माहिती आणि प्रसारण मंत्रालय
इफ्फीमधील इंडियन पॅनोरमातल्या कथाबाह्य चित्रपटांच्या तीन दिग्दर्शकांनी साधला संवाद
Posted On:
27 NOV 2018 9:45PM by PIB Mumbai
पणजी, 27 नोव्हेंबर 2018
49 व्या इफ्फी चित्रपट महोत्सवात इंडियन पॅनोरमा विभागातील कथाबाह्य चित्रपटांच्या तीन दिग्दर्शकांनी गोव्यात पणजी येथे पत्रकार परिषदेला संबोधित केले. ‘नाच भिखारी नाच’ या चित्रपटाचे दिग्दर्शक जैनेंद्र डॉस्ट, ‘सायलेंट स्क्रीम’ चे दिग्दर्शक प्रसन्ना पोंडे आणि ‘येस, आय ॲम माऊली’ चे दिग्दर्शक सुहास जहागीरदार यांनी यावेळी संवाद साधला.
‘नाच भिखारी नाच’ हा चित्रपट बिहारमधल्या भिखारी ठाकूर यांच्या विख्यात नृत्य पथकातील चार कलाकारांच्या जीवनावर आधारित असल्याचे जैनेंद्र डॉस्ट यांनी यावेळी सांगितले. या चित्रपटाविषयी संशोधन करताना भारतातील नृत्य प्रकारांमधे वर्गीय आणि जातीय भेदभाव असल्याचे आढळून आले असे त्यांनी सांगितले. गावकऱ्यांनी या चित्रपटाच्या चित्रीकरणात खुल्या मनाने साथ दिली असे ते म्हणाले.
‘सायलेंट स्क्रीम’ या चित्रपटात घटस्फोटाचा मुलांवर होणारा परिणाम आणि त्यामुळे होणारी भावनिक उलाघाल दाखवण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे दिग्दर्शक प्रसन्ना पोंडे म्हणाले. मुलांमधील भावनिक आंदोलन पाहिल्यानंतर घटस्फोट टाळता आला असता अशीही काही पालकांची धारणा होते असे त्यांनी सांगितले. या चित्रपटात जरी पालकांना लक्ष्य करण्यात आले असले तरी हा चित्रपट मुलांनाही स्पर्शणारा आहे असे ते म्हणाले.
मोबाईल फोनवरील वैयक्तिक अनुभवाचे चित्रपटात रुपांतर करण्याविषयीचे अनुभव ‘येस, आय ॲम माऊली’ चे दिग्दर्शक सुहास जहागीरदार यांनी यावेळी सांगितले. आळंदी ते पंढरपूर असा आध्यात्मिक प्रवास करतांना आलेले अनुभव मोबाईल फोनवर टिपलेले होते. परत आल्यानंतर हे व्हिडीओ मित्रांना दाखवल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार या व्हिडीओंचे एकत्रित संपादन करुन चित्रपट तयार केला असे जहागीरदार म्हणाले.
पार्श्वभूमी:-
नाच भिखारी नाच
‘नाच भिखारी नाच’ या चित्रपटात बिहारमधल्या भिखारी ठाकूर यांच्या विख्यात नृत्य पथकातील चार कलाकारांचे जीवन दर्शवण्यात आले आहे. महिलांच्या वेषात नाटक सादर करणाऱ्या पुरुष कलाकारांचे जीवन नृत्य, संगीत आणि नाट्याच्या माध्यमातून सादर करण्यात आले आहे.
सायलेंट स्क्रीम
‘सायलेंट स्क्रीम’ या चित्रपटात घटस्फोटीत आई-वडीलांमधील मुलाचा ताबा मिळवण्यासाठी झालेल्या संघर्षाचे चित्रण आहे. आपल्या समस्यांमधे गुंतून पडलेल्या पालकांना आपल्या मुलाला काय हवे आहे हे ही लक्षात येत नाही असे दाखवण्यात आले आहे.
येस, आय ॲम माऊली
गेल्या शेकडो वर्षांपासून सुरु असलेल्या आषाढीची वारी या चित्रपटात दर्शवण्यात आली आहे. दिग्दर्शक सुहास जहागीरदार यांनी आपल्या मोबाईलवर या वारीतील मंत्रमुग्ध करणारे वैयक्तिक अनुभव टिपले होते आणि या अनुभवानांच त्यांनी चित्रपटात परिवर्तित केले आहे.
B.Gokhale/J.Patankar/P.Malandkar
(Release ID: 1554098)
Visitor Counter : 95