पंतप्रधान कार्यालय

महाराष्ट्रातल्या धुळे येथे विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 16 FEB 2019 7:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी 2019

 

व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल श्रीमान विद्यासागर जी, मुख्यमंत्री देवेंद्र जी, मंत्रिमंडळातले माझे सहकारी नितीन जी, डॉक्टर सुभाष भामरे जी, राज्य सरकारचे मंत्री गिरीश महाजन जी, जयकुमार रावल जी, मंचावर असलेले अन्य सर्व मान्यवर आणि या इथे इतक्या मोठ्या संख्येने मला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या माझ्या सर्व प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज इतक्या कडक उन्हामध्ये आपण या सभेच्या आधीच दोन-दोन, तीन-तीन तास झाले तुम्ही येवून बसलेले आहात, असं मला आत्ता सांगण्यात आलं. तुमच्या या तपस्येला मी वंदन करतो.

मित्रांनो, आज आपल्याला भेटायला आलो आहे, ही वेळ फार विचित्र आहे. पुलवामामध्ये आमच्या वीर जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या घटनेने संपूर्ण देशात आक्रोश व्यक्त होत आहे. एकीकडे देशामध्ये संताप व्यक्त होत आहे तर दुसरीकडे वीर जवानांचे हौतात्म्य पाहून प्रत्येकाचे  डोळे पाणावत आहेत. महाराष्ट्राच्या भूमीनेही आपले सुपूत्र गमावले आहेत. खानदेशाच्या मातीतल्या देशाच्या सर्व शूर, बहादूर सुपुत्रांना आणि त्यांना जन्म देणाऱ्या प्रत्येक मातेला मी आदरपूर्वक वंदन करतो.

मित्रांनो, आमच्या शहीद जवानांनी नेहमीच देशाची अगदी निःस्वार्थ भावनेने सेवा केली आहे. हे वीर जवान कधीच काही बोलत, तक्रार करीत नाहीत. सीमेवर घट्ट पाय रोवून उभे राहतात. आपल्या प्राणांचे बलिदान करताना मागेपुढे पहात नाहीत. अशा या वीर जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आपण आता ठाम उभे राहिले पाहिजे. सरकार, प्रशासन यांची ही जबाबदारी तर आहेच, परंतु एक नागरिक म्हणून आपल्या सर्वांचीही एक खूप मोठी जबाबदारी आहे.

मित्रांनो, आता अतिशय संयम दाखवण्याची गरज आहे. अशा नाजूक काळामध्ये  खूप संवेदनशीलता दाखवण्याची गरज आहे. शोकाकूल वातावरण आहे. परंतु मी प्रत्येक कुटुंबाला विश्वास देवू इच्छितो की, ज्या परिवारांला आपला सुपूत्र गमवावा लागला आहे. जवानाच्या वीरमृत्यूमुळे आपल्या डोळ्यात जे पाणी आलं आहे. त्या आसवांचा पूर्णपणे हिशेब चुकता केला जाईल. आता नवीन रिती आणि नवीन नीती स्वीकारणारा हा भारत आहे. याचा अनुभव संपूर्ण जगाला येईल.

आमच्या सुरक्षा दलाचे शूरवीर जवान, बंदूक चालवणारा असो अथवा बंदूक पकडणारा असो, बॉम्ब फेकणारा असो अथवा बॉम्ब हातात आणून देणारा असो, कोणालाही चैन पडू देणार नाहीत की कोणालाही निश्चिंत झोपू देणार नाहीत. आपण स्वतःहून भारत कधीच कोणाला त्रास देत नाही अथवा कोणाची कागाळी करत नाही. परंतु मी आत्ताच स्पष्ट करतो की या नव्या भारताला आता जर कोणी छेडलं, त्रास दिला तर मात्र हा देश कोणालाही सोडणार नाही. ही भारताची नवीन पद्धती आहे. आमच्या सुरक्षा दलाने याआधीही शौर्य दाखवले आहेच, आणि आतासुद्धा कोणतीही कसर बाकी ठेवली जाणार नाही.

बंधू आणि भगिनींनो, देशाची सुरक्षा असो अथवा देशातल्या सर्वसामान्य जनतेचे जीवन सुकर बनवण्यासाठी कोणतेही कार्य असो, सरकार यासाठी सातत्याने आपले काम करीत आहे. आज धुळ्याशी संबंधित अनेक विकास योजना लोकार्पण करण्यात येत आहेत तसेच शिलान्यास करण्यात आला आहे. या योजनांसाठी हजारो कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत. यामध्ये धुळे शहरासाठी पेयजल आणि सांडपाणी व्यवस्थापनाची योजना आहे. शेतकरी बांधवांसाठी कृषी सिंचन योजना आहे. तसेच धुळे शहरासाठी उत्तम दळणवळणाची साधने उपलब्ध व्हावीत, यासाठी तयार करण्यात आलेल्या योजना आहेत. या अनेक योजनांचा लाभ आता तुम्हाला मिळणार आहे, म्हणून तुमचे खूप- खूप अभिनंदन करतो.

बंधू आणि भगिनींनो, धुळे शहरामध्ये देशाचे एक महत्वपूर्ण औद्योगिक नगर बनण्याची क्षमता, शक्यता आहे. देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काही शहरांमध्ये व्यापार चांगला होण्याची शक्यता भरपूर असतात, त्यापैकीच धुळे हे एक शहर आहे. या शहराजवळून अनेक मोठे राष्ट्रीय महामार्ग जात आहेत. त्यामुळेच धुळे जिल्ह्यासाठी वाहतूक  व्यवस्था  आणखी मजबूत करण्याचं काम आम्ही सुरू केलं आहे. यासाठी आज दोन नवीन रेलमार्गांचा शिलान्यास करण्यात आला आहे. एका रेल मार्गिकेचे रूंदीकरण आणि विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे. तसेच तीन नवीन गाड्यांना आज हिरवी झेंडा दाखवण्यात आला आहे.

या शहरातल्या लोकांचा आणि सूरत शहराचा फार जवळचा संबंध आहे. आज इथं उपस्थित असलेल्या लोकांपैकी प्रत्येक कुटुंबाचे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सूरतेशी नाते जोडलेले असणारच आहे. 25 वर्षांपूर्वी इथून सूरतला जाणं किती अवघड होतं, हे तुम्ही आठवून पहा. तसेच 25-30 वर्षांपूर्वी सूरत शहर कसे होते तेही आठवून पहा. या काळामध्ये सूरत शहराने प्रगती करून कुठल्या कुठे पोहोचले आहे. याप्रमाणेच धुळे शहराचाही कायाकल्प होवू शकतो. माझ्या तर डोळ्यांसमोर 30 वर्षानंतर धुळे शहराचे रूप कसे असेल, या शहराने किती प्रगती किती असेल, हे चित्र आत्ताच येवू लागले आहे. तुम्ही सर्वांनी माझे हे शब्द अगदी जरूर लिहून ठेवावेत. आजपासून 30 वर्षांनी या धुळे शहराची स्पर्धा सूरत शहराशी असेल. माझे शब्द धुळेवासियांनी अगदी लिहून ठेवावेत. खरे ठरणार आहेत, हे आत्ता पुन्हा एकदा इथं नमूद करतो. धुळ्यामध्ये विकास साधण्याची अपार संभावना आहे. आणि आम्ही या प्रचंड ताकदीचा पूरेपूर वापर व्हावा, यासाठी अनेक कामांचे बीजारोपण आज केले आहे. 30 वर्षांमध्ये या विकासकामांच्या रोपट्याचा प्रचंड मोठा वटवृक्ष होणार आहे. विकास, प्रगती यांच्याबाबतीत धुळे आणि सूरत यांच्यात स्पर्धा लागली तर ती माझ्यासाठी अभिमानाची, गर्वाची बाब ठरणार आहे.

आज धुळेवासियांनी मला सांगावं, तुम्हा सर्वांचा स्वतःवर विश्वास आहे का? धुळे विकास, प्रगती करू शकते का? धुळे सूरतबनू शकते, फक्त आपण सर्वांनी पुढे जाण्याचा संकल्प करण्याची गरज आहे. जर तुम्ही पुढे जाण्यासाठी तयार असाल तर, मी सुद्धा आपल्याबरोबर चालण्यासाठी तयार आहे. धुळे शहराला पुढे नेण्यासाठी माझंही पाऊल तुमच्या पावलाबरोबर पुढे पडणार आहे.

मित्रांनो, आज धुळे ते नरदाना हा मार्ग जोडणाऱ्या रेल्वे मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. भविष्यात हीच मार्गिका मनमाड आणि इंदूरला जोडण्यासाठी सोईची ठरणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी जवळपास 9 हजार कोटी रूपये खर्च होतील, असा अंदाज आहे. मनमाड- इंदूर रेल मार्गिका बनल्यानंतर त्याचा लाभ इंदूर आणि मुंबई यांच्यासह संपूर्ण देशाला होणार आहे.

मित्रांनो, याशिवाय आज मनमाड आणि जळगाव यांना जोडणाऱ्या नवीन रेल मार्गाचाही शिलान्यास करण्यात आला आहे. या लोहमार्गाचे काम झाल्यानंतर लोकांना प्रवासाच्या जास्त सुविधा उपलब्ध होणार आहेत. युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.

मित्रांनो, जवळपास एक दशकापूर्वी  उधना- जळगाव रेल मार्गाच्या रूंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते. ते आत्ता पूर्ण होवू शकले आहे. या मार्गाचे दुपदरीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे त्याचबरोबर या मार्गाचे विद्युतीकरणाचे काम करण्यात आले आहे. आज हा मार्ग राष्ट्राला समर्पित करण्यात आला आहे.

मित्रांनो, या मार्गाचा सर्वात पहिला लाभ असा झाला आहे की, उधना -नंदूरबार आणि उधना -पालसी या मार्गावर आता दोन नवीन गाड्या धावणार आहेत. या दोन्ही गाड्यांना काही वेळापूर्वी हिरवा झेंडा दाखवण्यात आला असून आता या गाड्यांचा प्रवास सुरू झाला आहे. यावेळी उधना इथे आमचे सहकारी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेले आहेत.

उधना इथं मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या या सर्व सहकारी मंडळींना मी धुळ्यातून खूप-खूप शुभेच्छा देतो. उधना इथं आमचे रेल्वे मंत्री उपस्थित आहेत. श्रीमान राजेन गोहाई जी, इतर सहकारी उपस्थित आहेत. याशिवाय भुसावळ इथून वांद्रेपर्यंत धावणाऱ्या खानदेश एक्सप्रेसमुळे मुंबई आणि सूरत यां शहरांना धुळ्याबरोबर संपर्क ठेवणेही आता आणखी सोईचे ठरणार आहे.

बंधू आणि भगिनींनो, इथला सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो पाण्याचा. तापीचा प्रवाह ज्या धुळे शहरातून जातो, त्याच शहरवासियांना गेली अनेक वर्षे पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे. तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावं लागत आहे. धुळे शहराला लागणारं पेयजल आणि इथल्या आजूबाजूच्या शेतीसाठी लागणारं पाणी, या दोन्हीची समस्या सोडवण्यासाठी आज खूप महत्वपूर्ण काम करण्यात आलं आहे. त्यामध्येही धुळे शहराचा पेयजलाचा प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी केंद्र सरकारने अमृत योजनेअंतर्गत एक प्रकल्प सुरू केला आहे. याशिवाय इथं जो सीवर प्रकल्प बनणार आहे, त्यामुळे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मदत होवू शकणार आहे.

बंधू आणि भगिनींनो, धुळ्यासहित महाराष्ट्र आणि देशाच्या अन्य भागामध्ये जलसिंचनाच्या स्थितीमध्ये चांगली सुधारणा व्हावी, यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना तयार केली आहे. या योजनेअंतर्गत जे सिंचन प्रकल्प गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत, अशा 99 सिंचन योजनांचे काम करण्यात आले आहे. यापैकी 26 प्रकल्प एकट्या महाराष्ट्रात आहेत.

बंधू आणि भगिनींनो, आज ज्या निम्न पंजारा सिंचन प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले आहे. ही योजनाही प्रलंबित असलेल्या महाराष्ट्रातल्या 26 प्रकल्पांपैकीच आहे. या योजनेचे काम 35 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलं होतं. त्यावेळी या प्रकल्पासाठी 21 कोटी खर्च अपेक्षित होता. आज या प्रकल्पासाठी साडेपाचशे कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे.

मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पाण्याची टंचाई आहे. पावसाअभावी दुष्काळी स्थिती निर्माण होते. राज्याचा हा पाणीप्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मराठवाडा, बीड आणि महाराष्ट्रामधल्या दुष्काळग्रस्त भागासाठी सरकारने वेगवेगळ्या 91 सिंचन योजनांना विशेष प्रकल्पांतर्गत मंजुरी दिली आहे. या योजनांसाठी 14 हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. या सर्व योजना विशिष्ट सीमा निश्चित करून, त्या कालावधीत पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातली पावणे चार लाख हेक्टरपेक्षा जास्त भूमी ओलिताखाली येवू शकणार आहे.

बंधू आणि भगिनींनो, सिंचन योजना आणि रेल्वे प्रकल्पांचे काम प्रत्यक्षात येण्यासाठी आपले संसदेतले प्रतिनिधी आणि माझे मंत्रिमंडळातले सहकारी डॉक्टर सुभाष भामरे यांचे खूप मोठे योगदान आहे. ज्या ज्यावेळी ते मला भेटतात, वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा करतात, त्या त्यावेळी दुष्काळग्रस्त भागाविषयी त्यांना वाटत असलेली चिंता, त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत असते. सुलवाडे जामफल कानुली सिंचन योजनेसाठी तर त्यांनी खूप पाठपुरावा केला.

या सिंचन योजनेसाठी गेल्या दोन दशकांपासून फक्त चर्चाच सुरू होती. प्रत्यक्ष काम सुरू केले जात नव्हते. आज या योजनेचा प्रारंभ करण्यात आला आहे. या योजनेसाठी चोवीसशे कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पामध्ये तापी नदीतून पाणी आणून या परिसरातल्या गावांमध्ये सिंचनासाठी वापरण्यात येणार आहे. या कृषी सिंचन योजनेचा हजारो शेतकरी बांधवांना खूप लाभ होणार आहे.

मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी सिंचन योजना उपलब्ध करून देणे असो, अथवा दुष्काळामुळे अथवा अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान टाळणे असो. केंद्र सरकारची नियत अतिशय स्वच्छ आहे. सरकार फक्त शेतकरी बांधवांच्या हिताचाच विचार करीत असते आणि त्यांच्यासाठी काम करीत असते.

बंधू आणि भगिनींनो, शेतकरी आणि पशूपालक यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारने मोठ्या, महत्वपूर्ण योजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे. या योजनेनुसार ज्या शेतकरी बांधवांकडे पाच एकरापेक्षा कमी जमीन आहे, त्यांच्या बँक खात्यामध्ये दर वर्षी केंद्र सरकार सहा हजार रूपये जमा करणार आहे. या निधीमुळे माझे शेतकरी बंधू शेतीसाठी वेळेवर खत, बी-बियाणे, कीटकनाशके यांची खरेदी करू शकणार आहेत. शेतीच्या कामासाठी त्यांना सावकाराकडून जास्त व्याजदराने पैसे घेण्याची गरज पडणार नाही.

मित्रांनो, या योजनेअंतर्गत आगामी दहा वर्षांमध्ये शेतकारी बांधवांच्या खात्यामध्ये साडे सात लाख कोटी रुपये जमा करण्यात येणार आहेत. याशिवाय आता सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार पशुपालकांनाही पिक कर्जाप्रमाणे किसान क्रेडिट कार्ड देवून त्याव्दारे वित्तपुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे आमच्या दूध उत्पादकांना तसेच दुग्धालयाचा उद्योग करणाऱ्या मंडळींना चांगला लाभ होणार आहे. गावामध्ये भरपूर उत्पन्न येवू शकणार आहे.

मित्रांनो, गावांचा विचार केला तर धुळे या गावाला एक समृद्ध इतिहास आहे. आज या इथं ज्या स्थानी ही सभा होत आहे, ती ही भूमी गौमातेची आहे. महान स्वातंत्र्य सेनानी रामेश्वरम् प्रसाद जी यांनी आपली 14 एकर जमीन गौसेवेसाठी समर्पित केली होती. धुळ्याच्या या परंपरेला आता आणखी एक शक्ती, बळ मिळणार आहे. केंद्र सरकारने या अर्थसंकल्पामध्ये गौमाता आणि गोवंश यांची सेवा आणि त्यांच्या संवर्धनासाठी कामधेनू आयोग बनवण्याचा निर्णय घेतला आहे. हा आयोग आमच्या पशुधनाच्या मदतीने आमच्या गावांना सशक्त करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.

मित्रांनो, गाव असो, गरीब असो, अथवा आमचा आदिवासी असो. केंद्रातले सरकार आणि महाराष्ट्राचे सरकार संपूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. सबका साथ - सबका विकासहा संकल्प करून आम्ही सातत्याने कार्यरत आहोत. जगातली सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आम्ही सुरू केली आहे. या आयुष्मान भारत योजनेचा महाराष्ट्रातल्या गरीब, शोषित, वंचित आणि आदिवासी कुटुंबांना मोठा लाभ मिळत आहे. या योजने अंतर्गत आत्तापर्यंत देशातल्या 12 लाखांपेक्षा जास्त गरीब रूग्णांवर मोफत औषधोपचार करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातले 70 हजारांपेक्षा जास्त आणि धुळे जिल्ह्यातले 1800 रूग्ण या योजनेचे लाभार्थी आहेत. 

प्रत्येक वर्षी 5 लाख रूपयांपर्यंत मोफत औषधोपचार करणारी ही योजना लाखो गरीब, वंचित, आदिवासी परिवारांच्या नवीन आशा पल्लवीत करणारी ठरली आहे.आत्ता या व्यासपीठावर येण्याआधी मला इथं आयुष्यमान भारत योजनेच्या काही लाभार्थींना भेटण्याची संधी मिळाली. आजारी असतानाही, रूग्णालयाचा, औषधोपचाराचा प्रचंड खर्च लक्षात घेवून ही गरीब मंडळी उपचार घेणे टाळत होते. आजार कसाबसा सहन करत होते. आणि मरण कधी येईल, व्याधीतून कधी मुक्तता मिळेल असा विचार करत होते. पैशांअभावी त्यांना उपचार घेणे अशक्य होते. परंतु आयुष्यमान भारत योजनेची माहिती समजल्यानंतर त्यांनी या योजनेचा लाभ घेतला.

केंद्र सरकारच्या या आयुष्यमान भारत योजनेमुळे या गरीब लोकांचे जीवन वाचले आहे. त्यांनी आता आयुष्याची नवीन स्वप्ने पहायला प्रारंभ केला आहे, हे मला त्यांच्याशी बोलल्यानंतर लक्षात आले. त्यांच्या डोळ्यांमध्ये जगण्याची उभारी, त्यांना मिळालेली नवी प्रेरणा दिसून येत होती. आज त्यांच्याशी बोलल्यानंतर, त्यांचे मनोगत जाणून घेतल्यानंतर खरोखरीच मला खूप खूप समाधान वाटले. त्यांनी दिलेले आशीर्वाद मला ताकद देत होते. या देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी आपण शक्य तितके केले पाहिजे, असं मला वाटत असतं. या देशाच्या जनतेची सेवा करताना, आपल्याकडून कोणतीही कसर राहू नये, कोणतीही कमतरता राहू नये, असा विचार माझा असतो.

बंधू आणि भगिनींनो, आज आपल्यासाठी ज्या विकास कामांचा प्रारंभ केला आहे, ज्या योजनांचे लोकार्पण झाले आहे, त्यासाठी आपल्या सर्वांना मी पुन्हा एकदा खूप- खूप शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो.

आपण सर्वांनी दोन्ही हाताच्या मुठी घट्ट बंद करून पूर्ण ताकदीनिशी माझ्या बरोबर उच्चाराने म्हणा --

भारत माता की जय --- !

हा आवाज पूर्ण खानदेशामध्ये ऐकू गेला पाहिजे ! 

भारत माता की जय --- !

भारत माता की जय --- !

भारत माता की जय --- !

खूप - खूप धन्यवाद !

 

 

B.Gokhale/S.Bedekar/D. Rane

 


(Release ID: 1565958) अभ्यागत कक्ष : 109
Read this releasein: English