सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

चौथ्या औद्योगिक क्रांतीत सहभागी होण्याच्या स्पर्धेसाठी भारतातील एमएसएमई उद्योग सज्ज- गिरीराज सिंह

Posted On: 19 DEC 2018 3:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2018

 

15व्या जागतिक एमएसएमई व्यावसायिक शिखर परिषदेत बोलतांना गिरीराज सिंह 

केंद्र सरकारच्या विविध उपाययोजनांमुळे देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग जागतिक कंपन्यांशी स्पर्धा करण्यास सक्षम झाले असून,चौथ्या औद्योगिक क्रांतीत हे उद्योग अधिकाधिक सहभाग घेतील, असा विश्वास केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंह यांनी व्यक्त केला. नवी दिल्लीत आजपासून सुरु झालेल्या 15व्या जागतिक एमएसएमई व्यावसायिक शिखर परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी केलेल्या बीजभाषणात ते म्हणाले की, उद्योगसुलभता, पतपुरवठा सुविधा आणि लघु उद्योगांच्या अत्याधुनिकीकरणासाठी राबवलेले उपक्रम यामुळे या क्षेत्रातील उद्योग आज जागतिक बाजारात आपले अस्तित्व निर्माण करत आहेत. एमएसएमई क्षेत्रासाठी पत हमी निधी धोरण, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, गेल्या चार वर्षात तयार झालेले 19 लाख नवे लघुउद्योग, यामुळे कोट्यवधी लोकांना रोजगार मिळाला आहे. 

देशातील एकूण निर्यात आणि सकल राष्ट्रीय उत्पादनातही एमएसएमई क्षेत्राचा वाटा वाढला आहे, असं सांगत, या क्षेत्राला तंत्रज्ञानाची जोड आणि आधुनिकता देण्यासाठी, लवकरच देशात 10 नवी तंत्रज्ञान केंद्रे सुरु केली जातील, अशी माहिती त्यांनी दिली. या जागतिक परिषदेमुळे, एमएसएमई क्षेत्राला आतंरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होईल, अशी आशा गिरीराज सिंह यांनी व्यक्त केली.

या परिषदेचे उद्‌घाटन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाले. वाणिज्य मंत्रालयाच्या औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाने तयार केलेल्या नव्या औद्योगिक धोरणाचा मोठा लाभ एमएसएमई क्षेत्राला मिळेल, असे प्रभू यावेळी बोलतांना म्हणाले.

एमएसएमई विभागाचे सचिव अरुण कुमार पांडा यांनीही यावेळी या क्षेत्राच्या प्रगतीविषयी माहिती दिली.

 एमएसएमई आणि सीआयआय यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या परिषदेची संकल्पना ‘जागतिक मूल्यसाखळीच्या आधारे भागीदारी निर्माण करणे’ अशी आहे. जगभरातील 56 देशांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत.

 

N.Sapre/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 



(Release ID: 1556634) Visitor Counter : 62


Read this release in: English