पंतप्रधान कार्यालय
आग्य्राला अधिक सुनियोजित पाणीपुरवठा करणाऱ्या गंगाजल प्रकल्पाचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ
आग्य्रासाठीच्या 2900 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन
Posted On:
09 JAN 2019 9:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जानेवारी 2019
आग्रा आणि परिसराचा विकास व्हावा आणि पर्यटनविषयक पायाभूत सुविधांचा विकास व्हावा यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 2900 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले.
आग्य्राला अधिक सुनियाजित पाणीपुरवठा करणाऱ्या 2880 कोटी रुपये अंदाजित खर्चाचा गंगाजल प्रकल्प पंतप्रधानांनी राष्ट्राला अर्पण केला. गंगाजल प्रकल्पाद्वारे गंगा नदीचे 140 क्युसेक पाणी आग्रा शहरासाठी आणण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे शहराच्या पेयजलाच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी मदत होणार आहे.
आग्रा स्मार्ट सिटीसाठी एकीकृत नियंत्रण केंद्राची पायाभरणी पंतप्रधानांनी केली. या प्रकल्पाअंतर्गत आग्रा शहरात सुरक्षिततेच्या दृष्टीने देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. 285 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे आग्रा हे शहर जागतिक दर्जाची स्मार्ट सिटी म्हणून आणि अग्रगण्य पर्यटन स्थळ म्हणून विकसित होण्यासाठी मदत होणार आहे.
गंगाजल प्रकल्प आणि सीसीटीव्ही कॅमेरासारख्या सुविधांच्या माध्यमातून आग्रा शहर हे स्मार्ट सिटी बनविण्याच्या दृष्टीने आम्ही पावले उचलत आहोत असे पंतप्रधानांनी कोटी मीना बाजार येथील सभेत बोलताना सांगितले. या सुविधांमुळे पर्यटकांचा ओघ वाढेल असे पंतप्रधान म्हणाले. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पंतप्रधानांनी आग्रा येथील एस.एन. वैद्यकीय महाविद्यालय सुधारणा कामांचे भूमीपूजन केले. याअंतर्गत महिला रुग्णालयात 100 खाटांचा प्रसुती कक्ष निर्माण करण्यात येणार असून यासाठी अंदाजे 200 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आयुष्मान भारत योजनेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. 100 दिवसात 7 लाखाहून जास्त लोकांनी या योजनेअंतर्गत लाभ घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
खुल्या प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण म्हणजे योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे. शैक्षणिक संस्थात इतर वर्गातल्या विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ नये यासाठी सरकार, शैक्षणिक संस्थात जागा वाढविणार असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. खुल्या प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना आरक्षणाबरोबर उच्च शिक्षण, तंत्र आणि व्यावसायिक संस्थात शैक्षणिक सुविधा पुरवण्यासाठी आम्ही महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. उच्च शिक्षण संस्थात आम्ही 10 टक्के जागा वाढविल्या आहेत. कोणाचाही हक्क हिरावून घेणारी यंत्रणा आम्ही आणू इच्छित नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
भ्रष्टाचाराविरोधात आपण सर्वांनी साडेचार वर्षांपूर्वी मला दिलेल्या जनादेशाला पूर्ण क्षमतेने न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणूनच काही लोक चौकीदार विरोधात एकत्र येऊ लागले आहेत. सरकारच्या विकासाच्या प्राधान्यावर भर देताना विकासाचे पाच पैलू, पंचधारा, देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. बालकांसाठी शिक्षण, शेतकऱ्यांसाठी सिंचन, युवकांसाठी चरितार्थ, वृद्धांसाठी औषधोपचार आणि प्रत्येकासाठी तक्रार निवारण यांचा यात समावेश आहे. अमृत योजनेअंतर्गत आग्र्याच्या पश्चिम भागासाठी सांडपाणी प्रकल्पाचे भूमीपूजन पंतप्रधानांनी केले. यामुळे 50,000 घरात स्वच्छताविषयक सुविधांत वाढ होणार आहे.
S.Tupe/N.Chitale/P.Kor
(Release ID: 1559358)