पंतप्रधान कार्यालय

उत्तरप्रदेशात प्रयागराज येथे विविध विकास प्रकल्पांच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण

Posted On: 16 DEC 2018 11:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2018

 

व्यासपीठावर उपस्थित उत्तरप्रदेशचे राज्यपाल श्री राम नाईक जी , उत्तरप्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य जी, उत्तरप्रदेश मंत्रिमंडळातील संसद सदस्य, माझे सहकारी खासदार श्यामचरण गुप्ताजी, विनोद कुमार सोनकर, वीरेन्‍द्र सिंह जी, प्रयागराज च्या महापौर अभिलाषा गुप्ता आणि मोठ्या संख्येने इथे उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनींनो.

तप, तपस्या,संस्कृती आणि संस्कारांची भूमी असलेल्या प्रयाग तीर्थ इथल्या जनतेला माझे वंदन ! जेव्हाही मला प्रयागराजला येण्याची संधी मिळते तेव्हा, माझे मन आणि बुद्धीत एका वेगळ्या ऊर्जेची अनुभूती मला जाणवते. इथल्या वातावरणात, इथल्या कणाकणात ऋषीमुनींच्या दिव्यतेचा वास अद्याप आहे. ज्याचा प्रत्यय इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सदैव येत असतो.

प्रयागचे वर्णन करतांना म्हंटलं जातं -  को कहि सकहि प्रयाग प्रभाऊ। कलुष पुंज कुंजर मृगराऊ।।

याचा अर्थ असा की पापांच्या समूहाच्या रूपात असलेल्या हत्तीला मारण्यासाठी सिंहरुपी प्रयागराजचा प्रभाव आणि महात्म्याचे वर्णन करणे अतिशय कठीण आहे. हे असे तीर्थक्षेत्र आहे, ज्याच्या दर्शनाने सुखसागर, रघुकुल श्रेष्ठ प्रभू श्रीरामही आनंदित झाले होते.

बंधू -भगिनींनो, आज मी इथे अर्धकुंभाच्या आधी आलो आहे. त्यावेळी मी तुम्हा सर्वाना, देशातल्या जनतेला एक आनंदाची बातमी सांगू इच्छितो. यावेळच्या अर्धकुंभात, सर्व भाविक अक्षय वटाचे दर्शन घेऊ शकतील. कित्येक पिढ्यांपासून हा अक्षय वट किल्यात बंद होता. मात्र यावेळी प्रत्येक भाविक प्रयागराजच्या त्रिवेणी संगमात स्नान केल्यानंतर अक्षय वटाचे दर्शन करु शकतील.

केवळ इतकेच नाही, तर अक्षय वटासोबत सरस्वती कुंभाचे दर्शनही भाविक घेऊ शकतील. मी स्वतःच काही वेळापूर्वी अक्षय वटाचे दर्शन घेऊन तुमच्यासमोर आलो आहे. हा वृक्ष, त्याच्या खोलवर रुजलेल्या मुळांमुळे पुन: पुन्हा पल्लवित होतो. आयुष्यात संकटानंतरही पुन: पुन्हा उभारी घेण्याची चीवट इच्छशक्तीच आणि प्रेरणा हा वृक्ष आपल्याला देतो.

मित्रांनो, अशा दिव्य आणि जिवंत प्रयागराजला अधिक आकर्षक आणि आधुनिक बनवण्यासाठी सुमारे साडेचार हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी थोड्यावेळापूर्वीच झाली आहे. यात रस्ते, रेल्वे, शहर आणि गंगामाईची स्वच्छता, स्मार्ट सिटी सारखे अनेक प्रकल्प समाविष्ट आहेत.

प्रयागराज मधल्या सर्वसामान्य जनतेचे आयुष्य अधिक सुगम आणि सुखकर बनवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आणि होणाऱ्या सुविधांसाठी मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. या प्रकल्पांमुळे कुंभमेळ्यासाठी  इथे येणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार आहे.

मित्रांनो, कुंभमेळ्याच्या काळात भाविकांना पर्यटनाच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात याकडे भाजपा सरकार विशेष लक्ष देत आहे. प्रयागराजपर्यंत येणाऱ्या सर्व मार्गांचे काम करून त्यांची गुणवत्ता सुधारणे, मग तो रेल्वेमार्ग असो, हवाईमार्ग किंवा रस्ते सुधारण्याचे काम असो. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने रेल्वे मंत्रालय  काही नवीन गाड्या सोडणार आहे.आता मी मोठे उड्डाणपूल, रेल्वे ओव्हरब्रीज, बोगदे, वीज आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा ज्या ज्या प्रकल्पांचे लोकार्पण मी केले, त्या सर्व प्रकल्पांमुळे या शहरातील दळणवळण व्यवस्था आणि पायाभूत सुविधा दोन्हीमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे.

या कार्यक्रमानंतर, मी प्रयागराज विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे उद्‌घाटन करायलाही जाणार आहे. या नव्या टर्मिनलचे काम एक वर्षांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाले आहे. या टर्मिनलमुळे प्रवाशांची सोया तर होणार आहेच, शिवाय देशातल्या इतर शहरांशी पर्यागराज विमानमार्गे जोडले जाणार आहे. या टर्मिनलसाठीही मी प्रयागराजच्या जनतेला शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

या सगळ्या सुविधा तशा अर्धकुंभाच्या आधी बांधून पूर्ण होत आहेत, मात्र त्यांचा प्रभाव आणि उपयोग तेवढ्यापुरता मर्यादित निश्चितच नाही. या सुविधांमुळे भविष्यात प्रयागराजमधल्या सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल होणार आहेत. आणि या कामांचे वैशिष्ट्य म्हणजे कुंभमेळ्याच्या घाईत करायचे म्हणून कुठेही अर्धवट, कच्चे काम केलेले नाही. ज्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत, त्या कायम राहणार आहेत.100 कोटींपेक्षा अधिक खर्चाने तयार झालेले एकात्मिक आदेश आणि नियंत्रण कक्ष, प्रयागराज मधील प्राचीनता आणि आधुनिकता यांचा संगम दर्शवणारे आहेत. स्मार्ट प्रयागराज चे हे एक महत्वाचे केंद्र आहे. या शहरातील रस्ते, वीज, पाणी अशा सर्व व्यवस्था याच केंद्रातून संचालित, नियंत्रित होणार आहेत.

बंधू आणि भगिनींनो, या अर्धकुंभमेळ्यात तपापासून तंत्रज्ञानापर्यत, त्याच्या प्रत्येक पैलूची अनुभूती जगभरातल्या लोकांना व्हावी, असा सरकारचा प्रयत्न आहे. लोकांना तपाचा अनुभव व्हावा आणि तंत्रज्ञानाचाही! अध्यात्म, आस्था आणि आधुनिकता याचा त्रिवेणी संगम किती भव्य आणि अद्भुत असू शकतो, याचा अनुभव घेऊन लोक इथून जावेत, असा पूर्ण प्रयत्न आम्ही करतो आहोत.

इथे तयार झालेला सेल्फी पॉईंट देखील आकर्षणाचे केंद्र आहे. थोड्यावेळापूर्वी मी इथे आलेल्या  विशेष पाहुण्यांसह दिव्य कुंभ, बव्ह्य कुंभ, सेल्फी पॉईंट्स वर फोटो काढले. मात्र मित्रांनो, जोवर या स्थळी मूळ शक्ती, मूळ संगम, त्रिवेणी भव्य होत नाही, तोपर्यत अर्धकुंभ आणि सेल्फीचा हा संगम अपूर्ण राहील.त्रिवेणीच्या शक्तीचा एक मोठा स्रोत आहे गंगा माता. गंगा माता निर्मळ असेल, अविरल प्रवाही राहील यासाठी सरकार अत्यंत वेगाने काम करत आहे.

आज इथे ज्या कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्‌घाटन झाले, त्यांत गंगा नदीची स्वच्छता आणि इथल्या घाटांच्या सौंदर्यीकरणाच्या प्रकल्पांचाही समावेश आहे. 1700 कोटी रुपयांच्या निधीतून बनवण्यात आलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमुळे सुमारे एक डझन नाल्यांमधून गंगा नदीत थेट सोडले जाणारे सांडपाणी आता थांबवले जाईल, त्यावर प्रक्रिया करून मग ते पाणी सोडले जाईल. त्याचवेळी नमामि गंगे प्रकल्पाअंतर्गत, 150 घाटांचे सौंदर्यीकरणही केले जात आहे. त्यापैकी 50 घाटांचे काम पूर्ण झाले आहे. अशा 6 घाटांचे लोकार्पण देखील आज करण्यात आले.

बंधू आणि भगिनींनो,

प्रयागराज असो, कशी असो अथवा कानपूर असो, उत्तरप्रदेशातील सर्व शहरांसह गंगा नदीकिनारी वसलेल्या प्रत्येक राज्यातल्या शहरात अशा सुविधा निर्मण केल्या जात आहेत. नमामि गंगे अभियाना अंर्तगत आतापर्यंत साडे 24  हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांच्या प्रकल्पना मंजुरी देण्यात आली आहे. 5 हजार कोटी रुपयांचे 75 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. हजारो कोटी रुपयांच्या 150 प्रकल्पांचे काम प्रचंड वेगाने सुरु आहे.

नमामि गंगे अभियानाअंर्तगत, आतापर्यंत साडे 24 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. 5 हजार कोटी रुपयांचे 75 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. हजारो कोटी रुपयांच्या 150 प्रकल्पांचे काम प्रचंड वेगाने सुरु आहे.

मित्रांनो,

गंगा माता निर्मळ व्हावी, अविरत व्हावी हा निर्धार पूर्ण करण्यासाठी, सर्वात मोठी शक्ती सरकारे यंत्रणेची असतेच, मात्र त्यासोबतच, कोट्यावधी स्वच्छाग्रही नागरिक, गंगामातेचे सेवक महत्वाचे योगदान देत आहेत. सर्वसामान्य जनता या अभियानात सहभागी झाली आहे. सगळे लोक आपापल्या पातळीवर काम करत आहेत. गंगा नदीविषयी सगळयांना असलेली आत्मीयता आणि जबाबदारीच्या जाणिवेमुळे आमच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळाले आहे. आता गंगा नदीकिनारी असलेली बहुतांश गावे हागणदारी मुक्त झाली आहेत.

बंधू आणि भगिनींनो, शास्त्रात स्वच्छतेचा संबंध देवत्वाशी जोडला गेला आहे. कुंभमेळ्यात गंगा नदीची स्वच्छता असो, किंवा मग स्वच्छ कुंभमेळा असो, यावेळी कामात कुठलीही कसूर केली जाणार नाही. आज मी इथे येण्यापूर्वी स्वच्छ कुंभविषयीचे प्रदर्शन पहिले. तसेच लोकार्पणाच्या कार्यक्रमातही कुंभ स्वच्छ असेल याकडे जातीने लक्ष दिले जात आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. 

कुंभमेळ्याचे आयोजन दर्शनीय, दार्शनिक आणि भव्यदिव्य असावे, यासाठी केंद्र सरकार उत्तरप्रदेश सरकार सोबत सातत्याने काम करत आहे. भारताचा गौरवास्पद इतिहास आणि वैभवशाली भविष्याचे दर्शन जगाला या कुंभमेळ्यात व्हावे, असे सरकारचे प्रयत्न आहेत.  सरकारच्या या प्रयत्नांमध्ये प्रयागराज मधील प्रत्येक  नागरिक सहभागी झाला आहे, याचा मला आनंद आहे . प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. शहरातल्या स्वच्छतेपासून ते पाहुण्यांच्या स्वागतापर्यंत सकारात्मक वातावरण निर्मिती करण्यात तुम्ही सर्व मग्न आहात. इथे जे प्रदर्शन भरले आहे ते मी पहिले, तिथे आकर्षक चित्र आहेत; त्या चित्रांनी शहराला सजवण्याचे काम सुरु आहे. चित्रांच्या माध्यमातून प्रयागराज आणि भारताचे दर्शन घडवण्याचा हा अतुलनीय प्रयत्न खरंच प्रशंसनीय आहे आणि इथे येणाऱ्या प्रत्येक यात्रेकरुसाठी हा अनुभव अतुलनीय असेल.

मित्रांनो, प्रयागराज मधील लोकांची ही भावना लक्षात घेऊन, तुमचे प्रेम बघून, मी जगभरातल्या लोकांना अर्धकुंभासाठी येण्याचे आमंत्रण दिले आहे. गेल्या एक-दीड वर्षात मी जिथे जिथे गेलो आहे, तिथे राहणाऱ्या भारतीयांना आपल्या परदेशी मित्रांसह प्रयागराजमध्ये येवून भारताचा सांस्कृतिक वारसा पाहण्याचे आमंत्रण मी स्वतः दिले आहे, कारण मी पण तर आता उत्तरप्रदेशचा आहे ना! 

तुम्ही काल पाहिलेच असेल, इथे संगमावर काल 70 देशांचे झेंडे फडकत होते. 70 देशांच्या भारतात नियुक्त प्रतिनिधींनी, राजनैतिक अधिकाऱ्यांनी संपूर्ण कुंभ क्षेत्राचा दौरा केला, इथल्या अद्वितीय वातावरणाचा आनंद लुटला. अशा  प्रयत्नांमुळे कुंभमेळ्याची लोकप्रियता जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी मदत होईल. 

मित्रांनो, जगातील सर्वात प्राचीन संस्कृती असलेल्या प्रयागराज आणि काशी या दोन्ही शहरांमध्ये एकाचवेळी दोन महत्वपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. जेव्हा अर्धकुंभासाठी इथे लोक येतील,त्याचवेळी  काशीमध्ये अनिवासी भारतीय दिन साजरा करण्यासाठी जगभरातील लोक  एकत्र येतील. ते देखील इथे या कार्यक्रमाला हजेरी लावतील.

बंधू आणि भगिनींनो, अर्धकुंभ केवळ कोट्यावधी लोक एकत्र येण्याचा उत्सव नाही, इथे येणाऱ्या कोट्यावधी लोकांच्या माध्यामतून, त्यांच्यामध्ये होणारा संपर्क आणि संवाद यामुळे आपल्या देशाला दिशा देता येते. कुंभासाठी येणाऱ्या कोट्यावधी लोकांच्या सोबतच हजारो विचारप्रवाह भारताला समृद्ध आणि सशक्त बनवतात.

कुंभमेळ्याचा उत्सव हा भारत आणि भारतीयतेचा सर्वात मोठा पुरावा आहे. हा उत्सव भाषा, संगीत आणि भिन्नतेला संपवून एक होण्याची प्रेरणा देतो. हा उत्सव आपल्याला एकत्र आणतो, हा उत्सव गाव आणि शहराला एक करतो. एक भारत-श्रेष्ठ भारताचे खरे चित्र इथे पहायला मिळते. इथे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याची आपण स्वतःहून काळजी घेतली पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. हे आयोजन केवळ श्रद्धा नाही तर देशाच्या प्रतिष्ठेचा देखील प्रश्न आहे. इथे येणारा प्रत्येक परदेशी पाहुणा भारताचे एक नवीन चित्र आपल्यासोबत घेऊन जाईल याची खात्री आपण त्यांना दिली पाहिजे.

या कालवधीत जगभरातील  हजारो विद्यार्थी इथल्या व्यवस्थापानेविषयी शिकायला इथे येतील. जगातील सर्वात मोठे व्यवस्थापन विद्यापीठ या आयोजनाची भव्यता, विविधता आणि यशाविषयी मुलांना एका मॅनेजमेंट गुरुसारखी शिकवण देत आहे. 

मित्रांनो, आपला सांस्कृतिक वारसा, अमाप ज्ञान ही भारताची ओळख आहे. या शक्तीची ओळख जगाला करून देण्यासाठी स्वामी विवेकानंदांसहित अनेक महर्षींनी आपले जीवन समर्पित केले. देशातील स्रोतांसोबतच देशाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा प्रभाव देखील जगभरात वाढला पाहिजे यासाठी मागील चार-साडे चार वर्षांपासून केंद्र सरकार निरंतर प्रयत्न करत आहे. 

मित्रांनो, मी आज प्रयागराजमध्ये तुमच्याशी आणि देशातील लोकांसोबत अजून एका महत्वपूर्ण विषयावर बोलू इच्छितो.

प्रयागराज एक अशी जागा आहे, ज्याला उत्तरप्रदेशाचे न्यायमंदिर देखील म्हंटले जाते. गेल्या  काही काळापासून देशात ज्याप्रकारे पुन्हा एकदा न्यायपालिकेवर दबाव आणण्याचा खेळ सुरू झाला आहे, अशा परिस्थितीत देशाने, आजच्या युवा पिढीला सतर्क करणे अतिशय आवश्यक आहे.

मित्रहो, देशावर सर्वात जास्त काळ सत्ता गाजवणाऱ्या पक्षाने नेहमीच स्वतःला प्रत्येक कायदा, न्यायपालिका, संस्था आणि अगदी देशापेक्षाही श्रेष्ठ मानले आहे. त्यांच्या मर्जीनुसार न चालणार्‍या, त्यांच्या इशाऱ्यानुसार काम न करणाऱ्या आणि वाकायला तयार नसणाऱ्या देशातल्या प्रत्येक संस्थेला, अगदी संवैधानिक संस्थांनाही या पक्षाने नेस्तनाबूत केले.

बंधू आणि भगिनींनो, या मनमानी कारभारामुळे आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेलाही दुर्बल करण्याचे प्रयत्न करण्यात आले. याचे कारण होते, ते म्हणजे न्यायपालिका अशा संस्थांमध्ये समाविष्ट होत्या ज्या या पक्षाच्या भ्रष्ट आणि निरंकुश प्रथांविरोधात कायम उभ्या ठाकत असत. काँग्रेसला न्यायपालिका का आवडत नाही, हे प्रयागराज आणि उत्तर प्रदेशमधील लोकांपेक्षा जास्त कोणास ठाऊक असेल? उत्तर प्रदेशमधील लोकांनी ते दिवस एकदा आठवून पहावे, जेव्हा या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांनी येथील जनमताला अपमानित करण्याचे काम केले होते. तो लोकशाहीचा अपमान नव्हता का?

मित्रहो, देश तो दिवस कधीही विसरू शकणार नाही, जेव्हा प्रयागराजच्या उच्च न्यायालयाने सत्य आणि राज्यघटनेची साथ देत, त्यांना संसदेतून, संसदेच्या सदस्यत्वापासून बेदखल केले होते. त्यावेळी त्यांनी लोकशाही संपुष्टात आणण्याचे प्रयत्न केले, देशावर आणीबाणी लादली, अगदी देशाची राज्यघटनाही बदलून टाकली. निवडणुकीसंदर्भातील याचिकेवर सुनावणी घेण्याचा अधिकारही न्यायपालिकेकडून हिसकावून घेण्याचे प्रयत्न करण्यात आले.

मित्रहो, विरोधी नेत्यांची हीच प्रवृत्ती कायम आहे. या प्रवृत्तीनुसार देशाच्या संवैधानिक संस्थांना एका विशिष्ट पक्षासमोर हात बांधून उभे राहण्यासाठी दबाव आणला जातो. जो त्यांच्यासमोर वाकत नाही, त्याला तोडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ही त्यांची सामंतशाही आणि राजेशाही विचारसरणी आहे. हीच वृत्ती त्यांना निष्पक्ष संस्थांना नेस्तनाबूत करण्यासाठी प्रवृत्त करते. न्यायपालिकेची प्रतिष्ठा धुळीला मिळवण्यासाठी, ती नष्ट करण्यासाठी हा पक्ष केवळ बळाचा वापर करत नाही तर खेळाचाही वापर करतो. आपली षड्यंत्रे यशस्वी करण्यासाठी कपट आणि धूर्तपणाच्या सर्व सीमा ते ओलांडतात. न्यायपालिकांबाबत या पक्षाची एकच कार्यपद्धती राहिली आहे, जेव्हा सत्तेवर असतील तेव्हा अडकवणे आणि विरोधी पक्षांमध्ये असतील तेव्हा धमकावणे.

 

मित्रहो, मी देशाला केशवानंद भारती यांच्या महत्वपूर्ण खटल्याचे स्मरण करून देऊ इच्छितो. याप्रकरणी निकाल देणाऱ्या न्यायाधीशांनी जेव्हा दबावाखाली काम करण्यास नकार दिला, तेव्हा कित्येक वर्षांपासून सुरू असलेली न्यायपरंपराच बदलण्यात आली. सर्वात वरिष्ठ न्यायाधीशांना मुख्य न्यायमूर्तीपदी नेमण्याऐवजी एका अशा न्यायमूर्तींना हे पद बहाल करण्यात आले, जे ज्येष्ठतेच्या क्रमानुसार तीन न्यायाधीशांच्या नंतर येणारे होते. या लोकांची काम करण्याची पद्धत अशी होती. न्यायपालिकेवर दबाव टाकण्याची पद्धत अशी होती. अशाच प्रकारे आणीबाणीच्या निर्णयाबाबत जेव्हा न्यायमूर्ती खन्ना यांनी आपली असहमती दर्शवली तेव्हा त्यांनाही अशीच वागणूक देण्यात आली. त्यांच्या ज्येष्ठता क्रमालाही डावलण्यात आले.

बंधू आणि भगिनींनो, आपल्या स्वार्थापुढे हे देशाचे हित पाहत नाहीत आणि लोकशाहीचेही हित पाहत नाहीत. यांच्या मनात कायद्याबाबतही आदर नाही आणि परंपरेविषयीही अभिमान नाही. यांच्या एका नेत्याने सार्वजनिकरित्या केलेले एक वक्तव्य बरेच गाजले होते. ते म्हणाले होते की आम्ही अशा व्यक्तीला मुख्य न्यायाधीश होऊ देऊ, जो आमच्या विचारधारेशी, आमच्या विचारांशी सहमत असेल आणि आमच्या सांगण्यानुसार काम करेल.

मित्रहो, आपल्या देशाची न्यायपालिका, देशाच्या संविधानाला प्रमाणभूत मानून काम करते. मात्र न्यायपालिकेला आपल्या इशाऱ्यानुसार काम करायला लावण्यासाठी एखादा राजकीय पक्ष लोभ, लालूच, वैर, सत्ता या सर्वांचा कशाप्रकारे दुरुपयोग करत राहिला आहे, हे देशाने पाहिले आहे. या पक्षाकडे न्यायपालिकेला अडकवण्याचे, धमकावण्याचे आणि दिशाभूल करण्याचे अनेक प्रकार आहेत आणि त्यांच्यासाठी हे सगळे करणे सवयीचे आहे.

नुकतेच आपण पाहिले की त्यांनी कशाप्रकारे न्यायपालिकेच्या सरन्यायाधीशांविरोधात  महाभियोग प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला. न्यायाधीशांना धमकावण्याचा प्रयत्न, हा त्यांच्या जुन्याच विचारसरणीचा एक भाग आहे.

सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात राहिलेले एक वाक्यही माझ्या चांगलेच लक्षात आहे. यांच्या एका नेत्याने एका खटल्याची सुनावणी सुरू असताना न्यायाधीशालाच विचारले होते की त्यांच्या पत्नीने करवाचौथ साजरी करावी असे त्यांना वाटत नाही का? ही धमकावणी नव्हती का?

बंधू आणि भगिनींनो, हे लोक प्रत्येक संस्थेचा नायनाट करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता लोकशाहीच्या बाता मारत आहेत, मात्र त्यांची वागणूक आणि कट-कारस्थाने यावरून हे लोक आजही स्वतःला देशापेक्षा, लोकशाहीपेक्षा, न्यायपालिकेपेक्षा आणि जनतेपेक्षाही श्रेष्ठ समजतात, हे वारंवार सिद्ध होते. आत्ताच दोन दिवसांपूर्वी आपण याचे आणखी एक उदाहरण पाहिले आहे. म्हणूनच मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना सांगू इच्छितो की सावध रहा, अशा लोकांपासून अशा पक्षांपासून दक्ष राहा.

बंधू आणि भगिनींनो, काँग्रेसचा इतिहास जितका काळा आहे, त्यांचा वर्तमानसुद्धा तितकाच कलंकित आहे. सत्ता आणि स्वार्थात बुडालेल्या या लोकांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना देशाच्या नागरिकांशीही काही देणे घेणे नाही, देशाशीही नाही आणि देशाच्या आर्थिक-सांस्कृतिक समृद्धीशीही नाही. काही विशिष्ट वेळीच त्यांना संस्कृतीची आठवण येते. आमच्यासाठी मात्र देश, देशाची समृद्धी, देशाचे वैभव आणि अध्यात्मिक समृद्धी हा आमच्या विचारसरणीचाच एक भाग आहे.

याच संस्कारांसह उत्तरप्रदेशासह संपूर्ण देशात प्रसाद योजनेअंतर्गत आस्था आणि अध्यात्माशी संबंधित महत्त्वपूर्ण ठिकाणांना परस्परांशी जोडले जात आहे. तेथे सुविधांची निर्मिती केली जात आहे. प्रयागराज असो, काही असो, अयोध्या वृंदावन असो, केदारनाथ पासून कामाख्या आणि सबरीमालापर्यंत अध्यात्माशी संबंधित अशा अनेक केंद्रांचे भव्य आणि दिव्य कार्य निर्माण केले जात आहे

बंधू आणि भगिनींनो, भारत कशाप्रकारे बदलत आहे, नवा भारत कशाप्रकारे पौराणिकता आणि आधुनिकतेचा संगम आत्मसात करत आहे, याची चुणूक अर्धकुंभाच्या वेळी नक्कीच पाहायला मिळेल.

आपणा सर्व प्रयागवासियांना मी आग्रह करतो की आपण आधुनिकता आणि अध्यात्म, विकास आणि विश्वास, तसेच सोय आणि श्रद्धा यांचा संगम करून कुंभाचे यशस्वी आयोजन करावे.

सरकार स्वतःची जबाबदारी पूर्ण करत आहे, मात्र इतके मोठे आयोजन केवळ सरकारी व्यवस्थेच्या आधारे यशस्वी होऊ शकणार नाही. मी स्वतः, योगीजी, आमचे सर्व सहकारी आपल्यासोबत खांद्याला खांदा भिडवून यावेळी अर्धकुंभाचे अभूतपूर्व असे आयोजन करू.

याच आशेसह पुन्हा एकदा आपणा सर्वांना, प्रयागराजला, येथे विकसित होणाऱ्या सर्व विकास प्रकल्पांसाठी अनेकानेक शुभेच्छा देत, मी आपले अभिष्टचिंतन करतो.

जय गंगा मैया -  जय

जय यमुना मैया – जय

जय सरस्‍वती मैया – जय

जय तीर्थराज – जय तीर्थराज

जय तीर्थराज – जय तीर्थराज

भारत माता की – जय

भारत माता की – जय

भारत माता की – जय

अनेकानेक आभार

B.Gokhale/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1556610) Visitor Counter : 90
Read this release in: English