मात्र असे कोट्यावधी शेतकरी आहेत, जे बँकेतून नाही तर आणखी कुठून खाजगी कर्ज घेतात, त्यांचा विचार कोण करणार?
माझ्या शेतकरी बंधू-भगिनींनो, हा नवा भारत आहे. यात केंद्र सरकार जेवढा पैसा कुठल्या गरिबाला, कुठल्या शेतकऱ्याला देते, तो सगळा पैसा थेट त्यांच्या खात्यात पोचतो आहे. आता ते दिवस गेले जेव्हा केंद्र सरकारकडून एक रुपया निघत असे आणि त्यातले फक्त 15 पैसे लोकांपर्यंत पोहोचत, मध्येच कोणीतरी 85 पैशांवर डल्ला मारत असे.
तुमच्या हक्काचे पैसे तुमच्याकडून कुणीही हिरावून घेणार नाही, अशी व्यवस्था केली आहे. जर तुमच्याकडे आधार क्रमांक नसेल, तर तुम्हाला कुठल्याही योजनेत मध्यस्थीला स्थान नाही, यासाठी तुम्ही प्रथम आधार क्रमांकासाठी अर्ज करायला हवा. म्हणजे खाते उघडल्यानंतर जनधन योजनेचा पैसा प्रत्यक्षपणे तुमच्या खात्यात जमा होईल व कुठल्याही दलालाच्या हाती पडणार नाही.
मित्रांनो, ही गोष्ट तुम्ही जरा समजून घ्या आणि आपल्या मित्रांनाही सांगा. कारण हाच प्रामाणिकपणाचा मार्ग आहे. या योजनेतील सगळ्या लाभार्थ्यांची यादी आधी ग्रामपंचायतीत जाहीर केली जाईल. आणि नंतर ती यादी प्रधानमंत्री शेतकरी योजनेच्या पोर्टलवर अपलोड केली जाईल. संपूर्ण पारदर्शकता असेल. जर तुम्हाला वाटले की तुम्ही या योजनेचे लाभार्थी आहात मात्र यादीत तुमचे नाव नाही, तर तुम्ही तुमच्या ब्लॉकमधील पंचायत समिती किंवा जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधू शकता,
बंधू आणि भगिनींनो, आमचे सरकार एक नवा दृष्टीकोन घेऊन बियाणांपासून बाजारापर्यत, शेतकीपासून सिंचनापर्यत, व्यवस्था निर्माण करत आहे. आधी लोकांना ज्या गोष्टी अशक्य वाटत असत, त्या गोष्टी आम्ही साध्य केल्या आहेत. गेल्या साडे चार वर्षात सरकारने दोन टप्प्यात 17 कोटींपेक्षा जास्त मृदा आरोग्य कार्ड वितरीत केली आहेत. युरियावर शंभर टक्के कडुलिंबाचे आवरण लावण्याचा निर्णय घेऊन आम्ही खतांचा काळाबाजार थांबवला आहे. उत्तम दर्जाची बियाणे विकसित करण्यासाठी आम्ही संशोधनाला प्रोत्साहन देत आहोत.
मित्रांनो, शेतीवर होणारा खर्च कमी करण्यासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पादनांना योग्य किंमत मिळावी यासाठीही आम्ही प्रयत्न करत आहोत. आमच्याच सरकारने कृषीमालावरील हमीभाव वाढवण्याची वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली मागणी पूर्ण केली. रबी आणि खरिपाच्या 22 पिकांच्या हमी मूल्यात आम्ही दीड पट वाढ केली आहे.
बंधू आणि भगिनीनो, आज जे शेतकऱ्यांच्या नावावर नक्राश्रू ढाळताहेत, त्यांच्याकडे 2007 पासून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसींची फाईल पडली होती. ती त्यांनी दाबून ठेवली. जर 2007 मध्येच त्यांनी निर्णय घेतला असता, तर आज माझ्या देशातला शेतकरी कर्जदार झाला नसता. हे त्यांचे पाप आहे, त्यांची बेईमानी आहे, ज्यामुळे माझ्या देशातला शेतकरी आज या अवस्थेला पोहोचला आहे.
बंधू आणि भगिनींनो, नैसर्गिक संकटांचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना तयार करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या कृषीमालाला योग्य किंमत मिळावी यासाठी, ई-नाम ह्या ऑनलाईन बाजारपेठांशी त्यांना जोडले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना देशभरातील कोणत्याही बाजारपेठेत आपला माल विकण्याचा पर्याय मिळणार आहे. यामुळे कोणी दलाल या किमती कमी-जास्त करु शकणार नाही. एक-दोन वर्षात हि व्यवस्था मोठ्या प्रमाणात विस्तारली जाईल.
मित्रांनो, शेतकऱ्यांना आपले उत्पन्न दुपटीने वाढवता यावे, यासाठी सरकार शेतीच्या पारंपरिक पद्धतींशिवाय, इतर पर्यायांनाही प्रोत्साहन देत आहे. जसे मधमाशीपालन, सेंद्रिय शेती, रेशीम उत्पादन, सोला फार्मिंग सारख्या नव्या क्षेत्रांना आम्ही शेतकऱ्यांपर्यत पोहोचवत आहोत. त्याशिवाय, पशुपालन आणि मत्स्यपालनाला चालना देण्यासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरु आहेत.
बंधू आणि भागिंनीनो, शेती असो किंवा इतर व्यवसाय, या सर्वांचा विसतार करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेण्याची सुविधा देखील आम्ही अतिशय सोपी केली आहे. याचमुळे गेल्या वर्षी 11 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे कृषीकर्ज शेतकऱ्यांना दिले गेले आहे.
मित्रांनो, शेतकरी बंधू आणि भगिनींना सहज कर्ज मिळावे, यासाठी आम्ही आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. आधी किसान क्रेडीट कार्डच्या माध्यमातून फक्त एक लाख रुपयांपर्यंतच कर्ज विनातारण दिले जात होते, आता आम्ही त्याची मर्यादा वाढवली आहे, आता आमच्या शेतकरी बंधूंना क्रेडीट कार्डच्या माध्यमातून एक लाख 60 हजार रुपयांपर्यतचे कर्ज विना तारण मिळू शकेल.
आजपासूनच किसान क्रेडीट कार्ड सुविधा आमच्या दुधउत्पादक आणी मत्स्यपालकांसाठी देखील सुरु करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे क्रेडीट कार्ड नाही, त्यांना पशुपालन आणि मत्स्यव्यवसायासाठी दोन लाख रुपयांची सीमा असलेले क्रेडीट कार्ड बँकेकडून मिळणार आहे. यामुळे, या दोन्ही क्षेत्रात निधीची उपलब्धता वाढेल आणि आमचे पशुपालक आणि मच्छीमारांना कर्ज घेण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही. मत्स्यपालनाशी संबंधित प्रत्येक पैलूकडे नीट लक्ष देण्यासाठी यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात आम्ही एक वेगळा विभाग स्थापन करण्याची घोषणा देखील केली आहे.
तुम्हाला माहित असेल, आपला देश स्वतंत्र झाला मात्र, आदिवासींसाठी वेगळे मंत्रालय नव्हते. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार आले आणि त्यांनी आदिवासींसाठी वेगळे मंत्रालय निर्माण केले. देश स्वतंत्र होऊनही ईशान्य भारताच्या विकासासाठी कोणतेही मंत्रालय नव्हते. हे अटलबिहारी वाजपेयी यांचेच सरकार होते ज्यांनी ईंशान्य भारतासाठी नवे मंत्रालय बनवले. आणि आता पुन्हा एकदा भाजपाचे सरकार आले आहे. देशाच्या समुद्र किनाऱ्यावर, नदीकिनाऱ्यावर आमचे जे मच्छीमार बंधू-भगिनी राहतात, त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या कल्याणासाठी मासेमारी क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी वेगळे मंत्रालय निर्माण करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, ज्यामुळे त्यांच्या विकासाकडे विशेष लक्ष देता येईल.
मित्रांनो, यासोबतच एक व्यवस्था अशीही केली गेली आहे की आता नैसर्गिक आपत्तींचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना कृषी कर्ज फेडण्याची कालमर्यादा एक वर्षांनी वाढवून तीन से पाच वर्ष करण्यात आली आहे. यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना आता कोणाकडेही कर्ज घेण्यासाठी जावे लागणार नाही. त्यांना वेळ मिळेल आणि जर शेतकऱ्याने या कालावधीत आपल्या कर्जाची परतफेड केली तर त्यांना व्याजदरात तीन टक्क्यांची सवलत देखील मिळणार आहे.
बंधू आणि भगिनीनो, गोरखपूर आणि पूर्वांचल मधल्या पशुपालकांसाठी आणि दुधउत्पादकांसाठी तर आज दुहेरी आनंदाचा दिवस आहे. कारण आजच दररोज एक लाख लिटर दुधाची क्षमता असलेल्या नव्या डेअरीचे लोकार्पण करण्यात आले आहे. सुमारे 50 हजार दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना या डेअरीचा थेट लाभ मिळणार आहे त्याशिवाय रोजगाराच्या अनेक संधीही निर्माण होणार आहेत.
बंधू आणि भगिनींनो, पशु पालकांसाठी आणखी एक चांगली बातमी आहे. मित्रांनो...... आमच्या सरकारने देशी गायी – म्हशी पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी मागच्या वर्षी राष्ट्रीय गोकुळ मिशन सुरु केले आहे. ह्या वर्षी त्याचा विस्तार करून राष्ट्रीय कामधेनु आयोग सुरु केला आहे. हा आयोग पशुधनाशी संबंधित कायदे, नीती यांचा अभ्यास करेल आणि दुधाचे उत्पादन वाढविण्याचे उपाय सुचवेल. हा आयोग एक महत्वाचं काम करेल ते म्हणजे देशभरातील गोशाळा आणि गो सदन यांची माहिती घेऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करेल.
मित्रांनो, ह्या प्रकारची एक मोठी योजना..... ही योजना माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, देशभरातील शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मी आता आणखी एका योजनेबद्दल सांगणार आहे. ही पण आपल्या मोठ्या फायद्याची आहे. आम्ही एक नवीन योजना सुरु केली आहे. शेतकरी उर्जा आणि प्रगती अभियान ही योजना ह्याच आठवड्यात मंजूर करण्यात आली आहे. ह्या योजनेत 17 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना सौर पंप दिले जातील. ह्यामुळे सिंचनावर होणारा विजेचा खर्च असो, कि डीझेलचा, यापासून मुक्ती मिळेल.
याशीवाय 10 लाख सौर पंपांना विजेच्या ग्रीडशी जोडण्यासाठी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. ह्यामुळे ते मोफत सिंचन तर करूच शकतील, आणि जर जास्तीची सौर उर्जा तयार झाली तर ती सरकारला विकून माझे शेतकरी पैसे देखील मिळवू शकतील. ह्याप्रमाणे, शेतकऱ्यांच्या ओसाड जमिनीवर 500 किलो वॅट पासून दोन मेगा वॅट पर्यंत वीज उत्पादन करू शकणारे सौर प्लांट बसविण्याची योजना आहे. अन्नदात्याला वीज दाता बनविण्याचे हे व्यापक अभियान आहे. माझा शेतकरी अन्न दाता तर आहेच, आता तो वीज दाता देखील होईल.
मित्रांनो, आमचे सरकार आदिवासी बंधू आणि भगिनींचे उत्पन्न वाढविण्यास कटिबध्द आहे. आदिवासी शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी वनधन योजना लागू करण्यात आली आहे. ह्या योजने अंतर्गत वन उत्पादनांनायोग्य बाजारभाव मिळवून देण्यासाठी वनधन केंद्र सुरु करण्यात आले आहेत. वन उत्पादनांचा हमी भाव गेल्या साडे चार वर्षात तीन वेळा वाढविण्यात आला आहे. डिसेंबरमध्येच 23 वन उत्पादनांचे हमी भाव वाढविण्यात आले आहेत. इतकंच नाही, तर ह्या काळात हमी भाव देण्यात येणाऱ्या पिकांची संख्या देखील वाढविण्यात आली आहे. साडे चार वर्षापूर्वी दहा वन उत्पादनांना हमी भाव मिळत असे, ही संख्या वाढवून आता जवळजवळ 50 वन उत्पादनांना हमी भाव देण्यात येत आहे.
माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, सरकारने विशेषतः जंगलात राहणाऱ्या लोकांसाठी बांबूशी संबंधित कायद्यात मोठे बदल केले आहेत. आता तुम्ही शेतात देखील बांबूचे उत्पादन करू शकता आणि तो विकून आपले उत्पन्न वाढवू शकता. आधी हे शक्य नव्हतं. कारण पूर्वी बांबू वृक्षांच्या श्रेणीत होता. हा निर्णय फक्त बांबू शेतीपुरताच मर्यादित नाही, तर ह्याला व्यापक बाजारपेठ मिळवून देण्याचेही प्रयत्न सुरु आहेत.
मित्रांनो, शेती बरोबरच खेडी आणि शेतकऱ्यांच्या प्रत्येक गरजांवर देखील सरकारचे लक्ष आहे. गोरखपूरमध्ये खत कारखाना उभारण्याचे काम जोरात सुरु आहे. हा कारखाना पुन्हा एकदा ह्या शहराची ओळख बनणारा आहे. ह्यामुळे शेतकऱ्यांना पुरेसा युरिया तर उपलब्ध होईलच, तो देखील कमी खर्चात.
बंधू आणि भगिनींनो, पूर्वांचल, जिथे ही सभा होत आहे, ते संपूर्ण क्षेत्र संक्रमणाच्या अभूतपूर्व काळातून मार्गक्रमण करत आहे. उद्योग व्यवसाय असोत, दळणवळण वा संपर्क यंत्रणा असो, किंवा आरोग्य सुविधा. बदल ठळकपणे जाणवतो आहे. आरोग्य क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली आहे. त्यात म्हटलं की, एनसेफालायटीसमुळे होणाऱ्या बाल मृत्यू प्रमाणात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.
मित्रांनो, गोरखपूरसह पूर्वांचलमध्ये स्वच्छ इंधन आणि गॅस आधारीत अर्थव्यवस्था विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आधीपासूनच सुरु आहे. प्रधानमंत्री ऊर्जा गंगा योजनेच्या आधी इथले खताचे कारखाने आणि घरांमध्ये गॅस पाईपलाईन पोहचवण्याचे काम झाले आहे. आज 9 हजार कोटी रुपयांच्या आणखी एका गॅस प्रकल्पाचे भूमिपूजन केले गेले.
बंधू आणि भगिनींनो, ह्या सर्व योजना आणि प्रकल्प म्हणजे आमच्या 'सबका साथ, सबका विकास' ह्या मंत्राचे प्रत्यक्ष उदाहरणच आहे. गेल्या साडे चार वर्षात केंद्र सरकारने याच मंत्रानुसार वाटचाल करत देशात जनकल्याण आणि विकासाचा नवा प्रवाह आणला आहे. मग ती प्रधानमंत्री आवास योजना असो, उज्ज्वला योजना असो,सौभाग्य योजना असो किंवा मग आयुष्यमान भारत योजना असो, अशा सर्व योजनांच्या लाभार्थ्यांची निवड अतिशय शास्त्रीय पद्धतीने केली जात आहे.
व्यक्ती कोणत्याही जातीची असो, कुठल्याही वर्गाची, संप्रदाय किंवा धर्माची असो, त्याला आमच्या सरकारच्या योजनांचे लाभ निश्चित मिळणार. कोणाच्या सांगण्याने, शिफारशीने कोणाचे नाव घालणे किंवा यादीतून वगळणे असले प्रकार आता बंद झाले आहेत. त्याशिवाय, जनधन, आधार आणि मोबाईल या आधुनिक त्रिसूत्रीमुळे बनावट लाभार्थी आणि दलाल असणारी व्यवस्था पूर्णपणे संपवण्यात आली आहे. हेच कारण आहे की देशातील आणि जगातल्या सर्व सर्वेक्षणामध्ये सांगताहेत की भारत भीषण दारिद्र्याच्या स्थितीतून झपाट्याने बाहेर निघतोय.
मित्रांनो, हे सगळं कशामुळे शक्य होतंय ? काय कारण आहे की इतकी सगळी कामे झपाट्याने होत आहेत ? मोदीमुळे नाही, तर तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालं आहे. कारण 2014 साली तुम्ही उत्तरप्रदेशच्या लोकांनी देशात एक मजबूत सरकार दिले. एक मजबूत सरकार बनवण्यासाठी जनादेश दिला, त्यामुळेच ही सगळी कामे शक्य झाली आहेत. गरिबांच्या हितासाठी आमचे सरकार यासाठी लढा देऊ शकत आहे कारण तुम्ही त्या सरकारला भक्कम बहुमत दिले आहे. आणि असे निर्णय घेण्याची ताकद तुम्ही मला दिली आहे. ही ताकद अशीच कायम राहावी, तुम्हा सर्वांचा आशीर्वाद असाच माझ्यावर असावा, अशी इच्छा व्यक्त करत या महत्वपूर्ण योजनेच्या लोकार्पण प्रसंगी मी आपले मस्तक झुकवून तुम्हा सर्वांना नमन करतो. तुमचे अभिनंदन करतो.किसान सन्मान निधीचा लाभ सर्व 12 कोटी शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावा, दरवर्षी मिळावा याच कामनेसह मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो.
आपल्या हाताच्या दोन्ही मुठी बंद करून माझ्यासोबत जोरात म्हणा-
भारत माता की जय
भारत माता की जय
भारत माता की जय
खूप खूप धन्यवाद!
B.Gokhale/R.Aghor/D. Rane
(Release ID: 1566538)
Visitor Counter : 305