पंतप्रधान कार्यालय
ओदिशामध्ये बालांगिर येथे विविध विकास प्रकल्पांचा पायाभरणी समारंभ आणि उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
Posted On:
15 JAN 2019 5:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जानेवारी 2019
भारत माता की जय!! ओदिशाचे राज्यपाल प्राध्यापक गणेश लालजी सिंह जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री जुवेल ओरामजी, धर्मेंद्र प्रधानजी, ओदिशा सरकारमधील मंत्री स्नेहागिनी छोरीयाजी, संसदेतील माझे मित्र सहकारी श्री किलीकेश नारायण सिंह देवजी आणि येथे उपस्थित माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, नवीन वर्षात पुन्हा एकदा मला ओदिशामध्ये येण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी येथे येणे आणि विकासाच्या नव्या प्रकाशाशी जोडले जाणे, ही फार महत्त्वाची बाब आहे. सणाच्या या पवित्र प्रसंगी आपणा सर्व देशवासीयांना, देशातील सर्वच नागरिकांना अनेकानेक शुभेच्छा.
मित्रहो, पूर्व भारताच्या, ओदिशाच्या विकासासाठी, केंद्र सरकारची मोहीम सातत्याने सुरू आहे. गेल्या एका महिन्याभरात मी तिसऱ्यांदा येथे आलो आहे. काही वेळापूर्वीच येथे साडे पंधरा कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण किंवा पायाभरणी करण्यात आली. हे प्रकल्प शिक्षणाशी संबंधित आहेत, दळणवळणाशी संबंधित आहेत, संस्कृती आणि पर्यटनाशी संबंधित आहेत. सोनेपुर येथे केंद्रीय विद्यालयाचा पायाभरणी समारंभ झाला, त्याबद्दल मला मनापासून आनंद वाटतो. जेव्हा हे काम पूर्ण होईल तेव्हा सोनेपुरसह या संपूर्ण क्षेत्रातील हजारो विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. ओदिशामधील केंद्रीय विद्यालयातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथे केंद्रीय विद्यालयाची मागणी लक्षात घेत केंद्र सरकारने अनेक पावले उचलली आहेत. 2014 सालानंतर येथे अनेक नव्या केंद्रीय विद्यालयांचे उद्घाटन झाले आहे तर काहींचे काम अंतिम टप्प्यात आहे.
मित्रहो, शिक्षण हे मनुष्यबळ विकसित करण्याचे काम करते. जेव्हा याला दळणवळणाची साथ मिळते तेव्हा हे स्रोत, संधी उपलब्ध करून देतात. हाच विचार लक्षात घेत ओदिशामध्ये दळणवळणाचा विस्तार केला जात आहे. आज रेल्वेशी संबंधित सहा प्रकल्पांचे लोकार्पण किंवा उद्घाटन करण्यात आले आहे. यामुळे देशातील अंतर्गत दळणवळण सुधारेल, त्याचबरोबर देशातील इतर राज्यांमध्ये येणे-जाणे सोयीचे होईल. त्यामुळे आपणा सर्वांना प्रवासाची सुविधा प्राप्त होईल, त्याचबरोबर शेतकरी बांधवांना आपली उत्पादने मोठ्या बाजारपेठांमध्ये किंवा मोठ्या शहरांमध्ये पोहोचवणे सोपे होईल. प्रवास आणि मालवाहतुकीसाठीच्या सुविधा निर्माण झाल्यामुळे येथील उद्योगांसाठीही अधिक चांगले वातावरण निर्माण होईल. जेव्हा येथे उद्योग येऊ लागतील तेव्हा युवकांसाठीही रोजगाराची अनेक साधने विकसित होतील.
मित्रहो, बलांगीर पासून बिच्छूपल्ली दरम्यान जो नवा रेल्वेमार्ग तयार झाला आहे, त्याचे काही वेळापूर्वीच उद्घाटन झाले आहे. त्याचबरोबर या रेल्वे मार्गावर नव्या रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. त्याबद्दल मी आपणा सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. याव्यतिरिक्त झारसुघडा येथील मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्ट झारसुघडा विजिनगराम आणि संभलपुर अंगुल मार्गाचे विद्युतीकरण, बारपली डुगरीपल्ली आणि बलांगीर देवगांवचे रूंदीकरण तसेच नागावली नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाबद्दल सुद्धा मी आपले अभिनंदन करतो, आपणास शुभेच्छा देतो.
मित्रहो, जेव्हा दळणवळण चांगले असते तेव्हा बहुतेक सर्वच क्षेत्रांवर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. विशेषतः पर्यटनासाठीच्या संधी सर्वात जास्त वाढतात. ओदिशा पूर्वीपासूनच पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. येथे जंगल आहे आणि सागर किनारा सुद्धा आहे. निसर्गाने येथे मुक्तहस्ताने उधळण केली आहे. त्याचप्रमाणे हे ठिकाण, इतिहास आणि श्रद्धेचे एक केंद्र मानले गेले आहे.
मित्रहो, याच भावनेला अनुसरून गेल्या चार वर्षांपासून केंद्र सरकार वारसा आणि श्रद्धेशी संबंधित स्थानांचा विकास करण्यास प्रयत्नशील आहे. ओदीशामधील अनेक मंदिरे, जुने किल्ले आणि इतर अनेक ठिकाणांचे सौंदर्यीकरण करण्याबरोबरच ती ठिकाणे अधिक चांगली करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून नील माधव आणि सिद्धेश्वर मंदिराच्या नुतनीकरण आणि सौंदर्यीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. अशाच प्रकारे पश्चिम सोमनाथ मंदिर, भुवनेश्वर मंदिर आणि कपिलेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे आणि सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण झाले आहे आणि आज त्याचे लोकार्पण सुद्धा झाले आहे. त्याव्यतिरिक्त येथे जो एक पारंपारिक व्यापारी मार्ग आहे, जो देशाला मध्य भारताशी जोडतो, या मार्गावर अनेक ऐतिहासिक स्मारके आहेत. येथे बलांगिरमध्येच राणीपूर झरयाल हा स्मारकांचा समूह आहे. त्याचीही देखभाल केली जाते आहे. तेथील 64 योगिनींचे मंदिर असो किंवा लहरागुणी, सोमेश्वर रानीगुणी किंवा इंद्राणी मंदिर, अशी सर्वच मंदिरे आणि आमची ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे, वारसा जपणाऱ्या या सर्व वास्तूंची भव्यता आणि दिव्यता वाढणार आहे.
मित्रहो, आणखी एका स्मारकाच्या नुतनीकरणाला आज सुरुवात झाली आहे. कालाहंडी येथील असुरागढ हा किल्ला, आमच्या शौर्याचे प्रतिक आहे, त्याचबरोबर ते एक महत्त्वाचे राजकीय आणि व्यापारी केंद्र सुद्धा होते. महाकंतारा आणि कलिंगला जोडणारे हे केंद्र आहे. आपल्या इतिहासातील या स्वर्णीम ठिकाणांशी पुन्हा एकदा जोडले जाताना मला मनापासून आनंद होतो आहे. येथे पायाभूत सुविधांचा विकास झाला आहे, भाविक आणि पर्यटकांसाठी जे काम करण्यात आले आहे, त्यामुळे येथे पर्यटनाला चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधींमध्ये कित्येक पटींनी वाढ होईल, असा विश्वास मला वाटतो.
मित्रहो, आज येथे सहा नव्या टपाल कार्यालय पारपत्र सेवा केंद्रांचाही शुभारंभ झाला आहे. बलांगिर व्यतिरिक्त जगतसिंहपुर, केंद्रपाडा, पुरी, फुलबानी आणि बारगढ येथे ही नवीन केंद्रे सुरू झाल्यामुळे आता येथील नागरिकांना पारपत्रासाठी फार दूर जावे लागणार नाही.
मित्रहो, आज आपणा सर्वांचे, ओदिशावासियांचे आयुष्य अधिक सोपे करणाऱ्या या सर्व प्रकल्पांबद्दल मी पुन्हा एकदा ओदिशावासियांचे मनापासून अभिनंदन करतो. आपणा सर्वांना नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा देतो.
अनेकानेक आभार!!
B.Gokhale/M.Pange/P.Malandkar
(Release ID: 1560312)
Visitor Counter : 68