माहिती आणि प्रसारण मंत्रालय

घराचा शोध घेतांना आलेले वैयक्तिक अनुभव चित्रपट निर्मितीसाठी ठरले कारणीभूत – चेझियान रा

Posted On: 24 NOV 2018 6:53PM by PIB Mumbai

पणजी, 24 नोव्हेंबर 2018

 

49 व्या इफ्फीमधल्या भारतीय पॅनोरमातील ‘सुदानी फ्रॉम नायजेरिया’, ‘टू लेट’ आणि ‘अब्यक्तो’ या कथा आधारीत चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी आज पणजी इथे पत्रकार परिषदेला संबोधित केले. चेन्नईमध्ये घराचा शोध घेतांना आलेल्या वैयक्तिक अनुभवांमुळे ‘टु लेट’ हा चित्रपट निर्मित केल्याचे चेझियान रा यांनी सांगितले. घर बदलणे ही छोटीशी गोष्ट वाटत असली तरी खऱ्या खुऱ्या आयुष्यात ज्या घरात आपण राहतो, त्या घराशी आपले अनेक भावनिक बंध जुळलेले असतात. ‘टु लेट’ या चित्रपटात या सर्व भावना, तसेच तीस दिवसात घर शोधतांना झालेली भांडणे आणि बसलेले मानसिक धक्के हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.

विख्यात तामिळ दिग्दर्शकांबरोबर चित्रपटांसाठी छायाचित्रण करतांना आलेले अनुभव कथा आधारीत चित्रपट निर्मितीत सहाय्यकारी ठरल्याचे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले. लिहिलेल्या गोष्टींचे रुपेरी पडद्यावरील प्रतिमेत रुपांतरण करण्याचा अनुभव छायाचित्रकार म्हणून घेतल्याचे ते म्हणाले.

‘सुदानी फ्रॉम नायजेरीया’ या चित्रपटाचे दिग्दर्शक झकारीया यांनी आपले अनुभव कथन केले. या चित्रपटाची कथा केरळमधील स्पर्धेत खेळतांना जखमी झालेल्या सुदानी खेळाडूच्या भावबंधांविषयी असल्याचे ते म्हणाले. सुरुवातीला मित्रांनी दिलेल्या निधीतून सुरु झालेला स्वतंत्र प्रकल्प असलेल्या या चित्रपटाला नंतर मल्याळम चित्रपट उद्योगातील दोन प्रमुख निर्मात्यांचा पाठिंबा मिळाला. अल्प खर्चात निर्मित केलेला हा चित्रपट 128 चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. 100 दिवसांहून अधिक चालला आणि बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला, असे झकारीया यांनी सांगितले.

लघुपट निर्मात्यापासून कथा आधारीत चित्रपट निर्माता म्हणून झालेल्या वाटचालीबद्दल बोलतांना ‘अब्यक्तो’ चित्रपटाचे दिग्दर्शक अर्जुन दत्ता म्हणाले की हा त्यांच्या आयुष्याला अधिक समृद्ध करणारा अनुभव होता. कथा आधारीत चित्रपटांची व्याप्ती जरी मोठी असली तरी पायाभूत गोष्टी समानच असतात, असे सांगून चित्रपट विषयाचा अभ्यास आणि निर्मितीपूर्व कार्य हे मजबूत असण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. कुठलाही चित्रपट निर्मित करतांना त्या चित्रपटाप्रती आपण प्रामाणिक राहण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

S.Tupe/J.Patankar/D. Rane

 



(Release ID: 1553756) Visitor Counter : 77


Read this release in: English