पंतप्रधान कार्यालय

कार निकोबार येथे सार्वजनिक सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 30 DEC 2018 10:23PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 30 डिसेंबर 2018

 

व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय, कार निकोबारच्‍या  माझ्या  प्रिय बंधू आणि भगिनींनो.

काल मी काशीमध्ये माता गंगेच्याजवळ होतो आणि आज सकाळी इथं या विराट सागराच्या कुशीत आपल्या सर्वांच्यामध्ये उपस्थित आहे. माता गंगा आपल्या पावित्र्याने ज्या प्रकारे भारताच्या जनमानसाला आशीर्वाद देत आहे, त्याचप्रकारे हा सागर अनंतकाळापासून माता भारतीच्या चरणाला वंदन करत आहे. राष्ट्राचे सुरक्षा आणि सामर्थ्‍य  यांना ऊर्जा देत आहे.

मित्रांनो, आपल्याजवळ निसर्गाचा अद्भूत खजिना तर आहेच. आपली संस्कृती, परंपरा, कला आणि कौशल्यही खूप चांगले आहे. काही वेळा पूर्वी या इथं जे नृत्य सादर केले, मुलांनी कलेचे जे काही प्रदर्शन केले, त्यावरून भारताची सांस्कृतिक सम्पन्नता या हिंद महासागरांइतकीच विराट आहे, हे लक्षात येते.

विशेष करून आपण लोकांनी संयुक्त कुटुंबाची जी परंपरा जोपासली आहे, हे खूप महत्वाचे आहे. संयुक्त कुटूंब पद्धती ही भारतीय जीवनशैलीची एक मोठी, महत्वपूर्ण ताकद आहे. कामाचा, स्त्रोतांचा, श्रमाचा अगदी योग्य प्रकारे उपयोग या पद्धतीमुळे होवू शकतो. सर्वांनी मिळून एकत्रित राहून, वाटून घेणे कशा पद्धतीने जीवन जगता येते, याचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. कारगिलपासून ते कार निकोबारपर्यंत, कच्छपासून ते कोहिमापर्यंत आपल्या समाजामध्ये कुटूंब संस्था, कुटूंब कार्यप्रणाली ही खूप मोठी शक्ती आहे.

मित्रांनो, काही वेळापूर्वी मी सुनामी स्मृतिस्थानी, ‘वॉल ऑफ लॉस्ट सोल्स’ इथं गेलो होतो. तिथं मी त्या भीषण नैसर्गिक संकटामध्ये जीव गमावलेल्या स्वजनांना श्रद्धासुमन अर्पण केले. 14-15 वर्षांपूर्वी घडलेल्या त्या हृदयद्रावक घटनेने इथले जनमानस, आपल्या सर्वांचे जीवन अस्ताव्यस्त करून टाकले होते. आपल्या माणसांना दूर करून टाकले होते. परंतु अशा आपत्तीनंतर ज्याप्रकारे पुरुषार्थ दाखवून आपण सर्वजण पुन्हा उभे राहिलात आणि कार निकोबारला उभे केले, हे कार्य खरोखरच अतिशय कौतुकास्पद आहे.

बंधू आणि भगिनींनो, कार निकोबारमध्ये जीवन आणखी सोपे, सुकर व्हावे. आपल्या सर्वांना आणखी चांगल्या सुविधा मिळाव्यात, चांगल्या संधी मिळाव्यात यासाठी आज कोट्यवधी रुपयांचे प्रकल्पांचे इथे लोकार्पण करण्यात आले. काही प्रकल्पांचा शिलान्यास करण्यात आला आहे. यामध्ये शैक्षणिक सुविधांपासून ते आरोग्य, रोजगार, कौशल्य विकासापर्यंत तसेच वाहतुकीपासून ते विद्युत पुरवठ्यापर्यंत, क्रीडापासून ते पर्यटनापर्यत अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पांसाठी मी आपल्या सर्वांचे खूप -खूप अभिनंदन करतो. या देशाच्या विकासासाठी आमचे विचार व्यापक आहेत. त्याच्या मुळाशी पायाभूत सुविधा, संपर्क व्यवस्था आहे. ‘सबका साथ सबका विकास’ म्हणजेच विकासापासून देशातला कोणताही नागरिक वंचित राहायला नको. देशाचा कोणताही कोपरा विकास कार्यामधून वगळायला नको, अशी  भावना यामागे आहे.

देशाच्या विस्तृत भागातलं अंतर कमी व्हावे आणि मनांमध्ये सह-अस्तित्वाचे भाव अधिक मजबूत व्हावे, असे उद्दिष्ट समोर निश्चित करून आम्ही काम करत आहोत. गेल्या चार वर्षांमध्ये पंतप्रधान या नात्याने देशाच्या काना कोप-यात स्वतः जावे, तिथल्या लोकांना भेटावे, संवाद साधावा असा प्रयत्न मी सातत्याने करत राहिलो.

मित्रांनो, काही वेळापूर्वी ज्या योजनांचे लोकार्पण आणि शिलान्यास करण्यात आला आहे, त्यामध्ये ‘सागरी भिंतीच्या प्रकल्पाचाही समावेश आहे. आपल्या लोकांची ही खूप दीर्घ काळापासूनची मागणी होती. मातीचा भराव वाहून जात असल्यामुळे सागरापासून जो धोका निर्माण होत आहे, त्यापासून संरक्षण करण्यासाठी हा उपाय केला जात आहे. आपली मागणी लक्षात घेवून जवळपास 50 कोटी रुपये खर्चून ही ‘सागरी भिंत’ इथे बांधण्यात येणार आहे. या भिंतीचा शिलान्यास करण्याचे  भाग्य मला लाभले. आता हे कार्य वेगाने पूर्ण करण्यात येईल. आणि ही भिंत ज्यावेळी बांधून पूर्ण होईल, त्यावेळी कार निकोबारसाठी सुरक्षा कवच म्हणून ही भिंत काम करेल.

मित्रांनो, सुरक्षेच्या बरोबरीने कार निकोबारमध्ये विकासाची पंचधारा वाहणार आहे. मुलांचे शिक्षण, युवकांना काम, वयस्करांसाठी औषधोपचार, शेतकरी बांधवांना सिंचनाची सुविधा आणि जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक या सर्व सुविधा मिळाव्यात यासाठीही कामे करण्यात येत आहेत. युवावर्गाला शिक्षणासाठी, प्रशिक्षणासाठी खूप लांब-लांब जावे लागते, याचा जाणिव मला आहे. आत अराँग गावामध्येच औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे आयटीआय सुरू करण्यात येणार आहे. त्याचा खूप चांगला फायदा सर्व युवकांना होवू शकणार आहे. या संस्थेतून आता कार निकोबारचे युवक इलेक्ट्रिशियन, प्लंबर, ऑटोमोटिव्ह टेक्निशियन बनू शकणार आहेत. हे युवक देशभरामध्ये कुठेही जावून रोजगार मिळवण्यास समर्थ होवू शकणार आहेत.

मित्रांनो, कार निकोबारचे युवक पारंपरिक रोजगाराबरोबरच आता शिक्षण, आरोग्य आणि इतर कामांमध्येही पुढे जावू शकणार आहेत. क्रीडानैपुण्य तर इथल्या युवकांच्या नसानसांमध्ये आहे. आपल्या रक्तामध्ये क्रीडाकौशल्य आहे. कार निकोबार फुटबॉलसह अनेक खेळांमध्ये आघाडीवर आहे. देशातलं खूप चांगले ‘स्पोर्टिंग टॅलेंट’ इथं आहे. काहीवेळापूर्वीच इथल्या प्रतिभावंत क्रीडापटूंची भेट घेण्याची संधी मला मिळाली. इथल्या ज्युनियर फुटबॉल टीमने चारवेळा सुप्रसिद्ध सुब्रतो मुखर्जी करंडक जिंकला आहे, अशी माहिती मला देण्यात आली.

मित्रांनो, इथलं टॅलेंटला, इथल्या प्रतिभेला आणखी चांगले पैलू पाडण्यासाठी आता लपाती गावामध्ये बनवण्यात आलेले क्रीडा संकूल आपल्याला समर्पित आहे. अंदमान आणि निकोबा व्दीप समुहाचा हा असा एकमात्र परिसर आहे. जवळपास 8 कोटी रुपये खर्चून या क्रीडा संकुलामध्ये सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. मुले आणि मुलींसाठी निवासाची सुविधा आहे. या इथेच सिंथेटिक ट्रॅकही बनवण्यात आला आहे.

मित्रांनो, फुटबॉल व्यतिरिक्त सायकलिंग असेल , कायकिंग असेल, रोइंग असेल- कार निकोबारने अनेक प्रतिभाशाली खेळाडू आपल्या देशाला दिले आहेत. आज ज्या क्रीडा परिषदेचे लोकार्पण करण्यात आले आहे तिथेच भविष्यात सायकलिंगसाठी वेलोड्रोम आणि पोहण्यासाठी तरण तलाव बनवण्याचीही योजना आहे.

मित्रांनो, केंद्र सरकार अंदमान आणि निकोबारमध्ये वास्तव्य करीत असलेल्या प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी जोडलेली व्यवस्था कशी सुकर, सोपी होईल, यासाठी प्रयत्न करत आहे. स्वस्त अन्नधान्य असो, स्वच्छ पाणी असो, गॅस जोडणी असो, केरोसिन असो, प्रत्येक सुविधा अगदी सहजपणे तुम्हाला मिळावी यासाठी सरकार कटिबद्ध आहे. डिगलीपूरच्या उपजिल्हा रुग्णालयाचा आता विस्तार करण्यात आल्यामुळे आरोग्य सेवेमध्ये खूप चांगली सुधारणा होवू शकणार आहे.

मित्रांनो, इथल्या आवश्यकता, गरजा, इथली परिस्थिती हे सगळे पाहूनच विकास कामे करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार निरंतर करत आहे. पर्यावरण आणि स्थानिक संस्कृती यांच्या संरक्षणाबरोबरच विकास कार्यही व्हावे, अशी भावना सरकारची आहे आणि त्यादृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

अंदमान निकोबारसहीत देशाच्या सागरी किनारी भागामध्ये खोबरे आणि नारळ यांच्या शेतीसंबंधी या शेतक-यांचे हित जपणारा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. खोब-याची एमएसपी आता दोन हजार रुपये प्रति क्विंटलने वाढवण्यात आली आहे. जे मिलिंग खोबरे असते त्याचे समर्थन मूल्य 7,750 रुपये होते, ते आता वाढवून 9500 रुपये प्रति क्विंटल करण्यात आले आहे. त्‍याचप्रमाणे  बॉल खोब-याचे समर्थन मूल्य 7,750 रुपये होते, ते 9,920 रुपये करण्यात आले आहे. या किंमत वाढीमुळे खोब-याची शेती करणा-यांना चांगला लाभ होणार आहे.

मित्रांनो, केंद्र सरकार आमच्या मच्छिमार बांधवांना सशक्त करण्याचे काम करत आहे. अलिकडेच देशात मासे पालन व्यवसाय लाभदायक बनवण्यासाठी सात हजार कोटींच्या विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीमधून मच्छिमारांना योग्य दरामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे.

आमचे सागरी किनारे नील क्रांतीचे केंद्रस्थान बनण्यासाठी सक्षम आहेत. याचा विचार करून सरकार पुढचे काम करत आहे. मासे व्यवसायाशी संलग्न कामे केली जावीत, यामध्ये ‘सीवीड’ म्हणजे सागरी गवताची शेती असेल, अशा अनेक प्रकल्पांसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. आधुनिक नौकांसाठी सरकार मच्छिमारांना आर्थिक मदतही देत आहे. याबरोबरच इथे मासेमारी, शेती, पशुपालन यांच्याशी संबंधित अनेक योजनांसाठी पॅकेज देण्यात आले आहे.

बंधू आणि भगिनींनो, कार निकोबारचे पर्यावरण सुरक्षित ठेवून सौर ऊर्जा निर्मितीची शक्यता तपासली जात आहे. सौर ऊर्जा वापराच्या क्षेत्रामध्ये भारतात अतिशय वेगाने काम केले जात आहे. सौर ऊर्जा निर्मिती आणि वापरात आघाडीवर असलेल्या जगातल्या इतर देशांमध्ये आज भारतही आहे. सौर ऊर्जा देशाला स्वस्त आणि हरित ऊर्जा देवू शकते. आज आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये सौर ऊर्जा क्रांती घडवून आणण्यासाठी भारत नेतृत्व करत आहे. भारताने या कार्यामध्ये पुढाकार घेतला आहे. ‘वन वर्ल्‍ड , वन सन, वन ग्रिड’ यासाठी व्यापक दृष्टिकोण ठेवून भारत काम करत आहे.

मित्रांनो, भारताच्या सागरी किनारपट्टीवर नवनीकृत ऊर्जेसाठी अनेक शक्यता आहेत. या शक्यतांना आम्ही संधीमध्ये परिवर्तित करण्याच्या कामाला लागलो आहोत. या योजनेमधून कार निकोबारमध्ये 300 किलावॅटचे ‘रूफ टॉप सोलर प्लांट’ लावण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. इथल्या शाळांमध्ये, रुग्णालयांमध्ये तसेच इतर संस्थांमध्ये 50-50 किलोवॅटचे सोलर पॅनल बसवण्याचे काम याआधीच करण्यात आले आहे, अशी माहिती मला देण्यात आली आहे. सरकारच्या या प्रयत्नांमुळे आगामी काही दिवसात कार निकोबारला लागणारी सर्व वीज ही सौर ऊर्जेच्या माध्यमातून मिळू शकणार आहे.

मित्रांनो, आपले हे कार निकोबार, हा संपूर्ण सागरी भाग, हे क्षेत्र मलाक्का स्ट्रेट, साधन संपदा आणि सुरक्षा या दोन्ही कारणांसाठी खूप महत्वपूर्ण आहे. हा हिंद महासागर आणि प्रशांत महासागर यांच्या मधले एक प्रमुख शिपिंग चॅनेल आहे. मालवाहक जहाजांच्या दृष्टीने दुनियेतला सर्वात जास्त वाहतुकीचा, रहदारीचा, व्यस्त मार्ग आहे. हे लक्षात घेवून हा भाग वाहतुकीच्या माध्यमांनीही विकसित केला जात आहे. यामुळे आपल्याही अनेक सुविधा मिळू शकणार आहेत आणि त्याचबरोबर रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.

बंधू आणि भगिनींनो, देशाच्या आवश्यक गरजा लक्षात घेवून इथे ट्रान्स शिपमेंट पोर्टचा शिलान्यास आज करण्यात आला आहे. या योजनेमुळे खाडीच्या दक्षिणी भागामध्ये नवीन उद्योगांसाठी संधी उपलब्ध होवू शकणार आहेत.

याबरोबरच सागरमाला योजनेमध्ये देशभरातल्या सागरी किना-यांचा विकास करण्यात येत आहे. इथेही पायाभूत सुविधा विकसित करण्याची मोठी योजना आखण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जवळपास अडीच लाख कोटी रुपये खर्च करून शेकडो प्रकल्पांवर काम करण्यात येत आहे. देशभरामध्ये 14 सागरी किनारे रोजगार क्षेत्र म्हणजेच ‘सीईझेडएस’ तयार करून आगामी काळात त्यांचा विकास करण्यात येणार आहे. यामध्ये सागरी किना-यांच्या परिसरातल्या क्षेत्रामध्ये सोयी-सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.

मित्रांनो, सागरमाला योजनेअंतर्गत कार निकोबारमध्येही कॅम्पबेल बेमध्ये जवळपास 50 कोटी रुपये खर्चून कॅम्पबेल बे जेट्टीचा विस्तार करण्यात येणार आहे. जवळपास 150 किलोमिटरचा हा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबरोबरच मूस जेट्टीची खोली वाढवण्याची योजना तयार करण्यात आली आहे. त्यामुळे तिथे मोठी जहाजे कोणत्याही अडचणीशिवाय थांबू शकणार आहेत.

बंधू आणि भगिनींनो, आगामी काळात इथे हवाई सेवा संपर्क यंत्रणा अधिक चांगली करण्यासाठी सरकार काम करत आहे. आपल्या राहणीमानाचा स्तर उंचावण्यासाठी, आपले आयुष्य अधिक सुखकर, सोपे करण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील आहे.

मित्रांनो, ट्रायबल कौन्सिलचे मी अगदी हृदयपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी आणि या भागाचा वेगाने  विकास घडवून आणण्यासाठी खूप महत्वपूर्ण भूमिका बजावत आहात.या इथे जे व्हिलेज कौन्सिल आहे, त्यामध्ये भगिनी आणि कन्यांची चांगली भागिदारी आहे, अशी माहिती मला देण्यात आली. हे प्रयत्न खूप कौतुकास्पद आहेत.

मित्रांनो, कार निकोबारच्या सर्वतोपरी विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे. आगामी नवीन वर्षामध्येही आमचे प्रयत्न असेच नव्या उत्साहात, नवीन जोशात सुरू राहणार आहेत. शेवटी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे विकासाच्या सर्व योजनांबद्दल खूप-खूप अभिनंदन करतो.

खूप-खूप धन्यवाद!

जय हिंद!!

 

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor


(Release ID: 1558098) Visitor Counter : 161


Read this release in: English