पंतप्रधान कार्यालय

कोरियाच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधानांनी दिलेले निवेदन

Posted On: 22 FEB 2019 3:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी 2019

 

सन्माननीय राष्ट्रपती,

मून-जे-इन

माननीय प्रतिनिधी

मित्रहो,

आनयोंग

हा-सेयो!

नमस्कार!

कोरियात येण्याचे आमंत्रण दिल्याबद्दल आणि प्रेमळ स्वागतासाठी राष्ट्रपती मून यांचे मी मनापासून आभार मानतो. भारताच्या विकासासाठी कोरियाचे प्रारुप बहुदा सर्वाधिक अनुकरणीय असल्याचे, पंतप्रधान होण्याआधीपासूनचे माझे मत आहे. यापूर्वीही मी हे अनेकदा सांगितले आहे. कोरियाची प्रगती भारतासाठी प्रेरणादायी आहे आणि म्हणूनच कोरियाचा दौरा माझ्यासाठी प्रसन्नतेची बाब असते.

मित्रांनो,

गेल्यावर्षी जुलै महिन्यात राष्ट्रपती मून यांचे भारतात स्वागत करण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली होती. पूर्व आशिया परिषद आणि जी-20 परिषदेदरम्यानही आमची भेट झाली होती. भारताचे ‘ॲक्ट इस्ट धोरण’ आणि कोरियाचे ‘नवे दाक्षिणात्य धोरण’ यातील ताळमेळ आमच्यातील विशेष धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठीचा उत्तम आधार ठरत आहे.

भारत-प्रशांत संबंधांमध्ये भारताचा दृष्टिकोन समावेशकतेचा, आसियानची केंद्रीयता आणि सामायिक समृद्धी यावर विशेष भर देणारा आहे. हे एक असे क्षेत्र आहे जिथे भारत आणि कोरिया सामायिक मूल्ये आणि हिताच्या आधारावर संपूर्ण क्षेत्राच्या तसेच वैश्विक लाभासाठी मिळून काम करु शकतात. गेल्यावर्षी राष्ट्रपतींच्या भारत दौऱ्यानंतर खूपच कमी वेळात आपण आपल्या संबंधांमध्ये महत्वपूर्ण प्रगती केली आहे, याबद्दल मला आनंद वाटतो. ही प्रगती आणि भविष्यातील आपल्या संबंधांचा आराखडा, लोक, शांती आणि समृद्धी या आमच्या सामायिक दृष्टिकोनावर आधारित आहे.

मित्रांनो,

गेल्या आठवड्यात भारतात पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, राष्ट्रपती मून यांनी व्यक्त केलेल्या संवेदना आणि आम्हाला दिलेला पाठिंबा यासाठी आम्ही आभारी आहोत. दहशतवादाविरुद्ध आपले द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य व समन्वय अधिक दृढ करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

आज भारताचे गृह मंत्रालय आणि कोरियातील राष्ट्रीय पोलीस संस्था यांच्यात झालेला सामंजस्य करार आमच्यातील दहशतवादविरोधी सहकार्य अधिक मजबूत करेल. वैश्विक समुदायानेही आता चर्चेच्या पुढे जाऊन या समस्येविरोधात एकजूट होऊन कार्यवाही करण्याची वेळ आता आली आहे.

मित्रांनो,

भारताच्या आर्थिक परिवर्तनात कोरिया आमचा महत्वाचा भागीदार आहे. आमच्यातील व्यापार आणि गुंतवणूक संबंध वृद्धिंगत होत आहेत. वर्ष 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापारात वाढ करुन 50 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याच्या लक्ष्याप्रतीच्या कटिबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार केला आहे.

पायाभूत सुविधा, बंदर विकास, सागरी आणि अन्न प्रक्रिया, स्टार्ट अप्स आणि लघू व मध्यम उद्योग यासारख्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर आम्ही सहमत आहोत.

आपल्या वाढत्या सामारिक भागीदारीत संरक्षण क्षेत्राची भूमिका महत्वाची आहे. याचे एक उदाहरण भारतीय लष्करात दाखल झालेल्या ‘के-9 वज्र’ तोफा हे होय.

संरक्षण उत्पादनात हे उल्लेखनीय सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी, संरक्षण तंत्रज्ञान आणि सह-उत्पादन यावर एक आराखडा करण्याबाबत आमच्यात सहमती झाली आहे. याअंतर्गत भारतात तयार करण्यात येत असलेल्या संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरमध्ये कोरियाई कंपन्यांच्या भागीदारीचे स्वागत करतो.

मित्रांनो,

गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात अयोध्येत आयोजित ‘दीपोत्सवात’ प्रथम महिला किम यांचे प्रमुख पाहुण्या म्हणून सहभागी होणे, आमच्यासाठी सन्मानाची बाब होती. त्यांच्या भेटीमुळे हजारो वर्षांच्या आमच्या सांस्कृतिक संबंधांवर नवा प्रकाश पडला आणि नव्या पिढीत उत्सुकता आणि जागरुकता निर्माण झाली.

नागरिकांमधले संबंध अधिक दृढ करण्यासाठी कोरियाच्या नागरिकांसाठी आम्ही ‘व्हिजा ऑन अरायव्हल’ सुविधा गेल्यावर्षी ऑक्टोबरपासून सुरु केली आहे.

भारतीय नागरिकांसाठी कोरियाद्वारे ‘ग्रुप व्हिजा’ सुगम करण्याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. यामुळे दोन्ही देशांमध्ये पर्यटन विकास होईल.

महात्मा गांधींचे 150 वे जयंतीवर्ष साजरे होत आहे आणि कोरियात लोकशाही आंदोलनाची शताब्दी साजरी होत आहे, अशा महत्वपूर्ण वर्षात माझा कोरिया दौरा होत आहे.

आमच्या महात्मा गांधी स्मरणोत्सव संग्रहासाठी राष्ट्रपती मून यांनी लिहिलेल्या श्रद्धांजलीसाठी मी आभार व्यक्त करतो.

मित्रांनो,

कोरियाई द्वीपकल्पात आज जी शांतता आणि स्थिरता स्थापित झाली आहे, त्याचे श्रेय राष्ट्रपती मून यांच्या अथक प्रयत्नांना आहे. त्यांचा दृढ विश्वास आणि धीरता यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो.

कोरियाई द्वीपकल्पात कायमस्वरुपी शांततेसाठी संपूर्ण सहकार्याबाबतची भारताची प्रतिबद्धता मी पुन्हा व्यक्त करतो. आज दुपारी प्राप्त होत असलेला सेऊल शांतता पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत सन्मानाचा आहे.

हा सन्मान मी माझे वैयक्तिक यश म्हणून नाही तर भारतीय जनतेसाठी कोरियाई जनतेची सद्‌भावना आणि प्रेम यांचे प्रतिक म्हणून स्वीकार करेन. माझे आणि माझ्या प्रतिनिधीमंडळाचे करण्यात आलेले स्वागत आणि अतिथ्य यासाठी मी राष्ट्रपती मून, कोरिया सरकार आणि कोरियाच्या जनतेचे मन:पूर्वक आभार मानतो.

खम्सा-हम-निदा.

धन्यवाद.

 

 

B.Gokhale/S.Kakade/D. Rane

 



(Release ID: 1565952) Visitor Counter : 393


Read this release in: English