पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

देशातील प्रत्येक गरीबाच्या घरात एलपीजी जोडणी देण्याचे सरकारचे ध्येय-धर्मेंद्र प्रधान

Posted On: 10 DEC 2018 6:44PM by PIB Mumbai

 

मुंबई, 10 डिसेंबर 2018

 

केंद्र सरकारने सुरू केलेल्या उज्ज्वला या अभिनव कल्याणकारी योजनेमुळे गरीबांच्या जीवनात आशेचा नवा किरण आला आहे, असे मत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमाला ते आज बोलत होते. 2014 पर्यंत केवळ 13 कोटी कुटुंबांकडे एलपीजी जोडणी होती मात्र आता आणखी सुमारे 12 कोटी कुटुंबांना एलपीजी जोडणी देण्यात आली असून आता ही संख्या 25 कोटींवर पोहोचली आहे.  आतापर्यंत 90 टक्के कुटुंबांना एलपीजी जोडणीचा लाभ मिळाला आहे, असे प्रधान यांनी यावेळी सांगितले.

केंद्र सरकार गरीबांसाठी, महिलांसाठी समर्पित असून त्या दिशेने विविध कल्याणकारी योजना सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगात 15 लाख महिलांचा धुरामुळे मृत्यू होतो आणि यातील 5 लाख महिला या भारतातील आहेत, ही दुर्दैवाची गोष्ट आहे, अशी खंत प्रधान यांनी व्यक्त केली.

अडीचवर्षांपूर्वी जेव्हा प्रधानमंत्री योजना सुरू केली तेव्हा त्याचे लक्ष्य 5 कोटी इतके ठेवण्यात आले होते, नंतर हे लक्ष्य 2020 पर्यंत 8 कोटी इतके ठेवण्यात आले आणि यापैकी 6 कोटी आकडा आम्ही 2018 मध्येच पार केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आर्थिक फायदा, सशक्तीकरणाच्या संधी, पर्यावरणपूरक या मुद्यांच्या आधारावर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना साकारली गेली असल्याचे त्यांनी नमूद केले.  प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही गरीब महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक, वेळेची बचत करणारी आणि पर्यावरणपूरक असल्याचे ते म्हणाले.  सर्वांना वीज, सर्वांना घर, घराघरात शौचालय आदी संदर्भातील सरकारचे उपक्रम म्हणजे कल्याणकारी योजना असून त्या गरीबांसाठी समर्पित असल्याचे प्रधान यांनी सांगितले.  प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही याच योजनांमधील आणखी एक यशस्वी पाऊल असल्याचे असे ते म्हणाले.

उज्ज्वला योजनेशी निगडीत ठाणे जिल्ह्यातील महिला लाभार्थीच्या सर्वेक्षणावर आधारित एक अहवाल प्रधान यांना यावेळी सादर करण्यात आला.

 

DJM/S.Tupe/P.Kor

 



(Release ID: 1555427) Visitor Counter : 100


Read this release in: English