पंतप्रधान कार्यालय

पश्चिम ओदिशा आणि किनारपट्टी भागात पायाभूत विकास, संपर्क आणि व्यवसाय सुलभतेला चालना मिळणार


पंतप्रधान उद्या ओदिशातल्या बालनगीरला भेट देणार आणि अनेक प्रकल्पांचा शुभारंभ करणार
झारसुगुडा येथील मल्टि-मोडल लॉजिस्टिक्स पार्क राष्ट्राला समर्पित करणार
बालनगीर आणि बिचुपाली दरम्यान नवीन रेल्वेमार्गाचे उद्‌घाटन करणार

Posted On: 14 JAN 2019 6:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जानेवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 15 जानेवारी 2019 रोजी ओदिशातील बालनगीरला भेट देणार आहेत. झारसुगुडा येथील मल्टिमोडल लॉजिस्टिक्स पार्क आणि अन्य विकास प्रकल्पांचे लोकार्पण ते करणार आहेत. बालनगीर-बिचुपाली दरम्यान नवीन रेल्वेमार्गाचे उद्‌घाटनही ते करणार आहेत. सोनेपूर येथील केंद्रीय विद्यालयाच्या कायमस्वरुपी इमारतीची पायाभरणीही ते करणार आहेत.

100 कोटी रुपये खर्चून झारसुगुडा येथील मल्टि मोडल लॉजिस्टिक्स पार्क बांधण्यात आले आहे. यामुळे खासगी मालवाहतुकीसह आयात-निर्यात आणि देशांतर्गत वाहतूक सुलभ होईल. झारसगुडा रेल्वेस्थानकापासून 5 किलोमीटर अंतरावर हावडा-मुंबई रस्त्याला लागून हे मल्टिमोडल लॉजिस्टिक्स पार्क आहे. याच्या आजूबाजूला पोलाद, सिमेंट, पेपर यासारखे अनेक महत्वपूर्ण उद्योग असून त्यांना याचा लाभ होईल. मल्टिमोडल लॉजिस्टिक पार्कमुळे झारसुगुडा हे ओदिशातील प्रमुख लॉजिस्टिक केंद्र म्हणून उदयाला येईल आणि राज्यातील व्यवसाय सुलभतेला चालना मिळेल. 15 किलोमीटर लांबीच्या बालनगीर-बिचुपली या नवीन रेल्वे मार्गामुळे ओदिशा किनारपट्टीचा भाग पश्चिम ओदिशाशी जोडला जाईल. यामुळे भुवनेश्वर आणि पुरी येथून नवी दिल्ली आणि मुंबईसारख्या प्रमुख शहरांमध्ये जाण्याचा प्रवासाचा वेळ कमी होईल. या रेल्वेमार्गामुळे ओदिशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना लाभ होईल आणि ओदिशातील खाण क्षेत्रासाठी नव्या संधी खुल्या होतील.

या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान पुढील विकास प्रकल्पांचा शुभारंभ करण्याची शक्यता आहे :-

  • 1085 कोटी रुपयांच्या झारसुगुडा-विझिनगरम आणि संबलपूर-अंगुल या 813 किलोमीटर रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाच्या लोकार्पणामुळे या मार्गावर वेगवान रेल्वेसेवा उपलब्ध होईल.
  • बारपाली आणि डुंगरीपाली आणि बालनगीर-देवगाव या 13.5 किलोमीटर रस्त्याच्या दुपद्रीकरणाचे लोकार्पण. या दुपद्रीकरणामुळे ओदिशातील औद्योगिक क्षमतेला चालना मिळेल.
  • थेरुवली-सिंगापूर स्थानकामधील पूल क्र. 588 चे लोकार्पण. यामुळे जुलै 2017 मध्ये वाहून गेलेल्या नागावेली नदीवरील पूल पुन्हा सुरु होईल.

पारपात्र सेवा सुलभ करण्यासाठी आणि लोकांना प्रवासात येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी जगतसिंह, केंद्रपारा, पुरी, कंधमाल, बारगढ आणि बालनगीर येथील नवीन पारपत्र सेवा केंद्रांचे उद्‌घाटन पंतप्रधान करतील. यामुळे या भागात राहणाऱ्या लोकांना खूप फायदा होईल. सध्या त्यांना पारपत्राशी संबंधित सेवांसाठी भुवनेश्वरला जावे लागते.

गंधहरदी (बौध) येथील नीलमाधव आणि सिद्धेश्वर मंदिरातील नूतनीकरण आणि दुरुस्तीच्या कामांचे उद्‌घाटनही पंतप्रधान करतील. ओदिशातील ही प्राचीन मंदिरे असून त्यात पश्चिम ओदिशाची ‘हरा-हरी’ संस्कृती आहे.

याशिवाय, प्राचीन व्यापार मार्गावर स्थित बालनगीर येथे रानीपूर झारियल स्मारक समूहाच्या नूतनीकरणाच्या कामाचे उद्‌घाटनही ते करतील.

कलहंदी येथील असुरगड किल्ल्याच्या नूतनीकरण आणि दुरुस्ती कामांचे उद्‌घाटनही पंतप्रधान करतील. प्राचीन ग्रंथांमध्ये असुरगड हे महत्वाचे राजकीय आणि व्यावसायिक केंद्र असल्याचा उल्लेख आहे.

सोनेपूरमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या कायमस्वरुपी इमारतीची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत. या इमारतीत अंदाजे 1 हजार शालेय विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधा उभारण्यात येणार आहेत.

एप्रिल 2014 नंतर पंतप्रधानांचा या शहराचा हा दुसरा दौरा आहे.

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1559912) Visitor Counter : 60


Read this release in: English