पंतप्रधान कार्यालय

भूतानच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी दिलेले निवेदन

Posted On: 28 DEC 2018 3:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 डिसेंबर 2018

 

सन्मानीय पंतप्रधान डॉक्टर लोटे शेरिंग, भूतानहून इथे आलेले आपण सर्व विशेष अतिथी,

मित्रांनो,

हे वर्ष भारत आणि भूतानच्या राजनैतिक संबंधांचे सुवर्ण जयंती वर्ष आहे. या ऐतिहासिक आणि शुभ वर्षात पंतप्रधान डॉक्टर लोटे यांचे भारतात स्वागत करणे, आनंद देणारे आहे. भूतानमध्ये यावर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या यशस्वी आयोजनाबद्दल भूतान सरकार आणि भूतानच्या जनतेचे मी अभिनंदन करतो. या निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशासाठी पंतप्रधान डॉक्टर लोटे यांचे माझ्याकडून अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा. त्यांच्या नेतृत्वाखाली भूतान यश आणि समृद्धीच्या वाटेवर प्रगती करत राहील, असा मला विश्वास आहे.

मित्रांनो,

पंतप्रधान डॉक्टर लोटे यांनी भूतानसाठी त्यांनी आखलेल्या ‘नॅरोइंग द गॅप’ बाबत मला सविस्तर माहिती दिली. त्यांच्या दूरदृष्टीचे मी कौतुक करतोच शिवाय त्यांचा दृष्टीकोन माझ्या ‘सबका साथ, सबका विकास’ दृष्टीकोनाशी मिळताजुळता असल्याबद्दल मला आनंद वाटत आहे. भूतानच्या विकासात भारत नेहमीप्रमाणेच एक विश्वासू मित्र आणि भागीदाराची भूमिका बजावेल, असे आश्वासन मी पंतप्रधानांना दिले आहे. भूतानच्या 12 व्या पंचवार्षिक योजनेत भारत चार हजार पाचशे कोटी रुपयांचे योगदान देईल. हे योगदान भूतानच्या गरजा आणि प्राथमिकतांना अनुरुप असेल.

भारत आणि भूतानच्या सहकार्याच्या प्रदीर्घ इतिहासात जलविद्युत प्रकल्पात सहकार्य हा महत्वाचा भाग राहिला आहे. या महत्वाच्या क्षेत्रातील सर्व संबंधित प्रकल्पातील सहकार्याबाबत आज आम्ही आढावा घेतला. मान्ग-देछू प्रकल्पाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे, ही आनंदाची बाब आहे. या प्रकल्पाच्या प्रशुल्काबाबतही सहमती झाली आहे. इतर प्रकल्पांबाबतही समाधानकारक प्रगती सुरु आहे आणि सर्व प्रकल्पांना आम्ही दोघे अधिक गती देऊ इच्छितो. आमच्या सहकार्यातला एक नवा पैलू अंतराळ विज्ञानाचा आहे. दक्षिण आशियाई उपग्रहाचा लाभ घेण्यासाठी इस्रोद्वारा भूतानमध्ये बांधण्यात येणारे साउंड स्टेशनही लवकरच तयार होत आहे, ही आनंदाची बाब आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे भूतानच्या दुर्गम क्षेत्रातही हवामानाची माहिती, टेलिमेडिसीन आणि आपत्ती निवारणासारख्या कामात मदत मिळेल.

मित्रांनो,

पंतप्रधान डॉक्टर लोटे यांनी आज मला एक आनंदाची बातमी दिली आहे. लवकरच ‘रुपे कार्ड्‌स’ सुरु करण्याचा निर्णय भूतान सरकारने घेतला आहे. महोदय, या निर्णयासाठी तुमचे हार्दिक आभार. यामुळे दोन्ही देशांमधल्या नागरिकांमधले संबंध अधिक दृढ होतील.

महोदय,

आपण आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी भारताची निवड केली. चार वर्षांपूर्वी पंतप्रधान म्हणून मी पहिला परदेश दौरा भूतानचा केला होता. एकमेकांसोबत सहकार्य वृद्धिंगत करण्यासोबत विकासाच्या वाटेवर एकमेकांच्या साथीने पुढे जाणे, हे आपल्या एकत्रित वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

तुमचा भारत दौरा आपल्या संबंधांना एक नवी गती देण्यात यशस्वी ठरेल, असा मला विश्वास आहे. मी पुन्हा एकदा तुमचे आणि तुमच्या प्रतिनिधीमंडळाचे भारतात हार्दिक स्वागत करतो.

धन्यवाद!

ताशी देलेग!

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar



(Release ID: 1557583) Visitor Counter : 79


Read this release in: English