माहिती आणि प्रसारण मंत्रालय

इंडियन पॅनोरमामधल्या फिचर फिल्म दिग्दर्शकांनी कथन केल्या चित्रपट निर्मितीतल्या समस्या


सर्वसामान्य कोळ्याच्या जीवनावर आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा परिणाम कल्पकतेने दाखविणारा ‘सिंजर’- पामपल्ली

Posted On: 25 NOV 2018 7:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2018

 

इफ्फीसाठी नोंदणी, तिकिटांसाठी रांगेत उभे राहून तिकीट मिळवणे याच्यासाठी थोडा अवधी लागतही असेल पण जेंव्हा आपण चित्रपटगृहात पोहोचतो आणि जगभरातल्या निवडक चित्रपटांचा आस्वाद घेतो त्यावेळी तो चित्रपट निर्माण करण्यासाठी घेतलेले परिश्रम आणि लागलेला काळ याचा विचार प्रेक्षकांच्या मनात येतो का असा सवाल सिंजरआणि नागरकिर्तनया दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारप्राप्त चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी केला आहे. 49 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पणजी येथे पत्रकार परिषदेत सिंजरचे दिग्दर्शक पामपल्ली आणि नागरकिर्तन चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे रिद्धी सेन उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा लक्षद्वीपमधल्या एका सामान्य मच्छिमारावर कसा परिणाम होतो याचे चित्रण आपल्या चित्रपटात केल्याचे सिंजरचे दिग्दर्शक पामपल्ली यांनी सांगितले. या चित्रपटाला 65 वे राष्ट्रीय चित्रपट उत्तम पदार्पण दिग्दर्शक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर जगामध्ये संघर्ष निर्माण झाल्यानंतर अशा घटनांचा अशिक्षित आणि सामान्य माणसावर काय परिणाम होतो याबाबत आपण विचार करत नाही अशा माणसांना येणाऱ्या समस्या या चित्रपटात दाखवण्यात आल्याचे ते म्हणाले.

कावार्ती बेटासाठी असलेल्या मर्यादित वाहतूक सुविधा, केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे लागणाऱ्या आवश्यक त्या परवानग्या यामुळे निर्मिती प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्याचे ते म्हणाले. जसारी या स्थानिक बोलीभाषेत चित्रपट निर्मिती करताना या भाषेला लिपी किंवा व्याकरण नसल्यामुळे आव्हानं निर्माण झाली. मल्याळी भाषेमध्ये या चित्रपटाचे कथानक लिहीले गेले. स्थानिक युवकांच्या मदतीने त्याचा जसारी भाषेत अनुवाद केला गेला. चित्रपटातल्या अभिनेत्यांना या भाषेच्या उच्चारासाठीही प्रशिक्षण देण्यात आले अशा शब्दात पामपल्ली यांनी चित्रपट निर्मितीचा प्रवास उलगडून दाखवला.

नागरकिर्तनया चित्रपटात ट्रान्सजेंडर व्यक्तीरेखा साकारणे हा आयुष्यात बदल घडवणारा अनुभव असल्याचे या चित्रपटात ही व्यक्तीरेखा साकारणारे रिद्धी सेन यांनी सांगितले. या चित्रपटासाठी रिद्धी सेन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला आहे. पुरुष देह मात्र अंतरंगात स्त्रीत्व असलेल्या व्यक्तीची घुसमट हा चित्रपट आपल्यासमोर सादर करतो. ही भूमिका साकारताना स्त्रियांची देहबोली साकार करणे हे आपल्यासाठी कठीण ठरलेली गोष्ट होती असे रिद्धी सेन यांनी सांगितले. अशा व्यक्तींना समाजाने त्यांना आहे त्या स्वरुपात स्वीकारावे या दृष्टीने केलेला एक लहानसा प्रयत्न म्हणजे हा चित्रपट आहे असे ते म्हणाले. या चित्रपटामुळे समाजातल्या किमान एक टक्का लोकांचा या व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या चित्रपटासाठी दिग्दर्शक कौशिक गांगुली अनेक निर्मात्यांकडे गेले असे सांगून या विषयावर चित्रपट निर्मिती करण्यासाठी भारतात अजूनही काहीशी भीती असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

 

 

B. Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 


(Release ID: 1553850) Visitor Counter : 158


Read this release in: English