माहिती आणि प्रसारण मंत्रालय

आपल्या चित्रपटाची कथा काळाच्या पुढे: प्रतिमा जोशी

Posted On: 26 NOV 2018 5:03PM by PIB Mumbai

पणजी, 26 नोव्हेंबर 2018

 

गोव्यात पणजी येथे 49 व्या इफ्फीमधे इंडियन पॅनोरमात फिचर फिल्मच्या तीन दिग्दर्शकांनी पत्रकार परिषद घेतली. पेराम्बू’चे दिग्दर्शक राम, ‘इ मा याउचे दिग्दर्शक लीजो जोस पेलीस्सरी आणि आम्ही दोघीया चित्रपटाच्या दिग्दर्शक प्रतिमा जोशी या पत्रकार परिषदेत सहभागी झाल्या होत्या. पेराम्बू’ या राम यांनी दिग्दर्शित केलेल्या या तमिळ चित्रपटाला रसिकांची प्रशंसा लाभली. दिव्यांग मूल आणि त्याचे पालकत्व या समस्येभोवती हा चित्रपट असल्याचे राम यांनी सांगितले. भारतीय प्रेक्षक हा प्रगल्भ असून चित्रपटाचा एक कलाकृती म्हणून तो आनंद घेतो. आपल्याला आव्हान वाटणाऱ्या विषयांवर चित्रपट निर्मिती करायला अधिक भावतं असे त्यांनी या संदर्भातल्या प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.

प्रादेशिक, राष्ट्रीय, व्यावसायिक आणि समांतर अशी चित्रपटांची वर्गवारी न करता उत्तम चित्रपट आणि वाईट चित्रपट अशी वर्गवारी हवी असे मत पेलीस्सरी यांनी व्यक्त केले. आपल्या चित्रपटात केवळ 30 ते 40 सेकंद संगीताचा उपयोग केला आहे. मात्र, सभोवतालचा आवाज हेच संगीत असल्याचे ते म्हणाले.

आम्ही दोघीहा चित्रपट म्हणजे एक युवती आणि वयानं तिच्यापेक्षा फारशी मोठी नसलेली तिची सावत्र आई यांच्यातल्या भावबंधाचा 1973 मधल्या कथेवर आधारित हा चित्रपट असला तरी त्याची कथा काळाच्या पुढेच आहे असे चित्रपटाच्या दिग्दर्शक प्रतिमा जोशी यांनी सांगितले. चित्रपटातल्या योग्य भूमिकेसाठी योग्य अभिनेत्यांची निवड या संदर्भात प्रश्न विचारला असता कथानक वाचायला सुरुवात करताच त्या भूमिकेसाठी योग्य चेहरा आपल्या मनात साकारतो असे त्यांनी सांगितले.  

पार्श्वभूमी:-

  1. पेराम्बू

राम यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या या तमिळ चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते मामुटी यांनी भूमिका साकारली आहे. वडील आणि मुलगी यांच्यातल्या भावनिक नाट्यावर हा चित्रपट आहे.

  1. इ मा याउ

मृत्यू आणि त्याचा मानवी जीवनावर होणार परिणाम उपरोधिक पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आला आहे. या चित्रपटासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक पेलीस्सरी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून 48 व्या केरळ राज्य पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

  1. आम्ही दोघी

गौरी देशपांडे यांच्या पाऊस आला मोठा या कथेवर हा चित्रपट असून ही केवळ दोन महिलांची कथा नव्हे. या चित्रपटाद्वारे नातेसंबंधांतला नवा दृष्टीकोन आणि त्यामुळे व्यक्तीमत्वाला येणारा आकार प्रतिमा जोशी यांनी पडद्यावर यशस्वीरित्या सादर केला आहे. आईविना वाढलेल्या सावित्री सरदेसाईचे वडीलही अनेकदा घरापासून दूरच असत. अशा वातावरणात वाढलेली सावित्री आपल्या आयुष्यात व्यवहारी आहे मात्र तिच्या वडिलांनी पुनर्विवाह केल्यानंतर तिच्या आयुष्याचे बदलणारे गणित या चित्रपटाद्वारे पडद्यावर साकारण्यात आले आहे.

 

 

B. Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 



(Release ID: 1553892) Visitor Counter : 131


Read this release in: English