माहिती आणि प्रसारण मंत्रालय

चित्रपटाद्वारे समजते हृदयाची भाषा

पणजी, 24 नोव्हेंबर 2018

 

अनेक पिढ्यांपासून चित्रपटांनी जगभरातल्या चित्रपट निर्मात्यांच्या कथा आणि आकांक्षांना आत्मसात केले आहे. आता आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे चित्रपटांच्या कक्षा रुंदावल्या असल्या तरी अजूनही कथाकाराचे मनोगत हाच चित्रपटांचा आत्मा राहीला आहे, याबाबत खुल्या चर्चासत्रात सहभागी झालेल्या सर्वांचे एकमत झाले.

‘चित्रपट उद्योग टिकून राहण्यासाठी नवीन माध्यमांद्वारे नवीन संधी’ या विषयांवर बोलतांना अमेरिकेतील अपलिफ्टींग सिनेमा प्रा. लि.चे डेव्हिड शेपेरिओ यांनी सांगितले की, अनेक शतकांपासून रंगभूमी आणि चित्रपटांतून हृदयाची भाषा नेहमीच समोर आली आहे. तंत्रज्ञान नव्हे, तर हृदयातून उमटणारी भावनाच नेहमी सामोरी येते, असे ते म्हणाले. सध्या चित्रपट निर्मात्यांवर नवीन साधने आणि स्पेशल इफेक्टस्‌नी भुरळ घातली असली, तरी लोकांना नाटक किंवा कलेचे सादरीकरण पाहण्यासाठी आकर्षित करण्याच्या भावनेपासून आपण दूर गेलो आहोत, असे ते म्हणाले.

यासंदर्भात त्यांनी भारतातील एमटीव्हीचे उदाहरण दिले. ‘आशय हरवल्यामुळे एमटीव्ही लोकांच्या आयुष्यात समर्पक राहीला नाही’, असेही त्यांनी सांगितले. चित्रपट प्रेक्षकांसाठी किती सयुक्तीक आहे, आणि किती आशय पोहोचवतो, हे महत्वाचे असल्याचे सांगून ते म्हणाले की, प्रत्येक चित्रपट हा, तुम्ही ज्या लोकांशी संवाद साधता आहात, त्यांच्यासाठी तयार केला पाहिजे आणि चित्रपट निर्मिती तंत्रज्ञानाचा वापर यापासून हे संवाद साधणे पूर्णत: निराळे आहे, असे ते म्हणाले.

चित्रपट निर्मितीत आजही आशयाला केंद्र स्थान असल्याबद्दल चर्चासत्रात सहभागी झालेल्या सर्वांचे एकमत झाले. इफ्फी 2018 मधील कथाबाह्य विभागाचे अध्यक्ष विनोद गणात्रा यांनी सध्याच्या ‘ये भी ले लो’ या भावनेबद्दल चिंता व्यक्त केली. पूर्वी कथेवर अधिक भर दिला जायचा, मात्र आता स्थिती बदलली आहे, असेही ते म्हणाले.

तरुण चित्रपट निर्माते आता उत्तम चित्रपट निर्मित करत आहे, असे कौतुद्गार त्यांनी काढले. यासंदर्भात त्यांनी ‘खरवस’ या चित्रपटाचे उदाहरण दिले. सध्या लघुपट चित्रपट निर्मितीत जागा व्यापत असून, कथाआधारीत चित्रपटांची लांबीही कमी होऊ लागली आहे, असेही ते म्हणाले. यावर्षी इफ्फीसाठी आलेल्या प्रवेशिकांमध्ये 60 टक्के प्रवेशिका या लघुपटांसाठी होत्या, असे गणात्रा यांनी सांगितले.

नवीन तंत्रज्ञानामुळे आपल्या प्रवासाला अधिक चालना मिळाल्याचे, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘सिंजर’ या चित्रपटाच्या माध्यमातून इफ्फीमध्ये पदार्पण करणाऱ्या पामपल्ली यांनी सांगितले. तंत्रज्ञानामुळे नवीन पिढीला चित्रपट बनवणे अधिक सुलभ झाले असली, तरी चित्रपट निर्मितीच्या कौशल्यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

यानंतर झालेल्या प्रश्नोत्तराच्यावेळी ज्येष्ठ चित्रपट निर्माते शाजी करुन म्हणाले की, डिजिटायझेशनमुळे चित्रपट निर्मितीची प्रक्रिया वेगवान झाली आहे. यासंदर्भात त्यांनी ‘अवेटर’ आणि ‘टायटानिक’ यासारख्या चित्रपटांचे उदाहरण दिले. मात्र तंत्रज्ञानावर अवलंबून राहिल्यामुळे चित्रपट स्थानिक मुद्यांपासून दूर जात आहेत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

देशभरात मोठ्या संख्येने सुरु झालेल्या चित्रपट संस्थांबद्दल बोलतांना विनोद गणात्रा म्हणाले की, अनेकदा या संस्थांमधील अध्यापक पुरेसे शिक्षित नसतात. या संस्थांतून योग्य मार्गदर्शन न मिळालेले तरुण चित्रपट निर्माते निराश होतात, असेही त्यांनी सांगितले.

 

 

S.Tupe/J.Patankar/D. Rane

 


(Release ID: 1553753) अभ्यागत कक्ष : 174
Read this releasein: English