पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान उद्या केरळ मधल्या कोची शहराचा दौरा करणार
पंतप्रधानांच्या हस्ते कोची इथे एकात्मिक तेल शुद्धीकरण विस्तार संकुलाचे लोकार्पण
बीपीसीएल कोची तेल शुद्धीकरण प्रकल्पात पेट्रोकेमिकल संकुलाचे भूमीपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार
Posted On:
25 JAN 2019 6:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जानेवारी 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या केरळमधल्या कोची इथे जाणार आहेत. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते कोची इथल्या एकात्मिक तेल शुद्धीकरण विस्तार संकुलाचे लोकार्पण होईल. तसेच बीपीसीएल कोची इथल्या पेट्रोकेमिकल संकुलाचे भूमीपूजनही पंतप्रधान करतील. कोची इथल्याच आयओसीएल एलपीजी बॉटलींग प्लान्टच्या स्टोरेज व्हेसलचे उद्घाटनही पंतप्रधान करतील. एत्तुमनुर इथल्या कौशल्य विकास संस्थेचेही भूमीपूजन मोदी यांच्या हस्ते होईल.
कोची तेल शुद्धीकरण प्रकल्पात एकात्मिक तेल शुद्धीकरण विस्तार संकुलाचे अत्याधुनिक विस्तारीकरण झाल्यामुळे कोची देशातला सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प होणार आहे. जागतिक दर्जाच्या या प्रकल्पातून भारतासाठी शुद्ध इंधनाची निर्मिती केली जाईल. याच प्रकल्पात उभारल्या गेलेल्या पेट्रोकेमिकल्स प्रकल्पामुळे एलपीजी गॅस आणि डिझेलचे उत्पादन दुप्पटीने वाढेल.
आयओसीएलच्या एलपीजी बॉटलींग प्लान्ट मध्ये 4350 मेट्रिक टन साठा क्षमता असणार आहे. माऊंडेड स्टोरेज व्हेसल मध्ये तयार करण्यात आलेल्या या प्लान्टमुळे 6 दिवसांची साठवणूक क्षमता वाढणार आहे. या प्लान्टमध्ये सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेण्यात आली आहे.
बीपीसीएल कोची तेल शुद्धीकरण प्रकल्पात मेक इन इंडिया अंतर्गत उभारण्यात आलेल्या पेट्रोकेमिकल संकुलामुळे तेल आयात करण्यातले अवलंबित्व कमी होणार आहे.
एत्तुमनुर येथे सुरु करण्यात आलेली कौशल्य विकास संस्था पेट्रोकेमिकल आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने पुरस्कृत केली आहे. या संस्थेमध्ये नैसर्गिक वायू आणि तेल क्षेत्रातल्या युवकांना स्वयं रोजगार आणि उद्योग व्यवसायासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. केरळ सरकारने या संस्थेसाठी 8 एकराची जागा दिली असून, त्यात 100 युवकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता आहे.
B.Gokhale/R.Aghor/D. Rane
(Release ID: 1561521)