पंतप्रधान कार्यालय

व्हायब्रंट गुजरात शिखर परिषद 2019 च्या उद्‌घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

Posted On: 18 JAN 2019 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जानेवारी 2019

 

विविध देशांचे आदरणीय मंत्री आणि मान्यवर, सहयोगी देशांचे प्रतिनिधी आणि शिष्टमंडळे, कॉर्पोरेट क्षेत्रातील अग्रणी, मान्यवर, सहभागी आणि शिष्टमंडळे, मंचावर उपस्थित मान्यवर, युवा मित्र हो, सभ्य स्त्री-पुरुषहो,

व्हायब्रंट गुजरात परिषदेच्या नवव्या अध्यायात आपणा सर्वांचे स्वागत करतांना मला मनापासून आनंद होतो आहे.

ही परिषद म्हणजे खऱ्या अर्थाने जागतिक स्तरावरील उपक्रम झाला आहे. असा उपक्रम, ज्यात प्रत्येकासाठी स्थान आहे. वरिष्ठ राजकीय नेतृत्वांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाच्या प्रतिष्ठेत आणखी भर पडली आहे. विविध कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील अग्रणींच्या ऊर्जेने या संमेलनाला भारून टाकले आहे. संस्था आणि मुत्सद्यांच्या उपस्थितीच्या आकर्षणासह युवा उद्योजक आणि स्टार्ट अप्सची उर्जाही या संमेलनाला लाभली आहे.

व्हायब्रंट गुजरातने आमच्या उद्योजकांच्या आत्मविश्वासात भर घालण्यात मोलाचे योगदान दिले आहे. शासकीय संस्थांकडून जगभरातील उत्तम बाबींचा स्वीकार आणि क्षमता उभारणीच्या कामातही ही परिषद सहायक ठरली आहे.

ही परिषद आपणा सर्वांसाठी उत्पादक, सफल आणि आनंददायी ठरावी, अशी आशा व्यक्त करतो. गुजरातमध्ये सध्या पतंग महोत्सव किंवा उत्तरायणाचा ऋतू सुरू आहे. परिषदेच्या व्यस्त कार्यक्रमातही आपण सर्व या उत्सवाचा आणि राज्यातील आकर्षणांचा आनंद घेण्यासाठी काही काळ निश्चितच काढू शकाल, अशी आशा मला वाटते.

व्हायब्रंट गुजरातच्या या अध्यायातील पंधरा सहयोगी देशांचे मी विशेष रूपाने स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो.

अकरा सहयोगी संघटनांबरोबरच या मंचावरून चर्चासत्रे आयोजित करणारे सर्व देश, संघटना आणि संस्था यांचाही मी आभारी आहे.  आपल्याकडील गुंतवणूकविषयक संधींचा पुरेपूर वापर करत, या मंचावर पुढाकार घेणाऱ्या आठ भारतीय राज्यांबद्दलही मला समाधान वाटते.

उल्लेखनीय आणि जागतिक दर्जाची उत्पादने, प्रक्रिया तसेच तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशा ग्लोबल ट्रेड शो ला भेट देण्यासाठी आपण निश्चितच वेळ काढू शकाल, अशी आशा मला वाटते. खरे तर गुजरात हे राज्य, भारतातील उद्योगविषयक उत्कृष्ट प्रेरणेचे  प्रतिनिधित्व करते. कित्येक दशकांपासून गुजरातला लाभलेल्या या कौशल्याचा, या उपक्रमाच्या माध्यमातून अधिक विकास झाला आहे. व्हायब्रंट गुजरात परिषद हा आठ यशस्वी अध्यायांच्या मालिकेच्या परिवर्तनकारी प्रवास आहे.

विविध विषयांवर आधारित अनेक परिषदा आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. हे विषय, भारतीय समाज आणि अर्थव्यवस्थेबरोबरच समग्र जागतिक समुदायाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे असेच आहेत. उद्या साजरा होणारा आफ्रिका दिवस आणि इंटरनॅशनल चेंबरची जागतिक परिषद यांचा उल्लेख मी येथे आवर्जून करेन.

मित्रहो,

या ठिकाणी एक भव्य समारोह सुरू असल्याचे दिसत आहे. अनेक राज्ये आणि सरकारे, तसेच प्रतिष्ठित शिष्टमंडळांच्या उपस्थितीने आम्ही सन्मानित झालो आहोत. आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय सहकार्य, हे केवळ राष्ट्रीय राजधान्यांपुरते मर्यादित नाही तर राज्यांच्या राजधानीपर्यंतही ते पोहोचले आहे, हे याद्वारे स्पष्ट होते.

भारत ही वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असल्यामुळे समग्र विकास साध्य करणे, हे आमच्यासमोर मोठेच आव्हान आहे.

समांतर विकास साधतांना, काही कारणांमुळे मागे पडलेल्या क्षेत्रांना आणि समुदायांना, आम्हाला विकासाचे लाभ मिळवून द्यायचे आहेत.

त्याचबरोबर जीवनमानाचा दर्जा, दर्जेदार सेवा आणि पायाभूत सुविधांचा दर्जा या संदर्भात उंचावलेल्या अपेक्षा आम्हाला पूर्ण करायच्या आहेत. आम्ही प्राप्त केलेल्या यशाची आम्हाला पुरेपूर जाणीव आहे, भारतातील एक षष्ठांश मानवतेवर त्याचा प्रभाव दिसून आला आहे.

मित्रहो,

भारताला वारंवार भेट देणाऱ्यांना वातावरणातील हे बदल निश्चितच जाणवले असतील. दिशा आणि प्रभाव अशा दोन्ही प्रकारे हे बदल होत आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये शासन कमी करणे आणि सुप्रशासन वाढवणे, यावर माझ्या सरकारचा भर राहिला आहे. सुधारणा, कामगिरी, परिवर्तन आणि आणखी चांगली कामगिरी, हा माझ्या सरकारचा मूलमंत्र राहिला आहे.

आम्ही अनेक कठोर पावले उचलली आहेत. आमचे अर्थकारण आणि देशाला अधिक सक्षम करणाऱ्या सखोल संरचनात्मक सुधारणाही आम्ही हाती घेतल्या आहेत.

हे सर्व करतांनाच जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये आम्ही आमचे स्थान कायम राखले आहे. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसारख्या महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था तसेच मूडी अहवालानेही भारताच्या आर्थिक प्रवासाबाबत विश्वासाची भावना व्यक्त केली आहे.

संपूर्ण क्षमतेने यश प्राप्त करण्यातील अडथळे दूर करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. सुधारणा आणि विनियमनाची प्रक्रिया आणि गती आम्ही अशीच कायम राखणार आहोत.

मित्रहो,

भारत आता सर्वार्थाने उद्योगासाठी सज्ज झाला आहे. उद्योग करणे आम्ही फार सुलभ केले आहे.

जागतिक बँकेच्या उद्योग करण्यासंदर्भातील  अहवालानुसार, जागतिक क्रमवारीत गेल्या चार वर्षात आम्ही 65 स्थानांनी झेप घेतली आहे.

2014 साली आम्ही 142 व्या स्थानावर होतो, आता आम्ही 77 व्या स्थानावर पोहोचलो आहोत आणि तरीही आमचे समाधान झालेले नाही. पुढच्या वर्षापर्यंत भारताने सर्वोच्च 50 देशांमध्ये स्थान मिळवावे, यासाठी मी माझ्या सहकाऱ्यांना अधिक परिश्रम करायला सांगितले आहे. आमची नियमने आणि प्रक्रिया जगात सर्वोत्कृष्ट असाव्यात, असे मला वाटते. उद्योग करणे आम्ही स्वस्त सुद्धा केले आहे.

वस्तू आणि सेवा कराची ऐतिहासिक अंमलबजावणी तसेच इतर करांचे सुलभीकरण आणि एकत्रीकरणामुळे व्यवहारांवरील खर्च आणि प्रक्रिया अधिक प्रभावी झाल्या आहेत.

डिजिटल प्रक्रिया, ऑनलाइन व्यवहार आणि एकल खिडकीसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही उद्योग करण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे.

थेट परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत आम्ही जगातील सर्वाधिक खुले धोरण असणाऱ्या देशांमध्ये समाविष्ट आहोत. आमच्या अर्थकारणातील बहुतेक क्षेत्रे आता थेट परकीय गुंतवणुकीसाठी खुली करण्यात आली आहेत. अशा उपक्रमांसाठी 90 टक्क्यांपेक्षा जास्त मंजुऱ्या ऑटोमॅटिक पद्धतीने प्रदान केल्या जातात. अशा काही सुधारणांमुळे आमची अर्थव्यवस्था विकासाच्या मार्गावर वेगाने घोडदौड करत आहे. गेल्या चार वर्षांमध्ये आम्हाला 263 अब्ज डॉलर्स इतकी थेट परकीय गुंतवणूक प्राप्त झाली आहे. हे प्रमाण, गेल्या अठरा वर्षात प्राप्त झालेल्या एकूण गुंतवणुकीच्या 45 टक्के इतके आहे.

आणि मित्रहो, आम्ही उद्योग करणे अधिक कुशलतेचेही केले आहे. शासकीय खरेदी आणि प्रापणासंबंधी व्यवहार, माहिती तंत्रज्ञानाधारित व्हावेत, यासाठी आम्ही आग्रही आहोत. डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून सरकारी लाभांचे थेट हस्तांतरण करण्याबाबत संपूर्ण अंमलबजावणी सुरू आहे. स्टार्ट अपच्या बाबतीत आम्ही जगातील सर्वात विशाल व्यवस्था आहोत आणि त्यातील कित्येक स्टार्ट अप तंत्रज्ञानाच्या बाबतीत उत्तम प्रगती करत आहेत. म्हणूनच आमच्यासोबत उद्योग करणे ही सर्वोत्कृष्ट संधी आहे, असे मी निश्चितच म्हणू शकतो.

थेट परकीय गुंतवणुकीसाठी यु एन सी टी ई डी ने अधिसूचित केलेल्या सर्वोच्च 10 देशांमध्ये आमचा समावेश आहे, हेसुद्धा त्यामागचे एक महत्त्वाचे कारण आहे. ज्ञान आणि ऊर्जेने परिपूर्ण अशा कुशल व्यावसायिकांची मांदियाळी आमच्याकडे उपलब्ध आहे. उच्चशिक्षित आणि जागतिक दर्जाच्या अभियांत्रिकीसह उत्कृष्ट संशोधन आणि विकासासंबंधी उत्तम सुविधा आमच्याकडे उपलब्ध आहेत. सकल देशांतर्गत उत्पादनातील वाढ, मध्यमवर्गाच्या प्रमाणात झालेली वाढ आणि त्यांच्या क्रयशक्तीतील वाढ यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. गेल्या दोन वर्षात आम्ही कॉर्पोरेट क्षेत्रात कमी कर आकारणीच्या दिशेने वाटचाल केली आहे. नव्या गुंतवणुकी बरोबरच लघु आणि मध्यम उद्योगांसाठी आम्ही करांचे प्रमाण 30 टक्क्यांवरून 25 टक्‍क्‍यांवर आणले आहे. आयपीआर बाबत बोलायचे तर आम्ही नवी दर्जेदार धोरणे आणली आहेत. आजघडीला आम्ही व्यापार क्षेत्रात वेगाने विकसित होत आहोत. दीर्घकालीन कायदेशीर आणि वित्तीय लढ्यांच्या जोखडातून उद्योगांना मुक्त ठेवण्याच्या दृष्टीने नादारी आणि दिवाळखोरी कायदा उपयुक्त ठरणारा आहे.

अशाप्रकारे उद्योग सुरू करण्यापासून त्याचे परिचालन आणि समाप्तीपर्यंत आम्ही नवीन संस्था, प्रक्रिया आणि कार्यपद्धती अस्तित्वात आणण्याकडे आम्ही पुरेपूर लक्ष दिले आहे. उद्योग करण्याबरोबरच लोकांचे आयुष्य सुखकर करण्यासाठीही हे सर्व महत्त्वाचे आहे. एक युवा देश म्हणून रोजगारांची आणि अधिक चांगल्या पायाभूत सुविधांची निर्मिती करणे आवश्यक आहे, याची आम्हाला जाणीव आहे. या दोन्ही बाबी गुंतवणूकीशी संबंधित आहेत. त्याचमुळे अलीकडच्या वर्षांमध्ये उत्पादन आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला आहे.

आमच्या युवावर्गासाठी रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीने उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यावर आम्ही भर दिला आहे. मेक इन इंडिया सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून गुंतवणुकीला चालना देतानाच डिजिटल इंडिया आणि स्किल इंडिया अशा कार्यक्रमांनी त्याला हातभार लावला आहे. आमच्या औद्योगिक पायाभूत सुविधा, धोरणे आणि कार्यपद्धती जागतिक दर्जाच्या असाव्यात आणि त्यायोगे भारताला जागतिक दृष्ट्या उत्पादनाचे केंद्र म्हणून विकसित करता यावे, यावर आम्ही भर दिला आहे.

स्वच्छ ऊर्जा आणि हरित विकास. उत्पादनात शून्य दोष. ही आहे आमची वचनबद्धता. पर्यावरणातील बदलांचा परिणाम कमी करण्यासाठी काम करण्याबाबत आम्ही जगाप्रति वचनबद्ध आहोत. ऊर्जेबाबत बोलायचे झाले तर जगात आम्ही नवीकरणीय ऊर्जा उत्पादनाच्या बाबतीत पाचव्या क्रमांकावर आहोत. पवन ऊर्जेच्या क्षेत्रात आम्ही चौथ्या तर सौरऊर्जेच्या क्षेत्रात आम्ही पाचव्या स्थानावर आहोत.

रस्ते, बंदरे, रेल्वे, विमानतळ, दूरसंचार, डिजिटल नेटवर्क आणि ऊर्जा क्षेत्रासह अत्याधुनिक पायाभूत सुविधा क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्यावर आमचा विशेष भर आहे. आमच्या नागरिकांच्या उत्पन्नात वाढ करण्याबरोबरच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सामाजिक, औद्योगिक आणि कृषी विषयक पायाभूत सुविधांमध्येही आम्ही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहोत. उदाहरणच द्यायचे झाले तर चार वर्षांमध्ये वीज उत्पादन आणि क्षमता उभारणीत अधिकतम वाढ झाली आहे. पहिल्यांदाच भारत विजेची निर्यात करत नाही. फार मोठ्या प्रमाणावर आम्ही एलईडी बल्बचे वितरण केले आहे. या सर्वामुळे ऊर्जेची मोठ्या प्रमाणावर बचत झाली आहे. अतिशय वेगाने आम्ही ट्रान्समिशन लाईनचे काम पूर्ण केले आहे. रस्ते बांधणीचा आमचा वेग जवळजवळ दुप्पट झाला आहे. महत्त्वाच्या बंदरांमध्ये आम्ही वेगाने क्षमता वृद्धी केली आहे. ग्रामीण भागात  रस्ते जोडणीचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. नव्या रेल्वे मार्गाची उभारणी, रूळ परिवर्तन, दुपदरीकरण आणि रेल्वेच्या विद्युतीकरणाचे कामही दुप्पट वेगाने सुरू आहे. ऑनलाइन प्रक्रियेच्या माध्यमातून आम्ही महत्वाचे प्रकल्प वेगाने मार्गी लावण्यासाठी नियमितपणे प्रयत्न करीत आहोत. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी क्षेत्र आम्ही अधिक गुंतवणूकदार स्नेही केले आहे. सरासरी 7.3 टक्के इतक्या देशांतर्गत उत्पादनाच्या विकास दरासह आमच्या सरकारने साध्यकेलेला विकासदर हा 1991 नंतर भारत सरकारने साध्य केलेला सर्वोच्च विकासदर आहे. त्याचवेळी चलनवाढीचा दर 1991 सालानंतर, जेव्हा भारताने उदारीकरणाची प्रक्रिया सुरू केली होती, तेव्हापासून आतापर्यंत, 4.6 टक्के इतका कमी राखण्यात आम्हाला यश मिळाले आहे.

विकासाची फळे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सहज आणि सक्षमपणे पोहोचली पाहिजेत, असे आम्हाला वाटते.

उदाहरणच द्यायचे झाले तर आता आमच्या देशातील प्रत्येक कुटुंबाकडे बँक खाते आहे. कोणत्याही तारणाशिवाय आम्ही लहान उद्योगांना कर्ज देतो. आमच्या देशातील जवळपास प्रत्येक घरात आता वीज आली आहे. देशातील बहुतेक घरांमध्ये आता स्वयंपाकाचा गॅस पोहोचला आहे, जे यापूर्वी त्यांना परवडणारे नव्हते. ग्रामीण आणि शहरी अशा सर्वच क्षेत्रांमध्ये पुरेशी स्वच्छता बाळगली जाईल, याची आम्ही खातरजमा केली आहे. सर्व घरांसाठी प्रसाधनगृहे आणि त्यांचा योग्य वापर करण्याच्या दिशेने आम्ही काम करत आहोत.

सभ्य स्त्री-पुरुषहो,

आजघडीला आम्ही जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या पर्यटनस्थळांमध्ये  समाविष्ट होतो. 2016 दरम्यान भारताचा विकासदर 14 टक्के होता तर त्याचवेळी जागतिक विकासदर 7 टक्के इतका होता‌. हवाई वाहतूक क्षेत्रातही आम्ही सर्वाधिक वेगाने विकसित होणारी बाजारपेठ आहोत. गेल्या चार वर्षांत प्रवासी तिकीट खरेदी संदर्भात दोन आकडी विकासदर आम्ही गाठला आहे.

अशाप्रकारे नवभारत आकाराला येत आहे जो आधुनिक असेल स्पर्धात्मक असेल आणि त्याच वेळी काळजी घेणारा आणि सहृदय असेल. आयुष्मान भारत ही आमची वैद्यकीय सहाय्य सेवा अशाच सहृदयतेचे उत्तम उदाहरण आहे ही योजना 500 दशलक्ष लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. ही लोकसंख्या अमेरिका कॅनडा आणि मेक्सिकोच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षाही कितीतरी जास्त आहे. आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून आरोग्य विषयक पायाभूत सुविधा, वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन आणि आरोग्य सेवा क्षेत्रात गुंतवणुकीच्या असंख्य संधी उपलब्ध होणार आहेत.

मी तुम्हाला आणखी काही उदाहरणे देतो. देशातील 50 शहरे मेट्रो रेल्वे यंत्रणा उभारण्यासाठी सज्ज आहेत. आम्हाला 50 दशलक्ष घरे बांधायची आहेत. रस्ते, रेल्वे आणि जलमार्गांची आवश्यकताही मोठी आहे. आमचे ध्येय वेगाने आणि स्वच्छ पद्धतीने साध्य करण्यासाठी आम्हाला जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे.

मित्रहो, अशाप्रकारे भारत ही असंख्य संधींची भूमी आहे. ही अशी एकमेव जागा आहे, जिथे तुम्हाला लोकशाही, लोकसंख्या आणि मागणी या तिन्ही बाबी एकत्र उपलब्ध आहेत. जे आधीपासूनच भारतात आहेत, त्यांना मी दिलासा देऊ इच्छितो की आमची लोकशाही यंत्रणा, मानवी मूल्ये आणि सक्षम न्याययंत्रणा आपल्या गुंतवणुकीच्या सुरक्षेची हमी देईल. गुंतवणुकीसंदर्भातील वातावरण अधिक उत्तम करण्यासाठी आणि स्वतःला  स्पर्धात्मक दृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.

जे अद्याप भारतात आलेले नाहीत, मी त्यांना आमंत्रण देतो आणि येथील संधींचा शोध घेण्यासाठी प्रोत्साहित करतो. येथे असण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. गुंतवणूकदारांना व्यक्तिशः मदत करण्यासाठी आम्ही समर्पित मार्गांची सोय केलेली आहे. आपल्या या प्रवासात आपले हात धरण्यासाठी मी नेहमीच उपलब्ध असेन, याची ग्वाही सुद्धा मी देतो.

धन्यवाद. मनापासून धन्यवाद. अनेकानेक आभार.

 

 

 

B.Gokhale/M.Pange/D. Rane

 



(Release ID: 1560719) Visitor Counter : 99


Read this release in: English