आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
पंतप्रधानांनी केले पार्टनर्स फोरम 2018 चे उद्घाटन
भागीदारीतूनच आपण आपली उद्दिष्टे साध्य करू शकतो-पंतप्रधान
Posted On:
12 DEC 2018 7:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर 2018
नागरिक, समुदाय, देश यांच्यातील भागीदारीमुळेच आपण आपली उद्दिष्टे साध्य करू शकतो. शाश्वत विकास कार्यक्रम हे याचेच प्रतिबिंब आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते आज नवी दिल्लीत पार्टनर्स फोरम 2018 परिषदेत बोलत होते. मातृत्व, बाल आणि किशोरवयीन आरोग्यासंदर्भातील 36 सर्वोत्तम पद्धतींचा संग्रह असलेल्या ‘प्रूव्हन पाथ्स’ या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशनही पंतप्रधानांनी यावेळी केले.
माता, नवजात शिशू आणि बालकांच्या आरोग्यासाठी भागीदारी हा अनोखा आणि प्रभावी मंच आहे असे पंतप्रधान म्हणाले. किशोरवयीन मुलांच्या आरोग्याकडे लक्ष वेधणारा आणि त्यांच्यासाठी विशेष आरोग्य योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या देशांपैकी भारत एक देश असल्याचे त्यांनी नमूद केले. देशातल्या लसीकरण योजनेची प्रशंसा करताना ते म्हणाले की मिशन इंद्रधनुष अंतर्गत गेल्या तीन वर्षात 32.8 दशलक्ष बालके आणि 8.4 दशलक्ष गरोदर महिलांना लस देण्यात आली. या मोहिमेअंतर्गत देण्यात येणाऱ्या लसींची संख्या 7 वरुन 12 करण्यात आल्याचे ते म्हणाले. न्यूमोनिया, अतिसार यांसारख्या जीवघेण्या आजारांवरच्या लसींचाही यात समावेश करण्यात आल्याचे ते म्हणाले.
गरोदर मातांना सर्वोत्तम आरोग्यसेवा पुरवण्यासाठी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान सरकारने सुरू केल्याचे पंतप्रधान म्हणाले. खासगी क्षेत्रातील डॉक्टरांना महिन्यातील एक दिवस या अभियानासाठी देण्याची प्रतिज्ञा करण्याबाबत आवाहन करण्यात आले. या अभियानाअंतर्गत 16 दशलक्ष प्रसूतीपूर्व तपासण्या करण्यात आल्याचे ते म्हणाले. नवजात शिशू आरोग्य प्रणालीमुळे 10 लाख नवजात बालकांना आरोग्य सुविधा पुरवल्या जातात अशी माहितीही त्यांनी दिली.
माता आणि बालमृत्यू दरात वेगाने घट होत असून यासंबंधी शाश्वत विकास उद्दिष्ट निर्धारित वेळेपूर्वी साध्य करू असा विश्वास केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला.
दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत 85 देशांचे 1200 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
N.Sapre/S.Kane/P.Kor
(Release ID: 1555775)
अभ्यागत कक्ष : 164