पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय

कुंभमेळ्यातील स्वच्छता व्यवस्थेचा उमा भारती यांनी घेतला आढावा; स्वच्छाग्रही सम्मेलनाला केले संबोधित

Posted On: 18 JAN 2019 1:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जानेवारी 2019

 

प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभमेळ्यात उत्तम स्वच्छता आणि स्वच्छ भारताबाबत जनजागृती करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्री उमा भारती यांनी आढावा घेतला. कुंभमेळ्यात स्वच्छता राखण्यासाठी उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांमधील 1500 स्वच्छाग्रही तैनात करण्यात आले आहेत. शौचालय स्वच्छतेवर देखरेख ठेवणे आणि जनजागृती करण्याचे काम स्वच्छाग्रहींवर सोपवण्यात आले आहे. आयसीटी ॲपवर ही देखरेख ठेवण्यात येत असून या माध्यमातून स्वच्छतेची स्थिती नोंदवली जात आहे. उमा भारती यांनी यावेळी 50 स्वच्छाग्रहींना स्वच्छता कीट वितरित केली तसेच स्वच्छ गाव संकल्पनेवर आधारित एका प्रदर्शनाचे उद्‌घाटनही केले.

कुंभमेळ्यात खास आयोजित स्वच्छाग्रही सम्मेलनाला उमा भारती यांनी संबोधित केले. कुंभमेळा स्वच्छ आणि सुरक्षित बनवण्यासाठी मेळा आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. गेल्या दोन वर्षात उत्तर प्रदेशातील स्वच्छतेची व्याप्ती 48 टक्क्यांवरुन 100 टक्क्यांवर नेल्याबद्दल त्यांनी उत्तर प्रदेश सरकारचे अभिनंदन केले. स्वच्छतेमध्ये महिलांनी दिलेल्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली.

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही स्वच्छाग्रहींच्या कामाची प्रशंसा केली. स्वच्छता हे प्रत्येकाचे कर्तव्य असायला हवे असे ते म्हणाले.

यावर्षी कुंभमेळ्यात 1.22 लाख सार्वजनिक शौचालय आणि 20,000 कचरापेट्या उभारण्यात आल्या आहेत.

 

N.Sapre/S.Kane/P.Malandkar

 



(Release ID: 1560449) Visitor Counter : 83


Read this release in: English