रसायन आणि खते मंत्रालय
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये युरियाचा पुरेसा पुरवठा सुरु
दोन्ही राज्यात युरियाचा पुरेसा साठा उपलब्ध- केंद्र सरकार
प्रविष्टि तिथि:
24 DEC 2018 6:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2018
मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यात युरिया खताचा तुटवडा असल्याच्या वृत्ताचे सरकारने खंडन केले आहे. या दोन्ही राज्यात गरजेपेक्षाही अधिक युरिया पुरवठा सुरु असून युरियाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्टीकरण रसायन आणि खते विभागाने दिले आहे. रबी हंगामासाठी सर्व राज्यात खताचा पुरेसा पुरवठा असेल याची काळजी केंद्र सरकार घेत आहे असेही या विभागाने म्हटले आहे.
देशभरात डिसेंबर महिन्यात एकूण 33.7 लाख मेट्रिक टन युरियाची आवश्यकता आहे तर खते विभागाने आत्तापर्यंत देशभरात 36.20 लाख मेट्रिक टन युरियाचा पुरवठा केला आहे. खते विभागाकडून दररोज एक लाख मेट्रिक टन युरियाचा पुरवठा होतो आहे.
युरिया उत्पादन केंद्रांचे काम उद्दिष्टानुसार सुरु असून युरियाचा समाधानकारक साठा देशात उपलब्ध आहे. रेल्वे मालवाहतुकीद्वारे युरिया सर्व देशभरात पोहोचवला जात असून खताचे वितरण योग्य पद्धतीने होत असल्याविषयी खते विभाग राज्य सरकार, रेल्वे आणि खत निर्मात्या कंपन्यांच्या संपर्कात आहे. मध्य प्रदेशातही डिसेंबर महिन्यात आवश्यकतेपेक्षा अधिक युरियाचा पुरवठा करण्यात आला. त्याशिवाय मध्य प्रदेश सरकारच्या मागणीनुसार अतिरिक्त 40 हजार मेट्रिक टन युरियाही देण्यात आला आहे. राजस्थानातही डिसेंबर महिन्यात गरजेपेक्षा जास्त युरिया पाठवण्यात आला आहे. त्याशिवाय दोन्ही राज्यातल्या कृषी विभागाच्या मागणीनुसार खते विभागाने या दोन्ही राज्यात प्राधान्याने खत पुरवठा करण्याची विनंती रेल्वे बोर्डाला केली आहे.
B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1557246)
आगंतुक पटल : 87
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English