पंतप्रधान कार्यालय

सेऊल शांतता पुरस्कार स्वीकारतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 22 FEB 2019 2:46PM by PIB Mumbai

 

सेऊल शांतता पुरस्कार सांस्कृतिक फाउंडेशनचे अध्यक्ष, श्री क्वॉन इ ह्योक,

दक्षिण कोरियाच्या संसदेचे सभापती, मून ही-सांग,

कोरियाचे सांस्कृतिक मंत्री, डो जोंग-वान,

संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी सरचिटणीस, श्री बाण कि मून,

सेऊल शांतता पुरस्कार सांस्कृतिक फाउंडेशनचे इतर सदस्य,

उपस्थित मान्यवर,

बंधू आणि भागिनीनो,

मित्रांनो, नमस्कार !

आन्योंग

हा-सेयो

योरा-बुन्न

सर्वांना शुभेच्छा !

सेऊल शांतता पुरस्कार देऊन आज इथे माझा जो सत्कार करण्यात आला, हा मोठाच गौरव मी समजतो, मात्र हा माझा सन्मान नसून, भारतातील जनतेचा सन्मान आहे. भारताने, भारतातील कोट्यावधी जनतेने एकदिलाने एक लक्ष्य गाठण्यासाठी आपले कौशल्य आणि ताकद यांच्या बळावर पाच वर्षांपेक्षा कमी काळात मिळवलेल्या यशाचा हा गौरव आहे. आणि म्हणूनच, माझ्या या जनतेच्या वतीने मी विनम्रतापूर्वक हा पुरस्कार स्वीकारतो आणि माझी कृतज्ञता व्यक्त करतो.

भारताने जगाला दिलेल्या ‘वसुधैव कुटुंबकम’ हा संदेश देणाऱ्या तत्वज्ञानाला मिळालेली ही पावती आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणजे, सगळे जग हे एकच कुटुंब आहे. प्रत्यक्ष युद्धभूमीवर शांततेचा संदेश देणाऱ्या भारतीय संस्कृतीचा हा गौरव आहे. याच भूमीत भगवान कृष्णाने महाभारताच्या युद्धभूमीवर अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. याच भूमीवर आम्हाला दीक्षा मिळाली-

ॐ द्यौ: शान्तिरन्तरिक्षं शान्ति, पृथ्वी शान्तिराप: शान्तिरोषधय: शान्ति:।

वनस्पतय: शान्तिर्विश्वे देवा: शान्तिर्ब्रह्म शान्ति,सर्वँ शान्ति:, शान्तिरेव शान्ति, सा मा शान्तिरेधि॥

ॐ शान्ति: शान्ति: शान्ति:॥

याचा अर्थ,

समग्र अवकाशात सगळीकडे शांतता नांदो,

आपल्या सगळ्या वसुंधरेवर शांतता नांदो, निसर्गात शांतता नांदो,

अवघ्या सृष्टीत चिरकाल सुखशांती वसो!

ज्यांनी कायम आपल्या वैयक्तिक सुखापेक्षा समाजाचे सुख आणि हित महत्वाचे मानले अशा सर्वांसाठी हा पुरस्कार आहे. यंदा आपण सगळे महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी करत आहोत, अशा वर्षात हा पुरस्कार मला मिळाला, ही माझ्यासाठी विशेष गौरवाची बाब आहे. आज इथे या पुरस्कारासोबत मिळालेली एक कोटी तीस लाख रुपयांची रक्कम मी ‘नमामि गंगे’ अभियानासाठी देतो आहे. गंगा नदी, जी आमच्या देशातली केवळ एक पवित्र नदीच नाही, तर माझ्या लाखो देशबांधव आणि भगिनींसाठी जीवन जगण्याचे साधन आहे, खऱ्या अर्थाने जीवनवाहिनी आहे.

मित्रांनो,

सेऊल येथे 1988 साली झालेल्या 24 व्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धांचे यश आणि त्या स्पर्धेमागची भावना याचे प्रतिक म्हणून तेव्हापासून सेऊल शांतता पुरस्कार दिला जातो. ही स्पर्धा भारतालाही चांगलीच लक्षात आहे, कारण त्यांची सांगता गांधीजयंतीच्या दिवशी झाली होती. या स्पर्धांच्या निमित्ताने जगाला कोरियाच्या संस्कृतीचे, कोरियाच्या आदरातिथ्याचे आणि कोरियाच्या यशस्वी अर्थव्यवस्थेचे सर्वोत्तम दर्शन घडले होते. या स्पर्धेच्या निमित्ताने कोरिया जगातील क्रीडाविश्वात एक उद्योन्मुख तारा म्हणून उदयास आला होता, हे ही आपल्याला विसरून चालणार नाही. मात्र याही पलिकडे जागतिक इतिहासात या स्पर्धेचे आणखी वेगळे महत्व आहे. 1988 ह्या वर्षात, म्हणजे या स्पर्धा झाल्या त्यावेळी जगाच्या पटलावर अनेक महत्वाच्या घडामोडी घडत होत्या. ईराण-ईराक युध्द नुकतेच संपले होते. त्याच वर्षाच्या सुरुवातीला अफगाणिस्तान मधील स्थितीबाबतच्या जिनेव्हा करारवर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. शीतयुद्ध अखेरच्या टप्प्यात होते आणि जगात नव्या सोनेरी पहाटेची चाहूल लागली होती, आणि काही काळासाठी तो सुवर्णकाळ आलाही!

मात्र 1988 साली जग जसे होते, त्यापेक्षा आज कितीतरी चांगले आहे, कारण जागतिक स्तरावर दारिद्रयाचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात प्रगती होत आहे. मात्र तरीही, अद्याप जगासमोर अनेक आव्हाने कायम आहेत. काही जुनी, तर काही नव्याने निर्माण झाली आहेत. सेऊल ऑलिम्पिकच्या काही महिने आधी जगात पहिल्यांदाच हवामान बदलाविषयी सार्वजनिक चिंता व्यक्त करण्यात आली होती. आज हवामान बदल आणि जगातिक तापमानवाढ हे मानवतेसमोरचे एक भीषण संकट म्हणून ओळखले जाते. सेऊल ऑलिम्पिकच्याच काही आठवडे आधी, अल-कायदा ही संघटना स्थापन झाली होती. आज कट्टरतावाद आणि दहशतवादाने आक्राळविक्राळ जागतिक स्वरूप धारण केले आहे, आणि जागतिक शांतता आणि सुरक्षिततेला सगळ्यात मोठा धोका निर्माण केला जात आहे. आजही जगातील कोट्यवधी लोकांना पुरेसा निवारा आणि खायला पोटभर अन्न मिळत नाही. निवारा, आरोग्य, स्वच्छता, ऊर्जा या सगळ्या मूलभूत गरजा आणि त्यापलिकडे जगण्याची प्रतिष्ठा सर्व नागरिकांना मिळणे आवश्यक आहे. आपल्याला अजून बरेच काही मिळवायचे आहे, हे तर स्पष्ट आहे. आपण जे कष्टप्राय जीवन जगतो आहोत, त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही कठोर परिश्रम हाच आहे! आणि भारत त्यात आपली जबाबदारी पार पडतो आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येचा एक-षष्ठमांश भाग असलेल्या भारतातील सर्वसामान्य माणसाचे जगणे सुसह्य, सुकर,आनंदी बनवण्यासाठी प्रयत्न करतो आहोत.भक्कम आर्थिक संरचनेच्या बळावर आज भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. आम्ही आणलेल्या महत्वाच्या आर्थिक सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल होत आहेत. सरकारने सुरु केलेल्या पथदर्शी योजना, “मेक इन इंडीया, ‘स्कील इंडिया, ‘डिजिटल इंडिया’ ‘स्वच्छ भारत’ यामुळे झालेल्या सामाजिक-आर्थिक सुधारणांचे परिणाम आज दृश्य स्वरूपात समोर येत आहेत. आम्ही आर्थिक समावेशनावर भर दिला आहे. सर्वांना पतपुरवठा उपलब्ध करणे, डिजिटल व्यवहार, शेवटच्या घटकापर्यत वित्तीय सुविधा पोहोचवणे आणि लघु व मध्यम उद्योगांना सहाय्य करणे अशा उपक्रमातून देशभरात विकासाची फळे पोहचवणे आणि सर्वसामान्य माणसाचे जीवनमान उंचावण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत देश स्वच्छ करण्याचे काम जोमाने सुरु आहे. 2014 साली देशभरात सार्वजनिक स्वच्छतेच्या सुविधांचे प्रमाण 38 टक्के एवढे होते, आज हे प्रमाण 98 टक्के झाले आहे. उज्ज्वला योजनेमुळे स्वयंपाकाचा गैस उपलब्ध झाल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांचे जीवन उन्नत होत आहे. आयुष्मान भारत योजनेतून 50 कोटी गरीब आणि वंचित नागरिकांना आरोग्य सुविधा आणि आरोग्यविम्याचे कवच मिळाले आहे. या आणि अशा अनेक उपक्रमातून आम्ही सर्वसमावेशक विकासाकडे वाटचाल करत असून, संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकासाचे उद्दीष्ट गाठण्यासाठी आम्ही भरीव योगदान देत आहोत. आमच्या या सर्व प्रयत्नांमागे महात्मा गांधी यांची शिकवण आम्हाला सतत प्रेरणा देत असते. ते म्हणत- आपण पाहिलेल्या सर्वात गरीब आणि दुर्बल व्यक्तीचा चेहरा डोळ्यांसमोर आणावा आणि स्वतःलाच प्रश्न विचारावा, की आपण करत असलेल्या प्रयत्नांचा लाभ या व्यक्तिपर्यत पोहोचणार आहे की नाही? त्यातून आपल्या कार्याचे फलित आपल्यालाच लक्षात येईल.

 

मित्रांनो,

भारताच्या या यशाचा लाभ केवळ भारतातील जनतेलाच होत आहे, असे नाही तर सगळ्या जगालाच त्याचे लाभ मिळत आहेत. आज आपण एकमेकांशी सर्व दृष्टीने जोडलेल्या जगात राहतो आहोत. जगातली तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून, भारताचे जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासदरात निश्चितच महत्त्वाचे योगदान आहे. एक शांत, स्थिर आणि आर्थिकदृष्ट्या जोडलेल्या जगाची निर्मिती करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आंतरराष्ट्रीय समुदायाचा जबाबदार सदस्य या नात्याने, हवामान बदलाचा एकत्रितरीत्या मुकाबला करण्यातही भारत आघाडीवर आहे. खरे तर भारतात, कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण पूर्वीपासूनच कमी आहे, मात्र असे असले तरी पर्यावरणाबाबतच्या जबाबदारीच्या तत्वाने भारत, हवामान बदलाच्या संकटाविरोधात महत्वाचा लढा देत आहे.

देशांतर्गत पातळीवर, आम्ही यासाठी एक राष्ट्रीय कृती आराखडा तयार केला आहे. याअंतर्गत कार्बन उत्सर्जन कमी करणे, वनाच्छादन वाढवणे आणि कार्बन उत्सर्जन करणाऱ्या पारंपरिक इंधनाच्या ऐवजी अक्षय उर्जा आणि इंधनाला प्रोत्साहन देणे, असे कार्यक्रम आम्ही राबवत आहोत. आंतरराष्ट्रीय पटलावर आम्ही समविचारी देशांनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय सौर समुदायाची स्थापना केली आहे. यातून जीवाश्म इंधनाला पर्याय म्हणून स्वच्छ आणि अमर्यादित सौरउर्जेचा पर्याय उभा करण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या शांतता प्रस्थापित करण्याच्या सैनिक कारवाईमध्ये भारतीय सैन्याचे सर्वाधिक योगदान आहे. आणि कोरियाच्या प्रदेशातही शांतता प्रस्थापित करण्यात भारतीय सैन्याचे योगदान होते, याचा आम्हाला अभिमान आहे.

जगभरात कुठेही नैसर्गिक आपत्ती आल्यास, आम्ही मदतीचा हात दिला आहे आणि कोणत्याही गरजेच्या वेळी मानवतेच्या सेवेसाठी धावून गेलो आहोत. अतिशय कठीण प्रदेशातही आमच्या जवानांनी उत्तम कारवाई केली आहे. संकटाच्या वेळी जवानांनी बचावकार्य करत केवळ भारतीयच नव्हे, तर इतर अनेक देशांतील नागरिकांची सुटका केली आहे. जगातील अविकसित आणि विकसनशील देशांच्या विकासासाठी आम्ही भागीदारी केली आहे विकसनशील देशांमध्ये सामाजिक आणि भौतिक सेवा-सुविधांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आम्ही सहकार्य करत आहोत. या सर्व प्रयत्नांतून जागतिकीकरणकरणाचे लाभ जगातील सर्व भागात समानतेने पोहोचवण्याचा आमचा उद्देश आहे. गेल्या काही वर्षात, आमच्या सरकारने जगातील अनेक लहान-मोठ्या देशांशी नव्याने संपर्क वाढवला असून नवी भागीदारी निर्माण केली आहे. पूर्व आशियाई प्रदेशाबाबत बोलायचे झाल्यास, आमच्या 'ऍक्ट ईस्ट' या धोरणानुसार, या प्रदेशातील अनेक देशांसोबत आम्ही आमचे संबंध नव्याने प्रस्थापित केले आहेत, दक्षिण कोरियाचाही त्यात समावेश होतो. आमच्या या दृष्टीकोनाचेच प्रतिबिंब मला अध्यक्ष श्री मून यांच्या नव्या दक्षिण धोरणात ऐकायला मिळाले, याचा मला विशेष आनंद आहे. मित्रांनो,

युगानुयुगे, भारत हा शांतीचा संदेश देणारा देश राहिला आहे. भारतातील लोक गेल्या हजारो वर्षे शांतता आणि सौहार्दपूर्ण सहवास प्रत्यक्ष आचरणात आणत आहेत. भारतात असलेल्या हजारो भाषा आणि बोलीभाषा, अनेक राज्ये, प्रमुख धर्म, सुखाने नांदत असलेल्या या वैविध्यपूर्ण देशाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. आमच्या या भूमीत विविध श्रद्धा, विश्वास आणि समुदायाचे लोक एकत्र प्रगती करु शकतात, समृद्ध होऊ शकतात,याचा आम्हाला अभिमान आहे. केवळ सहिष्णूता नव्हे, तर विविधता आणि वैविध्यपूर्ण संस्कृतींचा उत्सव या भारतीयत्वाचा आधार आहे, याचा आम्हा सर्वांना अतिशय अभिमान आहे.

मित्रांनो,

कोरियाप्रमाणेच, भारतालाही सीमापार तणावाचा आणि संकटाचा सामना करावा लागतो आहे. या प्रदेशात, शांततेच्या मार्गाने विकास करण्याच्या आमच्या प्रयत्नांना सीमापार दहशतवादामुळे अनेकदा खीळ बसते. भारत तर गेल्या 40 वर्षांपासून या सीमापार दहशतवादाचा बळी ठरला आहे, मात्र,आज जगातील जवळपास सर्वच देशांना, मग ते कुठेही असोत, दहशतवादाचा धोका निर्माण झालाच आहे. अशा वेळी मानवतेवर विश्वास असणाऱ्या सर्व देशांनी एकत्र येत दहशतवादाचा आणि दहशतवादी करवायांचा समूळ नायनाट करण्याची नितांत गरज आहे. दहशतवादी संघटनांना पुरवला जाणारा निधी, मदत करणारे घटक संपवायला हवेतच,त्याशिवाय, दहशतवाद आणि त्यामागच्या तथाकथित विचारसरणीच्या प्रचाराचा प्रतिवाद करत जोरदार प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. हे सगळे केल्यासच आपण द्वेषभावनेच्या जागी सौहार्द, विध्वंसक वृत्तींच्या जागी विकास आणू शकू. हिंसा आणि द्वेषभावना भरलेल्या जागतिक पटलाचे चित्र बदलून तिथे शांतता आणि सौहार्दाचे रंग भरु शकू.

 

मित्रांनो,

कोरियन प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने गेल्या वर्षभरात झालेली प्रगती अतिशय समाधानकारक आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय, उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामध्ये असलेल्या परस्पर अविश्वास संशयाच्या वातावरणातून या प्रदेशाला बाहेर काढण्याचे सर्व श्रेय कोरियाचे अध्यक्ष मून यांचेच आहे.त्यांनीच या परस्परविरोधी देशांना चर्चेसाठी एकत्र आणले. ही छोटी गोष्ट नाही. दोन्ही कोरियन देह आणि अमेरिका यांच्यात सुरु असलेल्या चर्चेला भारतातर्फे माझा पूर्ण पाठिंबा असल्याचे मी जाहीर करतो.

एक प्रसिद्ध कोरियन सुविचार आहे: 'शिचांगी भानिदा'

म्हणजेच-" उत्तम सुरुवात म्हणजे अर्धी लढाई जिंकणे.

मला पूर्ण विश्वास आहे, की कोरियन प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी कोरियन जनतेने सुरु केलेल्या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल.

मित्रांनो, माझ्या भाषणाच्या शेवटी, 1988 च्या कोरियन ऑलिम्पिकच्या गीतातील काही ओळी उद्धृत करायला मला आवडेल. या ओळींमध्ये आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्याची अशा अतिशय सुरेख शब्दांत व्यक्त करण्यात आली आहे.

“हॅन्ड इन हॅन्ड, वुई स्टॅन्ड

ऑल एक्रॉस द लॅन्ड

वुई कॅन मेक धिस वर्ल्ड

अ बेटर प्लेस इन विच टू लिव्ह!

(हातात हात घेऊन, उभे आहोत

आम्ही सगळे, विश्वभरातले लोक,

आम्ही सगळे मिळून,

हे विश्व जगण्यासाठी

अधिक सुंदर बनवू !! )

गमसा हमींदा !

धन्यवाद!

खूप खूप धन्यवाद !

****

B.Gokhale/ R.Aghor

 



(Release ID: 1566130) Visitor Counter : 117


Read this release in: English