पंतप्रधान कार्यालय

व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेचा एक भाग असलेल्या जागतिक व्यापार प्रदर्शनाचे गांधी नगर येथे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन


आणखी एक प्रमुख आकर्षण असलेला अहमदाबाद शॉपिंग फेस्टीवल आज सुरु होणार
व्हायब्रंट गुजरात शिखर परिषद 2019 उद्या गांधीनगरमध्ये सुरु होणार
गुजरातमध्ये गुंतवणुकीला चालना देण्यासाठी नवव्या व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेचे पंतप्रधान करणार उद्‌घाटन

Posted On: 17 JAN 2019 4:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 जानेवारी 2019

 

गांधी नगर येथे उद्या महात्मा मंदीर प्रदर्शन केंद्रात नववी व्हायब्रंट गुजरात शिखर परिषद सुरु होत आहे. गुजरातमध्ये गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आयोजित या परिषदेच्या उद्‌घाटन सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील.

18 ते 20 जानेवारी दरम्यान होणाऱ्या व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेचा एक भाग असलेल्या जागतिक व्यापार प्रदर्शनाचे पंतप्रधानांनी आज उद्‌घाटन केले. पंतप्रधानांनी यावेळी ­विविध दालनांना भेट दिली आणि इस्रो, डीआरडीओ, खादी वगैरांच्या दालनांमध्ये रुची दाखवली. ‘चरखा ते चंद्रायान’ अशी याची टॅग लाईन होती. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि अन्य मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. दोन लाख चौरस मीटर परिसरात हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून 25 हून अधिक औद्योगिक आणि व्यापार क्षेत्र एकाच छताखाली उपलब्ध असतील.

या परिषदेच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. यापैकी एक प्रमुख आकर्षण असलेल्या अहमदाबाद शॉपिंग फेस्टीवलचे उद्‌घाटन आज संध्याकाळी पंतप्रधान करणार आहेत. यावेळी पंतप्रधान व्हायब्रंट गुजरात अहमदाबाद शॉपिंग फेस्टीवलच्या मॅसकॉटचे उद्‌घाटन करतील. अहमदाबाद शॉपिंग फेस्टीवल हा भारतातील अशा प्रकारचा पहिलाच महोत्सव आहे. शहरातील उद्योगांना त्यांची उत्पादने सादर करण्यासाठी यामुळे संधी मिळेल.

व्हायब्रंट गुजरातचा भाग म्हणून आयोजित अनेक महत्वपूर्ण कार्यक्रमांव्यतिरिक्त या शिखर परिषदेत ज्ञानाच्या आदान-प्रदानातून वैविध्य आणि सहभागी झालेल्या देशांमधील संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने नवीन मंच सुरु करण्यात आले आहेत.

पार्श्वभूमी:-

2003 मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातला पसंतीचे गुंतवणूक केंद्र बनवण्यासाठी व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेमुळे जागतिक, सामाजिक, आर्थिक विकास, ज्ञानाचे आदान-प्रदान आणि उपयुक्त भागीदारी करण्यासाठी एक मंच उपलब्ध झाला आहे.

व्हायब्रंट गुजरात 2019 ची ठळक वैशिष्ट्ये:-

  1. भारतात विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित, शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील संधींबाबत गोलमेज चर्चा होईल. या कार्यक्रमाला शिक्षण क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती आणि प्रमुख धोरणकर्ते उपस्थित राहणार आहेत.
  2. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित यावरील आंतरराष्ट्रीय परिषद
  3. भविष्यातील तंत्रज्ञान आणि अवकाश शोधाबाबत प्रदर्शनात भविष्यातील अंतराळ प्रवासाचे चित्र सादर केले जाईल.
  4. भारताला आशियाचे ट्रान्स शीपमेंट केंद्र म्हणून स्थापित करण्यासाठी बंदर प्रणीत विकास आणि धोरणांबाबत चर्चासत्र
  5. ‘मेक इन इंडिया’ आणि सरकारच्या अन्य उपक्रमांची यशोगाथेचे दर्शन घडवण्यासाठी ‘मेक इन इंडिया’वरील चर्चासत्र
  6. प्रदर्शनात सहभागी झालेल्यांना गुजरातमध्ये संरक्षण आणि अवकाश क्षेत्रातील संधींबाबत माहिती देण्यासाठी आणि भारत व गुजरात यांना संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रासाठी निर्मिती केंद्र म्हणून स्थापित करण्याबाबत चर्चासत्र

2003 मध्ये सुरु झालेल्या व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेमुळे अन्‍य राज्यांनी देखील व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी अशा प्रकारच्या परिषदांचे आयोजन करायला सुरुवात केली आहे.    

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 



(Release ID: 1560340) Visitor Counter : 113


Read this release in: English