Posted On:
16 FEB 2019 5:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी 2019
पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या दोन्ही सभागृहातल्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची एक बैठक केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे पार पडली. यावेळी राजनाथ सिंह यांनी कालच्या श्रीनगर भेटीचा वृत्तांत सर्व पक्षांच्या नेत्यांना दिला आणि तिथल्या परिस्थितीची माहिती दिली. आपल्या सुरक्षा दलाचे नैतिक बळ खूप चांगले आहे. सातत्याने सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांना आता आपण एकदाच निर्णायक उत्तर द्यावे, आणि हा लढा कायमचा निकालात काढावा, असं सुरक्षा दलाचे मत असल्याचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितले. दहशतवादी हल्लेखोरांच्या विरोधामध्ये आणि अशा कृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्या, पाठराखण करणा-या लोकांशी, संघटनांशी, कशा पद्धतीने दोन हात करायचे, याचे सर्व अधिकार आता सरकारने लष्कराला दिले आहेत, असेही राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितले. सरकारने दहशतवादाच्या विरोधात अगदी पहिल्यापासूनच ‘शून्य सहनशीलता’ धोरण ठेवले आहे, त्यामुळेच सीमेपलिकडून होणा-या हल्ल्यांना आपण सडेतोड प्रत्युत्तर देत आलो आहोत. मात्र 14 फेब्रुवारीचा भ्याड हल्ला दहशतवाद्यांची मानसिकता दर्शवते.
जम्मू आणि काश्मिरमधील बहुतांश जनता ही शांतताप्रिय आहे. मात्र सीमेपलिकडचे दहशतवादी गट काही समाज विघातक शक्तींना हाताशी धरून राज्यात अशांतता निर्माण करीत आहेत, असं राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.
पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या आमच्या वीर जवानांचे हौतात्म्य असे वाया जाणार नाही. दहशतवादाविरूद्ध लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकत्र आला आहे. सरकारनेही दहशतवादाची पाळेमुळे उखडून काढण्याचा निर्धार केला आहे. ज्यावेळी राष्ट्राच्या हिताचा विषय येतो, त्यावेळी काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण देश एक होतो, हा संदेश आजच्या या सर्वपक्षीय बैठकीमुळे संपूर्ण जगभरामध्ये पोहोचणार आहे, असेही राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.
पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या वीर जवानांच्या परिवारांना केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. ‘‘राज्यांनीही शहीद जवानांच्या कुटुंबियांना शक्य असेल ती मदत करावी, असे आवाहन केंद्राने राज्यांना केले आहे’’ असेही ते म्हणाले.
यावेळी सभागृहातल्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सरकारला आपला पूर्णपणे पाठिंबा असल्याचे सांगितले. दहशतवादाविरूद्ध सरकारच्यावतीने करण्यात येत असलेल्या कारवाईला पाठिंबा व्यक्त करणारा प्रस्ताव या बैठकीमध्ये एकमताने पारीत करण्यात आला.
या ठरावाचा मसुदा खालील प्रमाणे आहे:
‘‘जम्मू आणि काश्मिरमध्ये 14 फेब्रुवारी, 2019 रोजी झालेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. या हल्ल्यात 40 वीर जवान शहीद झाले. आम्ही सर्व देशवासीय या वीर जवानांच्या परिवारांवर आलेल्या शोकप्रसंगी त्यांच्या पाठीशी ठाम उभे आहोत.
सीमेपलिकडून दहशतवादाला कोणत्याही स्वरूपामध्ये मिळत असलेला पांठिब्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.
गेल्या तीन दशकांपासून सीमेपलिकडून होत असलेल्या दहशतवादी कारवायांमुळे भारताला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सीमे पलिकडून, शेजारी देशाकडून भारतामध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. दहशतवादाच्या या आव्हानाला भारताने अतिशय ठामपणे उत्तर देताना नेहमीच लवचिकपणा दाखवला आहे. मात्र आता संपूर्ण देशामध्ये एकमुखाने दहशतवादाच्या प्रश्नाचा कायमचा निकाल लावावा, अशा भावना व्यक्त होत आहेत. भारताचे ऐक्य आणि अखंडता कायम राखण्यासाठी दहशतवादाविरूद्ध लढण्यासाठी आज आम्ही सर्वजण एकत्रितपणे आमच्या सुरक्षा दलाच्या बाजूने ठाम उभे आहोत.’’
या बैठकीला विविध राजकीय पक्षांचे नेते सभागृहात उपस्थित होते. यामध्ये काँग्रेस, अभाअद्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस, तेलुगू देसम, समाजवादी पार्टी, आप, बसपा, बिजू जनता दल, एआयटीसी, लोकदल जनता पार्टी, आरएलएसपी, आयएनएलडी, सीपीआय (एम), सीपीआय, आरजेडी, एसएडी, आययूएमएल, रिपाइ (आठवले गट), जेकेएनसी, एनपीएफ, आणि टीआरएस या पक्षांच्या नेत्यांचा समावेश होता. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री, ग्रामीण विकास, पंचायत राज आणि खनिज मंत्री नरेंद्र सिंह तोमर या बैठकीला उपस्थित होते.
B.Gokhale/S.Bedekar/P.Kor