पंतप्रधान कार्यालय

अहमदाबाद शॉपिंग फेस्टिवल-2019 चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन


सरकार देशात व्यवसायासाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी निरंतर कार्यरत असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन

Posted On: 17 JAN 2019 11:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 जानेवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथे साबरमती नदीच्या किनारी अहमदाबाद शॉपिंग फेस्टीवल-2019 चे उद्‌घाटन केले. या महोत्सवात गुजरातमधील फेरीवाले विक्रेत्यांपासून शॉपिंग मॉलपर्यंत, कारागीरांपासून हॉटेल-रेस्टॉरंटशी संबंधित व्यवसायापर्यंत सर्वजण आपली उत्पादने दाखवण्यासाठी आणि त्यांचा प्रचार करण्यासाठी एकत्र आले आहेत. व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेच्या बरोबरीने आयोजन करण्यात आल्यामुळे हा महोत्सव खास आहे.

यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले. या आयोजनाची प्रशंसा करतांना ते म्हणाले, साधारणपणे आपण परदेशातच अशा प्रकारच्या मोठ्या व्यापार परिषदांचे आयोजन झालेले पाहतो. आता व्हायब्रंट गुजरात तसेच अहमदाबाद शॉपिंग फेस्टीवलचा प्रारंभ हे प्रशंसनीय उपक्रम आहेत.

पंतप्रधान म्हणाले की, सरकार देशात व्यवसायासाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी निरंतर कार्यरत आहे. गेल्या चार वर्षात जुने कायदे रद्द करण्यात आले तर शेकडो नियम सोपे सुलभ बनवण्यात आले. अशा प्रकारच्या प्रयत्नांमुळेच आपण व्यवसाय सुलभतेसाठी मानांकनात 142 वरुन 77 वर झेप घेतली आहे. आम्ही छोट्या उद्योजकांसाठी प्रक्रिया सोप्या करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहोत. आपण अशा व्यवस्थेकडे वळत आहोत जिथे बँका छोट्या उद्योजकांना जीएसटी आणि अन्य विवरणपत्रांच्या आधारे कर्ज देऊ शकतील. आम्ही 1 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज 59 मिनिटांत मंजूर करत आहोत.

तत्पूर्वी पंतप्रधानांनी गांधीनगर येथे महात्मा मंदीर प्रदर्शन केंद्रात व्हायब्रंट गुजरात जागतिक व्यापार प्रदर्शनाचे उद्‌घाटन केले. त्याचबरोबर 18-20 जानेवारी दरम्यान गांधीनगर येथे होणाऱ्या नवव्या व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेसाठी सगळे सज्ज झाले आहेत. या परिषदेत राष्ट्रप्रमुख, जागतिक स्तरावरील उद्योजक आणि विचारवंत सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या परिषदेच्या उद्‌घाटन सत्राला संबोधित करतील.

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1560503) Visitor Counter : 55


Read this release in: English