पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान पार्टनर्स फोरम 2018 चे उद्‌घाटन करणार

Posted On: 11 DEC 2018 3:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 डिसेंबर रोजी नवी दिल्लीत चौथ्या पार्टनर्स फोरमचे उद्‌घाटन करणार आहेत. केंद्र सरकार पार्टनरशिप फॉर मॅटर्नल, न्यूबॉर्न ॲन्ड चाईल्ड हेल्थ (PMNCH) यांच्या सहकार्याने 12 आणि 13 डिसेंबर 2018 रोजी दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करत आहे. सुमारे 85 देशांचे 1500 प्रतिनिधी महिला, बालके आणि किशोरवयीन मुलांचे आरोग्य आणि कल्याण सुधारणे हा यामागचा उद्देश आहे. सर्व प्रकारचे प्रांत आणि उत्पन्न यांच्या आधारे निमंत्रित देशांची निवड करण्यात आली असून जी-7, जी-20, ब्रिक्स यांसारख्या जागतिक आणि प्रादेशिक मंचाचे अध्यक्षपद भूषवणारे देशही यात समाविष्ट आहेत.

महिला, बालके आणि किशोरवयीन मुलांच्या आरोग्याशी संबंधित समस्या सोडवण्यास गती देण्यासाठी ही उच्चस्तरीय, बहुदेशीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. पार्टनर्स फोरमसाठी पुढाकार घेत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी.नड्डा, चिलीच्या माजी राष्ट्रपती डॉ. मिशेल बॅशलेट आणि प्रसिद्ध अभिनेत्री आणि युनिसेफची सदिच्छादूत प्रियांका चोप्रा या पीएमएनसीएचच्या प्रतिनिधीमंडळाने 11 एप्रिल 2018 रोजी पंतप्रधानांची भेट घेतली, यावेळी पंतप्रधानांनी पार्टनर्स फोरमच्या उद्‌घाटनासाठी यायचे मान्य केले.

माता आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, किशोरवयीन, नवजात तसेच मातेचे आरोग्य सुधारण्याच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी सप्टेंबर 2005 मध्ये पार्टनर्स फोरम या जागतिक आरोग्य भागीदारीची स्थापना करण्यात आली. 92 देशांचे हजारांहून अधिक सदस्यांची ही भागीदारी असून यात शैक्षणिक, संशोधन संस्था, दाते, आरोग्य सेवेतील व्यावसायिक, बहुपक्षीय संस्था, खाजगी क्षेत्र यांचा समावेश आहे.

यापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग, भारतात नवी दिल्ली आणि टांझानियाच्या दार-ए-सलाम येथे ही परिषद झाली आहे. भारत दुसऱ्यांदा या पार्टनर्स फोरमचे यजमान पद भूषवत आहे.

शाश्वत विकास उदिृष्टे विशेषत: आरोग्याशी संबंधित उदिृष्टे साध्य करण्याच्या दिशेने यशस्वीपणे काम करण्यासाठी जागतिक आरोग्य समुदायाला सहकार्य करणे हा पीएमएनसीएचचा उद्देश आहे.

या परिषदेत चार पूर्ण सत्रे असतील. राजकीय नेतृत्व, बहु-क्षेत्रीय कृती, उत्तरदायित्व आणि भागीदारीचे सामर्थ्य यावर प्रामुख्याने भर राहील. प्रत्येक पूर्ण सत्रानंतर सहा चर्चासत्रे होतील.

N.Sapre/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1555517) Visitor Counter : 143


Read this release in: English