ऊर्जा मंत्रालय

केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आर.के.सिंह यांच्या हस्ते नाशिकच्या केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेतील प्रादेशिक चाचणी प्रयोग शाळेचे भूमिपूजन

Posted On: 30 JAN 2019 5:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 जानेवारी 2019

 

केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आर.के.सिंह यांच्या हस्ते आज नाशिक इथल्या केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेत बांधल्या जाणाऱ्या प्रादेशिक चाचणी प्रयोग शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन झाले.

ही प्रयोगशाळा तयार झाल्यावर पश्चिम विभागातल्या उत्पादकांना आपल्या उत्पादनांची चाचणी करण्यासाठी मोठा लाभ होईल. जवळ प्रयोगशाळा उपलब्ध झाल्यामुळे त्यांचा वेळ आणि खर्चाची बचत होईल. ऊर्जा क्षेत्राशी संबंधित उत्पादनांची गुणवत्ता आणि विश्वासार्हता तपासण्यासाठी या प्रयोगशाळेची मदत होऊ शकेल.

ऊर्जा व्यवस्थेच्या जाळ्यात ऊर्जा निर्मिती, पारेषण आणि वितरण अशा सर्व टप्प्यांवर इलेक्ट्रिकल उपकरणांची भूमिका महत्वाची असते. ही उपकरणे उत्तम आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मानांकनांचा दर्जा मिळालेली असणे आवश्यक असते.

देशात ऊर्जेची मागणी दिवसेंदिवस वाढत असून येत्या काळात ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता ऊर्जा वितरण व्यवस्था वाढवणेही गरजेचे आहे. अशा स्थितीत इलेक्ट्रिकल उद्योग आणि स्वदेशी उपकरणे यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. या दृष्टीने केंद्र सरकारने या प्रयोगशाळेच्या प्रस्तावाला 115 कोटी रुपयांच्या निधीसह मंजुरी दिली होती.

महाराष्ट्र सरकारने या संस्थेला दिलेल्या  जागेत नाशिक जिल्ह्यात शिळापूर येथे ही प्रयोगशाळा बांधली जाणार आहे. या प्रयोगशाळेत ट्रान्सफॉमर्सच्या ऑनलाईन शॉर्टसर्किट तपासणीची व्यवस्था तसेच सर्किट ब्रेकर्स, कॉन्टॅक्टर्स, स्वीच फ्यूज युनिट पॅनल अशा विविध उपकरणांची चाचणी होऊ शकेल.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 


(Release ID: 1561961)
Read this release in: English