पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
प्रधानमंत्री उज्वला योजनेने गाठला 6 कोटींचा टप्पा
उपराष्ट्रपतींच्या हस्ते लाभार्थीला गॅस जोडणी प्रदान
Posted On:
02 JAN 2019 2:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जानेवारी 2019
प्रधानमंत्री उज्वला योजनेने स्वयंपाकाच्या सहा कोटी गॅस जोडण्या देण्याचा टप्पा गाठला आहे. आज उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते जस्मिना खातून या महिलेला गॅस जोडणी प्रदान करून सहा कोटीचा टप्पा पूर्ण झाला. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यावेळी उपस्थित होते. या योजनेअंतर्गत आणखी काही लाभार्थ्यांनाही गॅस जोडण्या देण्यात आल्या.
समाजातल्या सर्व गरीबापर्यंत योजनांचा लाभ पोहोचायला हवा हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेद्वारे प्रयत्न करण्यात येत आहेत. या योजनेमुळे आरोग्य आणि पर्यावरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मदत होण्याबरोबरच महिला सबलीकरणाचे उद्दिष्टही साध्य होत असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले. शांततापूर्ण मार्गाने झालेली ही क्रांतीच आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म’ यासाठी आवाहन केले. प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून जनतेच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाने दमदार पाऊल उचलल्याचे ते म्हणाले. सहा कोटी गॅस जोडण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालय आणि तेल विपणन कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. 2004 पर्यंत 55 टक्के स्वयंपाकाच्या गॅस जोडण्या होत्या आता ही आकडेवारी 90 टक्के पर्यंत पोहोचल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. या योजनेची आंतरराष्ट्रीय संस्था आणि विकसित देशांनी प्रशंसा केली आहे असे सांगून या योजनेने विकसनशील देशांसाठी आदर्श निर्माण केल्याचे ते म्हणाले.
देशातल्या दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री उज्वला योजना सुरू करण्यात आली. दारिद्रय रेषेखालच्या कुटुंबातल्या 5 कोटी महिलांना मोफत गॅस जोडणी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. नियोजित वेळेपूर्वीच ते गाठण्यात यश आले. त्यानंतर हे उद्दिष्ट 8 कोटी पर्यंत वाढविण्यात आले आणि त्यासाठी 12800 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूदही करण्यात आली.
N.Sapre/N.Chitale/P.Kor
(Release ID: 1558109)