माहिती आणि प्रसारण मंत्रालय

वाराणसीमधल्या विणकरांच्या समस्यांवर उपाय शोधण्याचा आपल्या चित्रपटात प्रयत्न- सत्यप्रकाश उपाध्याय

Posted On: 25 NOV 2018 5:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2018

 

वाराणसीमधले विणकर, वाराणसीतले घाट, नागा मुलीची शौर्य कथा यासारखे वेगवेगळे विषय 49 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सादर करण्यात येत असलेल्या चित्रपटात हाताळण्यात आले आहेत. मिट द डायरेक्टर’ या इफ्फीच्या मिडिया सेंटरमध्ये झालेल्या कार्यक्रमात बुनकर: द लास्ट ऑफ वाराणसी वेव्हर्स, नानी तेरी मोरनीआणि बर्निंगया तीन कथाबाह्य चित्रपटांच्या विषयावर चर्चा झाली.

किमान एक बनारसी साडी आपल्या घरात असणे ही भारतात अभिमानाची बाब मानली जाते मात्र संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेल्या बनारसी सिल्कचे विणकर मात्र अद्यापही दारिद्रयातच खितपत आहेत. बनारसी साडीचे विणकर या मौल्यवान साड्यांना अमाप प्रसिद्धी असूनही त्यांना जीवनसंघर्ष का करावा लागतो याचे उत्तर शोधण्याचा या चित्रपटात प्रयत्न केल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक सत्यप्रकाश उपाध्याय यांनी सांगितले. यंत्रमागावर विणलेल्या साड्या अनेक लोक हातमागावर विणलेल्या साड्या म्हणून खरेदी करतात. या दोन साड्यांमधला फरक सामान्यांना अनेकदा माहितही नसतो. हातमागावर विणलेल्या बनारसी साड्यांसाठी लागणारा वेळ भौगोलिक मानांकन यासारखे मुद्दे या चित्रपटात समाविष्ट आहेत. सामान्‍य माणसाला हातमाग आणि यंत्रमागावरच्या साड्या यातला फरक माहित करुन दिल्याशिवाय हातमाग कारागिरांना मदत होऊ शकणार नाही असा दृष्टीकोन त्यांनी मांडला. बनारसी हातमागावरची वस्त्रे खरेदी करुन हातमागासाठी आपण पाठिंबा दिला नाही तर ही कला एक दिवस नष्ट होण्याच्या मार्गावर राहील असे निर्माते सपना शर्मा यांनी सांगितले.

पाण्यात बुडणाऱ्या आपल्या आज्जीला वाचवण्यासाठी नदीत उडी घेणाऱ्या सात वर्षाच्या मुलीची नागालँडमधली कथा नानी तेरी मोरनी या चित्रपटात सादर करण्यात आली असून या चित्रपटासाठीचा प्रवास दिग्दर्शक आकाशादित्य लामा यांनी उलगडला. या चित्रपटातले म्हान्बेनी इझुंग ही व्यक्तीरेखा आज्जीकडून ऐकलेल्या गोष्टीमुळे प्रेरित झाली आहे. 2015 या वर्षातला राष्ट्रीय शौय पुरस्कार प्राप्त करणारी इझुंगही सर्वात कमी वयाची विजेती होती.

वाराणसी या पवित्र शहराविषयी असलेल्या ध्यासामुळे बर्निंगहा चित्रपट केल्याचे दिग्दर्शक सनोज व्ही एस यांनी सांगितले.

 

पार्श्वभूमी:-

  1. बुनकर: द लास्ट ऑफ वाराणसी वेव्हर्स

वाराणसीमधल्या हातमाग विणकरांचा इतिहास सत्यप्रकाश उपाध्याय यांच्या या चित्रपटात मांडण्यात आला आहे.

  1.  नानी तेरी मोरनी

या चित्रपटात नागालँडमधल्या त्सुंगीकी या खेड्यातल्या शूर मुलीची कथा मांडण्यात आली आहे. मुंबईतल्या चमूने या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण प्रथमच नागालँडमधे केले आहे. हा चित्रपट वास्तव दर्शवणारा ठरावा यासाठी त्याचे चित्रीकरण नागालँडमध्ये करण्यात आले आहे.

  1. बर्निंग

दिग्दर्शक सनोज व्ही एस यांनी दिग्दर्शित केलेल्या या लघुपटात वाराणसीतल्या घाटावर समाजातल्या विचित्र आणि काहीशा क्रुर वास्तवामुळे एकत्र आलेल्या दोन मातांमधला संवाद सादर करण्यात आला आहे.

 

B. Gokhale/N.Chitale/P.Malandkar



(Release ID: 1553864) Visitor Counter : 110


Read this release in: English