पंतप्रधान कार्यालय
गांधीनगर येथे नवव्या व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
भारत व्यवसायासाठी सज्ज असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
भारताबरोबर व्यवसाय ही सर्वात मोठी संधी असल्याचे सांगत उद्योजकांना भारतात गुंतवणूक करण्याचे दिले निमंत्रण
लोकशाही, सर्वाधिक तरुण संख्या आणि मागणी उपलब्ध असणारे भारत हे एकमेव ठिकाण
अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सखोल रचनात्मक सुधारणा : पंतप्रधान
Posted On:
18 JAN 2019 6:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जानेवारी 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गांधीनगर येथे महात्मा मंदीर प्रदर्शन केंद्रात नवव्या व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेचे उद्घाटन केले. उझबेकिस्तान, रवांडा, डेन्मार्क, झेक प्रजासत्ताक आणि माल्टा या देशांचे प्रमुख, विविध क्षेत्रातील उद्योजक आणि देशातील तसेच परदेशातील 30,000 हून अधिक प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होत आहेत.
भारतातील व्यवसायाचे वातावरण हे अधिक गुंतवणूकस्नेही बनले असून जागतिक उद्योजक आणि कंपन्यांना त्यांनी भारतात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित केले. पंतप्रधान म्हणाले की, “ भारत आता व्यवसायासाठी सज्ज झाला आहे. गेल्या चार वर्षात आम्ही व्यवसाय सुलभतेच्या जागतिक क्रमवारीत 65 स्थानांनी झेप घेतली आहे. आगामी काळात अव्वल 50 देशांमध्ये स्थान मिळवण्यासाठी मी माझ्या टीमला कठोर परिश्रम करायला सांगितले आहे.”
जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि मुडीसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि अलीकडच्या काळात हाती घेण्यात आलेल्या सुधारणांमध्ये विश्वास दर्शवला आहे असे मोदी म्हणाले. आम्ही व्यवसायीकरण हे अधिक किफायतशीर बनवले आहे. “जीएसटीची अंमलबजावणी आणि कर सुलभीकरणाच्या अन्य उपाययोजनांमुळे व्यवहारांचा खर्च कमी झाला असून प्रक्रिया अधिक कार्यक्षम बनवल्या आहेत. डिजिटल प्रक्रिया आणि एकल इंटरफेसच्या माध्यमातून आम्ही व्यवसाय करणं अधिक वेगवान बनवले आहे.” असेही पंतप्रधानांनी सांगितले.
भारताचा विकास आणि त्याची मजबूत, आर्थिक, मुलभूत तत्व यांचे महत्व अधोरेखित करतांना पंतप्रधान म्हणाले, “ सध्या भारताचा सरासरी विकास दर 7.3 टक्के असून 1991 नंतरच्या कोणत्याही भारतीय सरकारच्या काळातील विकासदरापेक्षा सर्वाधिक आहे. त्याचबरोबर चलनवाढीचा दरही 4.6 टक्के असून 1991 नंतर कुठल्याही भारतीय सरकारच्या काळातील हा निचांकी दर आहे.”
“जे भारताला नियमितपणे भेट देतात त्यांना इथल्या वातावरणात विशेषत: दिशा आणि तीव्रतेत नक्कीच बदल जाणवेल. गेल्या चार वर्षात सरकारचा आकार कमी करुन प्रशासन वाढवणे हे माझ्या सरकारचे उदिृष्ट राहिले आहे. आमची अर्थव्यवस्था आणखी बळकट करण्यासाठी अधिक रचनात्मक सुधारणा आम्हाला करायची आहे. आम्ही जगातील वेगवान अर्थव्यवस्थांपैकी एक राहू.” असे पंतप्रधान म्हणाले.
स्टार्ट अप्सबाबत भारत एक सर्वात मोठी परिसंस्था बनला असून इथल्या जागतिक दर्जाच्या संशोधन सुविधांमुळे गुंतवणुकीसाठी योग्य वातावरण उपलब्ध झाले आहे असे पंतप्रधान म्हणाले. युवकांसाठी रोजगार निर्मिती करण्यासाठी निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कठोर मेहनत घेतली आहे. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत गुंतवणुकीला डिजिटल इंडिया आणि स्कील इंडिया सारख्या कार्यक्रमांद्वारे चांगले समर्थन लाभले आहे असे पंतप्रधान म्हणाले.
जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या पर्यटनस्थळांच्या क्रमवारीत 2017 मध्ये आम्ही अव्वल स्थानावर होतो. 2016 च्या तुलनेत भारताने 14 टक्के वाढ नोंदवली तर जागतिक वाढीचा दर सरासरी 7 टक्के होता. आमची जगातील सर्वात वेगाने वाढणारी विमान वाहतूक बाजारपेठ आहे. गेल्या चार वर्षात प्रवासी तिकिटांच्या बाबतीत आम्ही दोन अंकी वाढ नोंदवली आहे असे पंतप्रधान म्हणाले. अशा प्रकारे भारत ही अमाप संधी असलेली भूमी आहे हे एकच ठिकाण आहे जिथे तुम्हाला लोकशाही, तरुणांची सर्वाधिक संख्या आणि मागणी या तिनही गोष्टी उपलब्ध असल्याचे आढळले.
व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेबाबत बोलतांना ते म्हणाले की, ही परिषद आता जागतिक मंच म्हणून उदयाला आली आहे आणि एवढ्या नेत्यांची उपस्थिती दर्शवते की, आंतरराष्ट्रीय सहकार्य हे केवळ राष्ट्रीय राजधान्यांपर्यंत मर्यादित न राहता राज्यांच्या राजधानीपर्यंत विस्तारली आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या धोरणाभिमुख प्रशासन आणि दूरदर्शी नेतृत्वाची प्रशंसा केली आणि व्यवसाय सुलभतेसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य पुरवण्याचे आश्वासन उद्योग क्षेत्रातील प्रमुखांना दिले.
या प्रसंगी उझबेकिस्तानचे राष्ट्रपती शौकत मिर्झीयोयेव, डेन्मार्कचे पंतप्रधान लार्स लोके रसमुसेन, झेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान आंद्रेज बाबीस आणि माल्टाचे पंतप्रधान डॉ. जोसेफ मस्कत उपस्थित होते.
इज्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिलेला खास संदेश हे या व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेच्या ठळक वैशिष्ट्यांपैकी एक होते. त्यांनी म्हटले आहे की, “ उभय देशांच्या जनतेमधील सामर्थ्यशाली संबंधांचे गुजरात हे प्रतीक आहे. आम्ही एकत्रितपणे भविष्यासाठी अमर्यादीत संधी निर्माण करत आहोत.
या तीन दिवसीय परिषदेतील प्रमुख कार्यक्रमांमध्ये जागतिक निधीच्या प्रमुखांबरोबर गोलमेज बैठक, ‘आफ्रिका डे’, एमएसएमई परिषद, विज्ञान-तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणितामधील संधींबाबत गोलमेज बैठक यांचा समावेश आहे. याशिवाय भविष्यातील तंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधन यावरील प्रदर्शन, बंदरप्रणीत विकासावरील चर्चासत्र आणि भारताला आशियाचे ट्रान्स शीपमेंट केंद्र म्हणून स्थापित करण्याची रणनीती तसेच ‘मेक इन इंडिया’ आणि अन्य प्रमुख उपक्रमांच्या यशोगाथांवरील चर्चासत्र आयोजित करण्यात आली आहेत.
पहिली व्हायब्रंट गुजरात शिखर परिषद 2003 मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेमुळे अन्य राज्यांनी देखील व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी अशा प्रकारच्या परिषदांचे आयोजन करायला सुरुवात केली आहे.
B.Gokhale/S.Kane/P.Malandkar
(Release ID: 1560540)
Visitor Counter : 136