माहिती आणि प्रसारण मंत्रालय

कथाबाह्य चित्रपटांच्या दिग्दर्शकांची इफ्फी दरम्यान पत्रकार परिषद


वन्यजीव- मानव संघर्षावर सहजीवन हा एकमेव उपाय – एस. नल्ला मुथू

Posted On: 24 NOV 2018 5:44PM by PIB Mumbai

पणजी, 24 नोव्हेंबर 2018

 

भारतासारख्या देशात पर्यावरण विषयावरच्या चित्रपटांसाठी निर्माते मिळणे कठीण असल्यामुळे स्वत:च या चित्रपटांची निर्मिती करणे उत्तम पर्याय आहे, असे मत प्रसिद्ध दिग्दर्शक आणि छायाचित्रकार नल्ला मुथू यांनी व्यक्त केले. गोव्यात सुरु असलेल्या 49 व्या इफ्फी दरम्यान त्यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. ‘मॉनिटर’ ‘मिडनाईट रन’ आणि ‘ना बोले वो हराम’ या चित्रपटाचे दिग्दर्शक या पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

मुथू यांचा  ‘द वर्ल्डस्‌ मोस्ट फेमस टायगर’ इफ्फीमधे दाखवला जाणार आहे. या चित्रपटाविषयी बोलतांना सर्वसामान्य प्रेक्षकांना नजरे समोर ठेवून हा चित्रपट बनवला असल्याचे त्यांनी सांगितले. रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातल्या ‘मछली’ या जगप्रसिद्ध वाघिणीचे शौर्य, दृढनिश्चय आणि आत्मविश्वासाचे चित्रण या लघुपटात आपल्याला बघायला मिळते. मानव आणि वन्यजीव संघर्षाविषयी प्रश्न विचारला असता, सहजीवन यशस्वी करणे हा यावरचा एकमेव उपाय असल्याचे मुथू म्हणाले.

‘मॉनिटर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक हरी विश्वनाथ यांनीही आपल्या चित्रपटा मागची भूमिका विषद केली. कामाच्या ठिकाणी महिलांचे होत असलेले लैंगिक शोषण रोखण्यासाठी महिलांनी पुढे यावे याची प्रेरणा या चित्रपटातून मिळावी, अशी इच्छा असल्याचे ते म्हणाले. कम्प्युटरच्या मॉनिटरच्या दृष्टिकोनातून पूर्ण चित्रपट चित्रित करण्यात आला आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारी व्यावसायिक रुपाचे तिचे कार्य क्षेत्र आणि व्यक्तिगत आयुष्यात होणारे लैंगिक शोषण याविषयी हा चित्रपट भाष्य करतो.

रेम्या राज यांचा ‘मिडनाईट रन’ हा पहिलाच चित्रपट इफ्फीमधे दाखवला जाणार आहे. एखाद्या व्यक्तिच्या मनातल्या भीतीच्या भावनेत अमुलाग्र बदल होण्याचा प्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे.

पेशावरच्या शाळेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेला चित्रपट ‘ना बोले वो हराम’चे दिग्दर्शक नितीश पाटणकर यांनीही आपल्या चित्रपटाविषयी माहिती दिली. दहशतवाद आणि जगातल्या सगळ्या वाईट गोष्टी यांच्यात परस्पर संबंध आहे, असे मत त्यांनी यावेळी मांडले. लोक आपल्या फायद्यासाठी जात, धर्म किंवा देवाच्याही नावाचा वापर करतात अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आदित्य भगत यांनी लिहिलेल्या कथेवर हा चित्रपट आधारित आहे.

 

 

B. Gokhale/R.Aghor/D. Rane

 



(Release ID: 1553707) Visitor Counter : 95


Read this release in: English