वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

रत्न आणि दागिने व्यवसायासाठी देशांतर्गत परिषदेचे उद्‌घाटन


रत्न आणि दागिने व्यवसायातील कामगारांसाठीच्या ‘परिचयपत्रांचे’ वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते अनावरण

Posted On: 29 JAN 2019 10:15PM by PIB Mumbai

मुंबई, 29 जानेवारी 2019

 

रत्ने आणि दागिने व्यवसायासाठीच्या देशांतर्गत परिषदेचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते आज मुंबईत शानदार कार्यक्रमात उद्‌घाटन झाले. रत्ने आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

या परिषदेच्या कामाची सुरुवात 1 मे 2019 म्हणजेच कामगार दिनापासून होणार असून या परिषदेमुळे या क्षेत्रातील सर्व समस्या सोडवल्या जाऊ शकतील, असा विश्वास सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला. यावेळी प्रभू यांच्या हस्ते रत्न आणि दागिने व्यवसायातील कामगारांसाठीच्या ‘परिचयपत्रांचे’ अनावरणही करण्यात आले.

केंद्र सरकार लवकरच एकात्मिक सुवर्ण धोरण आणणार आहे अशी माहिती प्रभू यांनी यावेळी दिली. सोन्याला भारतात मोठी परंपरा असून आज सोने आणि सोन्यांच्या दागिन्यांचा व्यवसाय वाढवण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले. या क्षेत्राला उभारी दिल्यास कुशल कामगारांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आज भारतातून सोन्याच्या दागिन्यांची निर्यात सुमारे दोन अब्ज डॉलर्स इतकी आहे मात्र सोन्याला मोठी बाजारपेठ उपलब्ध असून निर्यात वाढवण्यासाठी ही बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे त्यांनी सांगितले. मार्च-एप्रिल 2019 मध्ये जगभरातल्या वीस कंपन्यांना भारतात आमंत्रित केले जाणार असून या कंपन्या स्वत:च भारतीय उत्पादने विकत घेण्याविषयी धोरण ठरवू शकतील असे ते म्हणाले.

वाणिज्य विभागाचे सचिव अनुप वाधवान, वाणिज्य मंत्रालयाच्या वित्तीय सल्लागार रुपा दत्ता, रत्ने आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कुमार अग्रवाल आणि इतर सदस्य यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अग्रवाल म्हणाले की, भारतीय रत्ने आणि दागिन्यांच्या व्यवसायाला सर्व प्रकारचा पाठिंबा आणि मार्गदर्शन करण्यासाठी परिषद आनंदाने काम करेल. आज स्थापन झालेल्या देशांतर्गत परिषदेमुळे हा व्यवसाय स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

 

B.Gokhale/R.Aghor /P.Malandkar

 

 

 

 

 


(Release ID: 1561898) Visitor Counter : 181


Read this release in: English