माहिती आणि प्रसारण मंत्रालय
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या माध्यम विभागांच्या पहिल्या वार्षिक परिषदेचे आयोजन
Posted On:
13 FEB 2019 5:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,13 फेब्रुवारी 2019
माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या माध्यम विभागांच्या पहिल्या वार्षिक परिषदेचे आज नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) कर्नल राज्यवर्धन राठोड या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते.
या परिषदेदरम्यान विविध माध्यम विभागांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. या विभागांच्या दैनंदिन कार्यातील उत्साह वाढवणे हा या परिषदेचा उद्देश होता. संपर्कासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबतही या परिषदेत चर्चा झाली.
उद्घाटनपर सत्रात राज्यवर्धन राठोड यांनी भारतीय माहिती सेवेतील अधिकाऱ्यांच्या कार्याचा गौरव केला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे महत्व अधोरेखित करताना हे मंत्रालय सरकारच्या सर्वाधिक महत्त्वपूर्ण मंत्रालयांपैकी एक असल्याचे राठोड यांनी यावेळी सांगितले. या अधिकाऱ्यांनी आपले ध्येय निश्चित करून आपल्या कार्यात अधिक सुधारणा करावी, असे राठोड यांनी सांगितले. संपर्क साधण्यासाठी नवीन युगातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याच्याशी जुळवून घेणे हे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचणे ही कसोटी आहे, असे सांगून सरकारी योजनांची माहिती पोहोचवताना प्रादेशिक भाषांचा वापर करण्यावरही त्यांनी भर दिला. माहिती प्रसारण सेवेतील प्रशिक्षणार्थींसाठी परदेशी घटकांचा आंतर्भाव करण्याच्या मंत्रालयाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयाचे त्यांनी कौतुक केले. सेवेचा प्रारंभ करणाऱ्या आणि सेवेत असणाऱ्या अशा दोन्ही पातळ्यांवर सातत्याने प्रशिक्षणात सुधारणा करण्याच्या गरजेवरही राठोड यांनी भर दिला.
अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व विभागांनी उत्साहांनी कार्य करण्याची गरज माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांनी अधोरेखित केली. फलश्रृती साध्य करण्यासाठी कार्य करण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला. सातत्याने बदलत्या तंत्रज्ञानासोबत जुळवून घेण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विविध माध्यम विभागात कार्य करणारे 125 हून अधिक अधिकारी या परिषदेला उपस्थित होते.
N.Sapre/J.Patankar/P.Kor
(Release ID: 1564264)
Visitor Counter : 101