माहिती आणि प्रसारण मंत्रालय

उत्तम कथा आणि पटकथेमुळे आपल्यात सृजनशीलता निर्माण होत असल्याचे सिनेमॅटोग्राफर पिएर गिल यांचे मत

Posted On: 26 NOV 2018 6:47PM by PIB Mumbai

पणजी, 26 नोव्हेंबर 2018

 

चित्रपटासाठी काम करणे हा आपला विशेष सन्मान आहे. चित्रपटासाठीचा आपला ध्यास हा बहुतांशी कथाकथनातून आला आहे. उत्तम कथा आणि पटकथा आपल्यातल्या सृजनशीलतेला जागृत करते. कथानक वाचतानाच त्यातल्या प्रतिमा आपल्या मनात निर्माण होतात. या प्रतिमा वास्तवात साकारणे हे सर्वात कठीण असल्याचे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर पिएर गिल यांनी सांगितले. गोव्यात सुरु असलेल्या इफ्फीमधे पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. तंत्रदृष्ट्या गुंतागुंतीच्या असलेल्या काही भारतीय चित्रपटांमुळे आणि भारतीय कलाकारांच्या कौशल्यामुळे आपण अचंबित झालो असून भारतात काम करण्याची संधी मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.  

ब्लेड रनर 2049या चित्रपटासाठी साहसी दृश्यं, पाण्याखालची दृश्यं, फ्लाइंग शीप, विस्फोट ही दृश्यं साकारताना आलेले अनुभव त्यांनी विषद केले. यासाठी मोठ्या प्रमाणात ग्रीन स्क्रीन तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे ते म्हणाले. ब्लेड रनरसारखे चित्रपट अद्ययावत साहित्याचा वापर करण्याची संधी देतात. आपल्याला एकाच प्रकारचे काम सातत्याने करायला आवडत नाही असेही त्यांनी सांगितले.

सिनेमॅटोग्राफरची भूमिका अतिशय महत्वाची असते. प्रकाशयोजनेपलीकडे जाऊन दिग्दर्शकाला अभिप्रेत असलेल्या पैलूवर सिनेमॅटोग्राफरला लक्ष केंद्रित करावे लागते. सिनेमॅटोग्राफरला ठाम आणि मजबूत राहावे लागते. त्याला खूप प्रवास करावा लागतो. पैशासाठी हे काम करु नका. तुम्ही उत्तम काम केल्यावर पैसा आपोआप येईल असा सल्ला त्यांनी उदयोन्मुख सिनेमॅटोग्राफरनां दिला. या व्यवसायासाठी अनेक विभागांशी संबंध येत असल्यामुळे तसेच अनेक प्रश्नांकडे लक्ष पूरवावे लागत असल्यामुळे सिनेमॅटोग्राफरला उत्तम मानसिकता जाणता आली पाहिजे. एखादी गोष्ट माहिती नसेल तर ते स्पष्टपणे सांगता आले पाहिजे असे ते म्हणाले. नव्या तंत्रज्ञानाची त्यांनी प्रशंसा केली. मात्र काही सिनेमॅटोग्राफरनी तंत्रज्ञानाचा चांगल्या पद्धतीने वापर केला नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.

पार्श्वभूमी:-

पिएर गील हे जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेले सिनेमॅटोग्राफर आणि सहाय्यक दिग्दर्शक आहेत. अपसाइड डाऊन, कासानोवा, पॉलीटेक्नीक या चित्रपटासाठी ते ओळखले जातात. कॅनडीयन सोसायटी ऑफ सिनेमॅटोग्राफरचे ते सदस्य आहेत.

 

 

B. Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 


(Release ID: 1553918) Visitor Counter : 128


Read this release in: English