पंतप्रधान कार्यालय

तुळजापूरमार्गे सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाला मंजुरी-पंतप्रधान

Posted On: 09 JAN 2019 6:42PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 9 जानेवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोलापूर भेटीत विविध विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि भूमीपूजन केले.

वीज, रस्ते आणि पाणीपुरवठा अधिक सुधारण्याबाबत अनेक उपक्रम हाती घेण्यात आल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असो, राष्ट्रीय महामार्ग किंवा सौभाग्य योजना असो सर्व योजनेत वेगवान प्रगती साधली जात आहे. सर्वांपर्यंत वीज पोहोचवण्याच्या उद्दिष्टाप्रती मिशन मोड म्हणून काम केल्याबद्दल पंतप्रधानांनी राज्य सरकारची प्रशंसा केली.

तुळजापूरमार्गे सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाला सरकारने मंजुरी दिल्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले. सुमारे 1000 कोटी रुपये खर्चून हा रेल्वेमार्ग बांधण्यात येणार आहे. या मार्गामुळे केवळ या भागातल्या लोकांचीच नव्हे तर देशभरातून तुळजापूरला येणाऱ्या भाविकांची सोय होणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

घटनादुरुस्ती (124वी दुरुस्ती) विधेयकाबाबत बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, नोकऱ्या आणि शैक्षणिक संधी यामध्ये खुल्या प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षणाचा लाभ पुरवून ‘सबका साथ, सबका विकास’ या सरकारच्या उद्दिष्टाला बळकटी मिळेल असे पंतप्रधान म्हणाले.

आपल्या नेतृत्वातील सरकारच्या कार्यकाळात मोठ्या लांबीचे पूल, बोगदे आणि लांब महामार्ग बांधण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी आपल्या सरकारने प्रभावी मार्गांचा अवलंब केल्यामुळे हे शक्य झाल्याचे पंतप्रधान म्हणाले.

राष्ट्रीय महामार्ग-52 वरच्या सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या 58 कि.मी. लांबीच्या चौपदरी मार्गाचे लोकार्पण पंतप्रधानांनी केले. या राष्ट्रीय महामार्गावरच्या सोलापूर-येडशी दरम्यानच्या 98.717 कि.मी लांबीच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या मोठ्या प्रकल्पाचा हा भाग आहे. यामुळे महाराष्ट्राचा महत्त्वाचा भाग असलेल्या मराठवाड्याशी सोलापूरचा संपर्क वाढण्यासाठी मदत होण्याबरोबरच या भागातल्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. 2014 मध्ये पंतप्रधानांनी या प्रकल्पाचे भूमीपूजन केले होते. आज लोकार्पण करण्यात आलेल्या या महामार्गावरच्या दोन मोठे आणि 17 लहान पूल, दहा पादचारी भुयारीमार्ग, 3.4 किलोमीटरचे तुळजापूर बाह्य वळण या वैशिष्ट्यांमुळे शहरातली वाहतूक कोंडी कमी व्हायला मदत होणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत, बांधण्यात येणाऱ्या 30,000 घरांचे भूमीपूजन पंतप्रधानांनी केले. ही घरे प्रत्येकी 300 स्क्वेअर फुटांची असतील. घरातल्या महिलेच्या नावावर अथवा पती आणि पत्नी यांच्या संयुक्त नावे हे घर राहणार आहे. चार वर्षात ही घरे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हरित तंत्रज्ञानाचा वापर या घरांसाठी करण्यात येणार आहे. पंतप्रधानांनी दोन महिला लाभार्थींकडे धनादेश सुपूर्द केले.

स्वच्छ भारत अभियानाचे उद्दिष्ट लक्षात घेऊन पंतप्रधानांनी भुयारी सांडपाणी यंत्रणा आणि तीन सांडपाणी प्रक्रिया सयंत्राचे लोकार्पण केले. याची एकूण क्षमता प्रतिदिन 102.50 दशलक्ष लीटर आहे. सध्याच्या प्रणालीची जागा नवी यंत्रणा घेणार आहे. स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत, प्रमुख पायाभूत घटकांच्या संदर्भात सोलापूरमध्ये अंमलबजावणी करण्यात येत  आहे. या अंतर्गत वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन सांडपाणी प्रक्रिया आणि पाणीपुरवठा सुधारणांना प्राधान्य देण्यात येत आहे. यासंदर्भात देवगाव, कमथे आणि प्रतापनगर येथे तीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प विकसित करण्यात येत आहेत. देवगाव इथला प्रकल्प सुमारे 350 किलोवॅट वीज निर्मिती करणार आहे, याच प्रकल्पाच्या पंपांसाठी याचा उपयोग केला जाईल.

सोलापूर स्मार्ट सिटी प्रकल्पाचा एक भाग म्हणून पाणी पुरवठा सुधारणा आणि सांडपाणी यंत्रणा अशा एकत्रित प्रकल्पाचे भूमीपूजन पंतप्रधानांनी केले. उजनी धरणातून सोलापूर शहराला करण्यात येणाऱ्या पिण्याची पाणी पुरवठा व्यवस्था मजबूत करण्याचा आणि अमृत योजनेअंतर्गत भुयारी सांडपाणी यंत्रणेचे भूमीपूजनही पंतप्रधानांनी केले. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत या प्रकल्पासाठी 244 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे तंत्रज्ञानाद्वारे सेवा प्रदान आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणा अपेक्षित आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासात केंद्र सरकारने दिलेल्या पाठिंब्यासाठी पंतप्रधानांचे आभार मानले. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सध्याच्या दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मार्ग काढल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये केंद्रीय सहाय्यता मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पंतप्रधानांकडे त्यांनी अपिल केले.

केंद्रीय रस्ते, वाहतूक महामार्ग, नौकावहन आणि जलस्रोत तसेच नद्या विकास आणि गंगा पुनरुज्‍जीवन मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, या जिल्ह्यातील भीमा आणि सिना नद्यांवर बांधण्यात येणारा चौपदरी पुलावरील बंधाऱ्यामुळे भविष्यात जलसाठ्याचा प्रश्न सुटेल. गडकरींनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांचा योग्य विकास होत असून गेल्या 15 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सिंचन कार्यानेही वेग घेतला आहे. याचे सर्व श्रेय पंतप्रधानांनी या क्षेत्राला दिलेले प्राधान्य आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना हे होय. ते पुढे म्हणाले की, सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांसाठी टेंभू सिंचन प्रकल्पासाठी 1200 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

रस्ते बांधणीवर बोलतांना गडकरी म्हणाले की, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची बांधणी फेब्रुवारी 2019 मध्ये चालू करण्यात येणार असून याचे मूल्य जवळपास 3.75 हजार कोटी रुपये एवढे आहे. ते पुढे म्हणाले की, भारतमाला प्रकल्पाअंतर्गत 75 कि.मी.च्या रिंग रोडला मंजुरी दिली असून याचे काम लगेचच सुरू होईल. वेगाने सुरू असलेल्या रस्ते बांधणीसंदर्भात बोलतांना गडकरी म्हणाले की, पंतप्रधानांच्या आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली जमीन हस्तांतरण कार्य जोराने सुरू असून सोलापूर जिल्ह्याचा चेहरामोहरा यामुळे बदलत आहे.

सोलापूर जिल्ह्यात 38 साखर कारखाने आहेत आणि दोन बांधण्यात येत आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या गंभीर आहेत मात्र जागतिक अर्थव्यवस्था याला कारणीभूत असून ब्राझीलमध्ये 19 रुपये प्रति किलो दराने साखर विक्री होत आहे असे गडकरी म्हणाले. साखरेचा किमान विक्री दर 29 रुपये प्रति किलो राहील असा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधानांनी घेतला आहे. साखर निर्यातदारांसाठी अनुदानाबाबत पंतप्रधानांनी धोरण आखले असे सांगून दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी घेतलेला हा एक सर्वोत्तम निर्णय असल्याचे गडकरी म्हणाले.



(Release ID: 1559277) Visitor Counter : 235


Read this release in: English