पंतप्रधान कार्यालय

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय भूमीवर तिरंगा ध्वज फडकवण्याच्या घटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त झालेल्या विशेष कार्यक्रमात पंतप्रधानांचे भाषण

Posted On: 30 DEC 2018 10:05PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 30 डिसेंबर 2018

 

भारत माता की जय

वन्‍दे – मातरम्

वन्‍दे – मातरम्

वन्‍दे – मातरम्

 सर्वात आधी मी तुम्हाला आग्रह करेन की, आजच्याच दिवशी नेताजी इथे आले होते, त्यांचे स्मरण करत सगळ्यांनी आपापले मोबाईल बाहेर काढा, एकाचवेळी आपल्या मोबाईलमधला फ्लश लाईट सुरु करा आणि त्या ज्योतीने नेताजींचा सन्मान करा-प्रत्येकाने हात उंचावून मोबाईल हातात घ्या आणि माझ्यापाठोपाठ म्हणा-

नेताजी जिंदाबाद!

नेताजी जिंदाबाद!

नेताजी जिंदाबाद!

 सुभाष बाबू जिंदाबाद!

सुभाष बाबू जिंदाबाद !

सुभाष बाबू जिंदाबाद!

 वन्‍दे – मातरम्

वन्‍दे – मातरम्

वन्‍दे – मातरम्

खूप खूप  धन्‍यवाद

 व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आज इथे खास कार्यक्रमासाठी आलेले सुभाष बाबूंचे नातेवाईक आणि मोठ्या संख्येने इथे उपस्थित असलेले माझे बंधू आणि भगिनीनो, 

स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य पणाला लावणाऱ्या असंख्य देशभक्तांच्या त्याग आणि पराक्रमाने पवित्र झालेल्या या भूमीला मी शतश: वंदन करतो. अंदमान निकोबार बेट भारताच्या नैसर्गिक सौंदर्याचे प्रतिक तर आहेच, मात्र भारतीयांसाठी हे एक तीर्थक्षेत्रही आहे. या भूमीचे महात्म्य तिच्या भूगोलासोबतच तिच्या सुवर्णमयी इतिहासातही आहे. हे बेट म्हणजे, आपल्या स्वातंत्र्यलढयाच्या आंदोलनात लढलेल्या प्रत्येक भारतीयांसाठी शौर्याचे, संकल्पाचे  प्रतीक आहे.

मित्रांनो, देशाच्या इतिहासात, वर्तमान आणि भविष्यासाठी महत्वाचे ठरलेले हे बेट सशक्त बनावे देशाच्या विकासाच्या गाथेचा एक महत्वाचा भाग बनावे, यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. हाच विचार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आज अंदमानच्या कानाकोपऱ्याला सुविधांशी जोडणाऱ्या शेकडो कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन आम्ही केले आहे. हे प्रकल्प शिक्षण, आरोग्य, दळणवळण, पर्यटन, उद्योग आणि रोजगाराशी संबंधित आहेत. ह्या सर्व विकास प्रकल्पांसाठी मी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो.

मित्रांनो, देशाच्या स्वातंत्र्याच्या संकल्पाशी संबंधित दोन महत्वाच्या स्मारकांचे दर्शन करण्याचे सद्भाग्य मला मिळाले. आधी मी सेल्युलर जेलमध्ये गेलो आणि नंतर त्या जागी गेलो जिथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बरोबर 75 वर्षांपूर्वी देशाच्या स्वातंत्र्याची घोषणा देत आपला ध्वज फडकवला होता. 

मित्रांनो, सेल्युलर जेलच्या परिसरात प्रवेश केल्याबरोबर एक वेगळीच जाणीव- अनुभूती मन आणि बुद्धीमध्ये जागृत होते. ते सगळे लोक कोणत्या मातीचे बनले होते, ज्यांनी हसत हसत आपल्या देशासाठी अनंत यातना सहन केल्या. सेल्युलर जेलच्या परिसरात चालतांना असा अनुभव येतो की जसे भारत मातेचे वीर सुपुत्र आपल्या घाम आणि रक्ताने समुद्राच्या लाटांवर ‘भारत माता की जय’ लिहित आहेत. ते कण-कण, तीळ तीळ स्वतःला जाळत आहेत, आपले आयुष्य जाळत आहेत, कारण त्यातून स्वातंत्र्याची ज्योत प्रकट होणार आहे.

वीर सावरकर यांच्याविषयी जितक्या गोष्टी ऐकल्या आणि वाचल्या आहेत, ती एक एक घटना दृश्य स्वरूपात इथे जिवंत होते, नजरेसमोर येते. त्या कोठड्या, जिथे सावरकर, बाबा भानासिंह, महावीर सिंह इंद्रभूषण रॉय यांच्यासारख्या शेकडो-हजारो क्रांतीकारकांना प्रचंड यातना दिल्या गेल्या. ज्या ठिकाणी इतकी वर्षे या महान क्रांतिकारकांचे वास्तव्य होते, त्या जागा आमच्यासाठी एखाद्या मंदिरासारख्याच आहेत.  बारेन्द्र कुमार घोष, उल्लासकर दत्त, पृथ्वीसिंह आझाद, त्रैलोक्यनाथ चक्रवर्ती, भाई परमानंद अशा स्वातंत्र्याच्या नायकांनी सेल्युलर जेलच्या प्रत्येक कोपऱ्याचा गौरव वाढवला आहे. स्वातंत्र्याच्या या नायकांना कृतज्ञ राष्ट्र कधीही विसरू शकणार नाही.

माझ्या सोबत म्हणा-

शहीदों – अमर  रहो

शहीदों – अमर रहो

 मित्रांनो, जेव्हा स्वातंत्र्याच्या नायकांविषयी बोलले जाते, तेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव आपल्या मनात अभिमानाची भावना निर्माण करते, आपल्याला नवी ऊर्जा देते. आझाद हिंद सरकारचे पाहिले पंतप्रधान सुभाष बाबू यांनी अंदमानच्या या भूमीला भारताच्या स्वातंत्र्याची संकल्प भूमी बनवले होते. नेताजींच्या हाकेला प्रतिसाद देत, अंदमानच्या कित्येक वीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःला समर्पित केले होते, त्यानंतर आझाद हिंद फौजेने इथे स्वातंत्र्याचा तिरंगा ध्वज फडकवला होता.

30 डिसेंबर 1943 च्या त्या ऐतिहासिक घटनेला आज 75 वर्षे पूर्ण झालीत. आज त्या घटनेचे स्मरण म्हणून इथे 150 फीट उंच ध्वज फडकावून आम्ही हा दिवस देशवासियांच्या चिरस्मृतीमध्ये कोरण्याचा प्रयत्न केला आहे. काही दिवसांपूर्वी मला लाल किल्यावरही असा तिरंगा फडकावण्याची संधी मिळाली होती. तेव्हा आझाद हिंद सरकारच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण झाली होती.

बंधू आणि भगिनींनो, देशाच्या इतिहासातील या अभिमानास्पद क्षणाच्या स्मृतीप्रीत्यर्थ एक नाणे आणि टपाल तिकीटही जारी करण्यात आले आहे. एवढेच नाही, तर नेताजींसकट स्वातंत्र्यलढ्यातील सर्व नायकांच्या स्मृती अंदमानमध्ये अजरामर राहाव्यात आणि संपूर्ण देशाने इथल्या भूमीतून प्रेरणा घ्यावी, यासठी एक महत्वाचा निर्णय घेतला गेला आहे. आता जेव्हा मी तुमच्याशी संवाद साधतो आहे, तेव्हाच त्याची अधिसूचना तयार होते आहे. आणि मी अत्यंत अभिमानाने तुमच्यासमोर घोषणा करतो आहे, की यापुढे रॉस बेट हे नेताजी सुभाषचंद्र बेट म्हणून ओळखले जाईल आणि नील बेट शहीद बेट म्हणून ओळखले जाईल. तर हैवलॉक बेट यापुढे स्वराज बेट या नावाने ओळखले जाईल.

बंधू- भगिनींनो, नेताजींनी स्वतः भारताच्या भूमीवर या बेटावर तिरंगा ध्वज फडकावून ही भूमी ब्रिटीश राजवटीपासून मुक्त घोषित केले गेले.त्यादिवशी त्यांनी भारतीयांच्या एका मोठ्या सभेला संबोधित केले होते. आता हे नेताजी स्टेडीयम म्हणून ओळखले जाते. तेव्हा सुभाषबाबू यांनी म्हटले होते, की या परिसरावर अधिकार मिळवून आता आझाद हिंद सेनेचे हे हंगामी सरकार, राष्ट्रीय अस्मितेचे सत्य, मूर्तिमंत आणि वास्तविक प्रतिक बनले आहे. त्यांच्या ह्या वचनांनतर बरोबर चार वर्षांनी भारत माता गुलामीच्या बेड्यांमधून मुक्त झाली.

मित्रांनो, गुलामीच्या दीर्घ कालावधीत जर भारताच्या एकतेविषयी जर काही शंका-कुशंका असतील, तर तो केवळ मानसिकतेचा प्रश्न आहे. संस्कारांचा नाही. सुभाषबाबूंचे असेही म्हणणे होते की, आपण सर्व प्राचीन काळापासून एकाच आहोत, हे मात्र खरे की पारतंत्र्याच्या काळात, ही एकता भंग करण्याचे अनेक प्रयत्न नक्कीच झाले. 

नेताजींना असा दृढविश्वास होता की, राष्ट्राच्या रूपाने आपली वेगळी ओळख निर्माण करुन ही मानसिकता बदलली जाऊ शकते. मला आज अतिशय आनंद होत आहे की, ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’च्या मार्गावर चालतांना आम्ही नेताजींच्या भावनांच्या अनुरूप पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहोत.

 मित्रांनो, अनेक लोक कळत-नकळत चर्चा करतांना मेनलैंड आणि आयलैंड म्हणजे मुख्य भूमी आणि आणि बेट असे वेगवेगळे बोलले जाते. आपल्या सवयीचा भाग झाला आहे तो.

माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, माझ्यासाठी सगळा भारत, इथला प्रत्येक कण न कण, कोपरा न कोपरा भारताची मुख्य भूमी आहे. पोर्ट ब्लेअर तितकाच भारताचा अविभाज्य घटक आहे, जितके दिल्ली, मुंबई आणि चेन्नई आहे. हेच कारण आहे, की आमचे सरकार अशा सर्वच क्षेत्रांच्या दळणवळणावर भर देत आहेत, जे काही न काही कारणाने मागे राहिले आहेत. देशाच्या भौतिक आणि भावनिक एकात्मतेला अधिक दृढ करण्याचा आमचा इरादा अटल आहे, पक्का आहे.

बंधू आणि भगिनींनो,एकात्मतेची ही भावना तेव्हाच अधिक दृढ होईल, जेव्हा आपण इतिहासाच्या आपल्या नायकांचे स्मरण ठेवू. मी नेहमीच असे म्हणत असतो, कि जो देश आपले खरे नायक, आपला इतिहास, आपला सन्मान याची बूज राखत नाही, याचे महत्व जाणत नाही, तो कधीही प्रगती करू शकत नाही. जो देश आपला इतिहास आणि वारसा सांभाळू शकतो, त्याचा विकास तेवढाच सशक्त होतो.

 केंद्र सरकार गेल्या साडे चार वर्षात आपल्या वैभवशाली इतिहासाच्या प्रत्येक छोट्या भागाला उभारण्याचा प्रयत्न करत आहे. देशभरातल्या जनतेसमोर हा प्रेरणादायी इतिहास आणण्याचा प्रयत्न करत आहे.कारण इतिहास घटना असेल तर इतिहास आपला दागीनाही आहे. इतिहास भूतकाळ आहे तर इतिहास येणाऱ्या काळाची जाणीवही आहे. इतिहासात, पराक्रम, वेदना यांची कथा आहे, त्याचवेळी इतिहासात पुरुषार्थ, पराक्रम यांची प्रेरणादायी गाथाही आहे. इतिहासात आपल्या परिश्रमांचे प्रतिबिंब आहे, इतिहास आपल्याला सतर्क करतो, इतिहास आपल्याला सजग राहायला शिकवतो. इतिहास काळाने बांधलेला आहे,मात्र इतिहासात नव्या संकल्पाची ऊर्जाही आहे. इतिहास आपल्याला नवी उमेद, नवी स्वप्ने बघण्याची हिम्मत देतो. इतिहास आपल्याला भविष्यासाठी स्वतःला समर्पित करण्याचे साहस देतो.

मित्रांनो, याच विचाराने सरकार ने अनेक वर्षांपासून अडकलेल्या पोलीस स्मारकाचे स्वप्न साकार केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचतीर्थांची निर्मिती केली. राष्ट्रीय एकता आणि शेतकरी आंदोलनाचे प्रणेते सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांचा यथोचित सन्मान देण्यासाठी जगातली सर्वात उंच प्रतिमा, Statue of Unity बांधला, ज्यामुळे जगात देशाचा गौरव वाढला आहे. ही सर्व स्मारके केवळ इतिहासाचे स्मरण ठेवण्यासाठी नाही, तर देशाला एका सूत्रात बांधणाऱ्या खऱ्या वीर सुपुत्रांना वंदन करण्याचा प्रयत्न आहे. 

इतकेच नाही, तर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि सरदार पटेल यांच्या नावावर आम्ही राष्ट्रीय पुरस्कार पण घोषित केले आहेत. आणि आज मी इथे नेताजी सुभाषचंद्र बोस अभिमत विद्यापीठाची घोषणा करतो.

बंधू आणि भगिनींनो, या सर्व राष्ट्रपुरुषांपासून प्रेरणा घेत आम्ही ज्या नव भारताच्या निर्मितीचा संकल्प केला आहे, त्याचा पाया, त्याचे मूळ तत्व भारताचा विकास हे आहे. विकास आपल्या स्त्रोतांचा आणि आपल्या संस्कृतीचाही व्हावा ह्याचा प्रयत्न केला जात आहे. देशाच्या कानाकोपऱ्याचा, देशाच्या प्रत्येक व्यक्तीचा विकास म्हणजे “सबका साथ, सबका विकास!” जेव्हा आम्ही संसाधनांच्या विकासावर चर्चा करतो तेव्हा औद्योगिक विकास हाही त्याचा एक महत्वाचा पैलू म्हणून लक्षात घ्यायला हवा.

 सरकार इथली परिस्थिती, इथल्या पर्यावरण अनुकूल उद्योगांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. सौर उर्जा असो, एलएनजी ने वीजनिर्मिती असो, इलेक्ट्रिक कारला इथल्या वाहतूक व्यवस्थेचा भाग बनवणे असेल, हे सारे प्रयत्न विकास आणि पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी केले जात आहेत. 

मित्रांनो, या क्षेत्राच्या औद्योगिक विकासासाठी देखील सरकारने एक मोठी योजना बनवली आहे, ज्याची घोषणा मी आज तुमच्यासमोर करणार आहे. आज या ऐतिहासिक क्षणी करणार आहे. या योजनेचे नाव आहे लक्षद्वीप एंड अंदमान निकोबार आयलंड इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट स्कीम(लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार बेट औद्योगिक विकास योजना) या अंतर्गत, इथे जे उद्योजक पर्यावरण स्नेही उद्योग सुरु करतील, त्यांना सरकार मदत करेल, सवलती दिल्या जातील. या योजनेमुळे, इथे भविष्यात अनेक नवे उद्योग सुरु होतील, ज्यातून इथल्या युवकांना रोजगार मिळेल.

 या योजनेमुळे पर्यटन, अन्नप्रक्रिया आणि माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित शेकडो उद्योजकांना लाभ मिळेल. आज इथे स्टार्ट अप साठी देखील एका धोरण पुस्तका (पॉलिसी बुक)चे प्रकाशन केले गेले. या सगळ्या प्रयत्नांचा इथल्या युवकांना निश्चितच लाभ होणार आहे. इथली पारंपरिक ओळख, इथली संस्कृती कायम राखत, त्याचं संरक्षण करत इथे पर्यटन विकसित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.पर्यटनाशी संबंधित अनेक मोठ्या योजनांचे भूमिपूजन आणि लोकार्पण आज केले गेले. हैवलॉक बंदरावर तयार होणारे पैसेंजर टर्मिनल असो किंवा मग याट मरीनाचे विस्तारीकरण असो, यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. इथे 20 यार्डच्या जागी 100 यार्ड उभे केले जाऊ शकतील, यासाठी या योजनेवर काम सुरु आहे.  

 मित्रांनो, औद्योगिक आणि पर्यटन विकास तेव्हाच शक्य होतो, जेव्हा दळणवळणाच्या सुविधा उत्तम असतात. म्हणूनच इथल्या दळणवळणाच्या सुविधा सुधारण्यासाठी आम्ही चार जहाजे इथल्या परिवहन विभागात समाविष्ट केली आहेत. त्याशिवाय मेक इन इंडीया कार्यक्रमाअंतर्गत, आणखी चार जहाजांची बांधणी कोच्चीच्या शिपयार्ड मध्ये वेगाने सुरु आहे. हे बेट अधिकाधिक स्वयंपूर्ण व्हावे, असा आमचा प्रयत्न आहे. इथल्या मोठ्या जहाजांची देखभाल आता देशात इतर ठिकाणी केली जाते. आता पोर्ट ब्लेअर डॉक यार्डाचा विस्तार केला जात आहे.

मित्रांनो, मला सांगण्यात आले होते की चाथमपासून बोम्बूफ्लैट येथे जायला आधी खूप वेळ लागत असे. आता तिथे एक पूल बनवण्याची परवानगी देण्यात आली आहे. आज माझी इथल्या स्थानिक प्रतिनिधीसोबत बैठक झाली.त्यात रस्त्यांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली. मला असे सांगण्यात आले की, इथल्या ग्रामीण भागात रस्ते दुरुस्ती आणि देखभालीची गंभीर समस्या आहे. मी इथल्या नायब राज्यपालांना आग्रह करेन की त्यांनी रस्त्यांच्या स्थितीचा आढावा घ्यावा आणि केंद्र सरकारला दोन आठवड्यांत त्याचा अहवाल पाठवावा. त्या अहवालाचा अभ्यास करुन केंद्र सरकार शक्य ती सर्व मदत करेल.

त्याशिवाय, विमान वाहतूक अधिक सशक्त करण्यासाठी वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक नवी एकात्मिक टर्मिनल इमारत बनवली जात आहे. ही इमारत लवकरच पूर्ण होणार आहे. चेन्नई आणि कोलकाताहून पोर्टब्लेअरची चार्टर्ड विमाने तुम्हाला अनुदानित भाडेपट्टीवर उपलब्ध करून दिली जातील. 

मित्रांनो, जलमार्ग, हवाई मार्ग, आणि रस्ते याशिवाय आज इ-वे म्हणजे इंटरनेट सुविधाही अत्यंत आवश्यक झाली आहे. त्यादृष्टीने आम्ही फोन आणि इंटरनेट संपर्कयंत्रणा अधिक उत्तम करण्याचा प्रयत्न करत आहोत. चेन्नईहून समुद्रमार्गे येणाऱ्या ऑप्टीकल फायबर मुळे आता पोर्ट ब्लेअर मध्येही दिल्ली किंवा चेन्नईइतकेच चांगले इंटरनेट मिळू शकेल.

 इतकेच नाही, तर स्वान म्हणजे स्टेट वाईड एरिया नेटवर्क देखील आज सुरु करण्यात आले आहे. या अंतर्गत, पहिल्या टप्यात इथली जी मोठी बेटं आहेत, जिथे लोकवस्ती आहे, तिथल्या बारा जागांना या नेटवर्कशी जोडण्यात आले आहे. यामुळे जिल्हा आणि गट पातळीवर सर्व सरकारी कार्यालयांना जलद गतीच्या इंटरनेट सुविधेचा लाभ मिळेल, ज्यामुळे सरकारी सेवा ऑनलाईन  डिलिव्हरी करणे सोपे जाणार आहे. एकप्रकारे, अंदमान आणि निकोबारसह सगळ्या बेटांवर डिजिटल इंडिया अधिक सक्षम व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करु.

मित्रांनो, उद्योग आणि पर्यटनाशिवाय आपल्या पारंपरिक व्यवसायातून युवकांना रोजगार मिळावा, यासाठी, 19 फिश लँडिंग केंद्रे बनवली जात आहेत, त्यापैकी 9 चे काम पूर्ण झाली आहेत आणि 10 चे काम वेगाने सुरु आहे. यासोबतच, कृषी, मत्स्यव्यवसाय आणि पशुपालन याला प्रोत्साहन देण्यासाठी 200 कोटी रुपयांची मदत दिली जात आहे.

बंधू आणि भगिनींनो, इथे वीज, पिण्याचे पाणी अशा गरजा पूर्ण करण्यासाठी देखील काही महत्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले गेले. येत्या 20 वर्षांसाठी पोर्ट ब्लेअर आणि आजूबाजूच्या भागात पाण्याचा प्रश्न भेडसावू नये, यासाठी धनिकारी धरणाची उंची वाढवली जात आहे.

विजेविषयी बोलायचे झाल्यास ,गेल्या सहा महिन्यात इथे 7 मेगावॅटच्या सौर ऊर्जा प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली आहे. त्याशिवाय, आज ज्या एलइनजी ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन केले गेले,त्यामुळे, पुढच्या 25 वर्षांपर्यत इथल्या विजेच्या गरजा पूर्ण होणार आहेत.

 मित्रांनो, कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या क्षेत्रातही पोर्ट ब्लेअर अत्यंत महत्वाचे योगदान देत आहे. इथे तयार होणाऱ्या प्लाझ्मा गॅस प्रकल्पामुळे, पिण्याच्या स्वच्छ पाण्यासोबतच, स्वच्छ ऊर्जा आणि हरित इंधन देखील उपलब्ध होणार आहे.

बंधू आणि भगिनींनो, स्वच्छतेच्या बाबतीत देखील तुंचआ संकल्प अतिशय कौतुकास्पद आहे आणि त्यासाठी मी इथल्या नागरिकांचे अभिनंदन करतो. मला अतिशय आनंद वाटतो, की इथल्या जनतेने संपूर्ण बेटाला हागणदारीमुक्त केलं आहे. स्वच्छतेमुळे इथले सौन्दर्य तर वाढले आहेत, शिवाय सार्वजनिक आरोग्यातही सुधारणा झाली आहे.

बंधू-भगिनींनो, देशवासीयांच्या आरोग्याला आमच्या सरकारने प्राधान्य दिलं आहे. त्याचा लाभ तुम्हा सर्वांना मिळतो आहे. दोन वर्षांपूर्वी, पोर्ट ब्लेअर इथे अंदमान निकोबार आयलँड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सुरू करण्यात आले होते. अंदमान निकोबार आयलँड योजनेअंतर्गत, अडीच हजार पेक्षा जास्त गरीब आणि सेवानिवृत्त लोकांनी या विमा योजनेअंतर्गत आपल्यावर उपचार करून घेतले आहेत. त्याशिवाय आयुष्मान भारत योजनेअंतर्गत, इथल्या अनेक गरीब कुटुंबांना लाभ मिळतो आहे. देशभरातल्या मोठमोठ्या रूग्णालयांमध्ये गंभीर आजारांवर पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत होत आहेत.

मित्रांनो, इथल्या आरोग्य सेवांचा विस्तार करतांना आज इथे 2 पीएससी आणि सीएससी रुग्णालयांना जिल्हा रुग्णालयात परिवर्तीत करण्यात येत आहे. त्याशिवाय एका आयुष रुग्णालयाचे भूमिपूजन देखील आज केले गेले. या आरोग्य सुविधा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला उपचारांसाठी दूर कुठे नाही जावे लागणार. 

बंधू आणि भगिनींनो, औषधासोबतच शिक्षणावरही सरकारने भर दिला आहे. चार वर्षांपूर्वी इथे के नवे पदवी महाविद्यालय सुरु करण्यात आले होते आणि वर्ष 2016 मध्ये विधि महाविद्यालय देखील सुरु झाले. आता तुम्हाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावे अभिमत विद्यापीठाची सुविधाही मिळाली आहे. 

डिगलीपुर येथे पॉली टेक्निकल कॉलेज ची सुरुवात केली गेली आहे. आणि थोड्यावेळापूर्वी निकोबार येथे मी आयआयटीचे लोकार्पण करुन आलो.

बंधू आणि भगिनींनो, संपूर्ण देशाच्या विकासात पंचधारा-म्हणजे मुलांचे शिक्षण, युवकांना रोजगार, वृद्धांना औषधे, शेतकऱ्यांना सिंचन आणि सर्व जनतेच्या तक्रारी आणि मागण्यांची दखल, ह्या पाच गोष्टी निश्चित करण्याचा सरकार निरंतर प्रयत्न करत आहे. आज जितक्या योजनांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झाले, त्या सगळ्या ह्याच विचारातून तयार करण्यात आल्या आहेत. 

त्यासोबतच, आमचे शौर्य आणि बलिदान यांचा गौरवास्पद इतिहास, आपली संस्कृती आणि आपल्या खऱ्या नायकांचा सन्मान करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

पुन्हा एकदा, या ऐतिहासिक क्षणासाठी, आणि आयुष्य सुखकर करणाऱ्या सर्व योजनांची सुरुवात, यासाठी मी तुम्हा सर्व बंधू भगिनींना मनापासून धन्यवाद देतो. 

 2018 ह्या वर्षाचा उद्या शेवटचा दिवस आहे. परवा 2019 हे नवे वर्ष सुरु होणार आहे.तुम्हा सर्व अंदमान आणि लक्ष्यद्वीपच्या लोकांना आणि सर्व देशवासियांसाठी नवा उत्साह, नवा जोश, नवी ऊर्जा आणि उत्तम आरोग्य घेऊन यावे याच शुभेच्छांसह मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आग्रह करतो की पुन्हा एकदा आपापले मोबाईल फोन बाहेर काढा, फ्लैश लाईट लावा आणि माझ्यासोबत पूर्ण शक्तीनिशी मोठ्या आवाजात म्हणा- 

सुभाष बाबूंनी स्वराज्याचा पाया जिथे रचला, त्याच्या ७५ वर्षांनंतर याचे क्षणी आपण सुराज्याची वाटचाल करण्याचा संकल्प सोडतो आहोत. त्यामुळे तुम्ही सगळे आता मोबाईलचे दिवे सुरु करून, पूर्ण शक्तीनिशी म्हणा - 

वंदे – मातरम्

वंदे – मातरम्

वंदे – मातरम्

खूप खूप धन्यवाद!

 

B.Gokhale/R.Aghor/P.Kor


(Release ID: 1558039) अभ्यागत कक्ष : 229
Read this releasein: English