माहिती आणि प्रसारण मंत्रालय

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आपल्याला योग्‍य दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहित करतात : ‘वॉकिंग विथ दी विंड’चे दिग्दर्शक प्रवीण मोरछले

Posted On: 27 NOV 2018 6:48PM by PIB Mumbai

पणजी, 27 नोव्हेंबर 2018

 

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार म्हणजे आपल्यासाठी कौतुकाची थाप असून हे पुरस्कार वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहन देतात. आपण योग्य दिशेने आहोत याची पोचपावती पुरस्कारामुळे मिळते. सहनिर्मिती, सहयोगाच्या अनेक संधी यामुळे खुल्या होतात असे मत राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट वॉकिंग विथ दी विंड या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण मोरछले यांनी व्यक्त केले. पढाईया राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त चित्रपटाचे दिग्दर्शक अभय सिम्हा यांच्यासह गोव्यात इफ्फीमधे घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते.

वॉकिंग विथ दी विंड हा लडाखी भाषेतला चित्रपट इंडियन पॅनोरमात असून यावर्षीच्या आयसीएफटी युनेस्को गांधी मेडलसाठीही स्पर्धेत आहे. लडाखमधील जनता नम्र आणि सुंदरही आहे. मर्यादित साधनसंपत्ती, खराब हवामान, चार महिन्यांची बर्फवृष्टी या परिस्थितीतही ही जनता आनंदी असते. या चित्रपटातल्या भूमिकांसाठी अभिनेते नसलेल्या स्थानिकांची निवड केल्याचे त्यांनी सांगितले. दहा वर्षाचा त्सेरिंग या मुलाची गोष्ट या चित्रपटात असून शाळेतल्या मित्राची खुर्ची त्याच्या हातून अनवधानाने मोडते. ही खुर्ची तो त्याच्या गावी आणण्याचे ठरवतो. चार दिवसांच्या या वैचारिक प्रवासात त्याला प्रौढत्वाचे सामाजिक, राजकीय वास्तव उमगते.

पढाई हा तुळू भाषेतला चित्रपट असून केवळ दोन ते तीन लाखाचा मच्छिमार समाज ही भाषा बोलतो. देशातल्या नष्ट होणाऱ्या समाजव्यवस्थेवर हा चित्रपट भाष्य करतो. प्रत्येक समाजातल्या वाढत्या महत्वाकांक्षा आणि हाव यामुळे समाजव्यवस्थेला तडे जात असल्याचे यथार्थ चित्रण या चित्रपटात पहायला मिळाले. पढाई म्हणजे पश्चिमी दिशेचे प्रतिक म्हणजेच संस्कृतीच्या पाश्चिमात्यकरणामुळे स्थानिक संस्कृतीचा लोप होत असल्याचे यात मांडण्यात आले आहे.

 

 

B.Gokhale/N.chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 



(Release ID: 1554050) Visitor Counter : 85


Read this release in: English