माहिती आणि प्रसारण मंत्रालय

इंडियन पॅनोरमा कथाबाह्य चित्रपटांच्या दिग्दर्शकांची या चित्रपटांचे महत्व आणि आव्हाने या विषयी चर्चा


मुलांमधल्या ऊर्जेला पडद्यावर वाव आणि दिशा मिळते – राजदीप पॉल दिग्दर्शक ‘मलई’

Posted On: 23 NOV 2018 7:36PM by PIB Mumbai

पणजी, 23 नोव्हेंबर 2018

49 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन पॅनोरमा या विभागात दाखवल्या जाणाऱ्या तीन कथाबाह्य चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी काल पत्रपरिषदेत आपल्या चित्रपट निर्मितीच्या अनुभवांविषयी उपस्थितांशी संवाद साधला.

‘मलई’ या ऊरीया चित्रपटाचे दिग्दर्शक राजदीप पॉल यांनी या चित्रपटात मुलांबरोबर काम करतांना आलेले अनुभव सांगितले. मुलांमधल्या प्रचंड ऊर्जेला या क्षेत्रात दिशा आणि गती मिळते. चित्रपटाचे कथानक त्यांना समजले की ते स्वत:च त्यांचे संवाद तयार करतात, त्यामुळे त्यांच्याकडूनच बरच काही शिकण्यासारखे असते, असे पॉल म्हणाले.

‘मलई’ चित्रपटात दुर्गम भागातल्या एका मुलाची कथा चित्रित करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या समन्वयक शर्मिष्ठा मैती यांनी देखिल आपले अनुभव यावेळी सांगितले. लग्नाच्या वरातीत डोक्यावरुन मोठे दिवे वाहून नेणाऱ्या समुदायाची ओळख या चित्रपटातून प्रेक्षकांना होते.

‘पॅम्प्लेट’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर रणखांबे यांनीही मुलांसोबत चित्रपट निर्मिती करतांना आलेले अनुभव पत्रकारांना सांगितले. बाल कलाकार अत्यंत प्रामाणिकपणे आणि उत्साहाने काम करतात, त्यामुळे त्यांच्या सोबत काम करतांना विशेष आनंद मिळतो, असे ते म्हणाले. या चित्रपटात एक छोटा मुलगा धार्मिक विषयाबाबतचे पत्रक वाचतो, या पत्रकाच्या प्रति करुन वाटल्या नाहीत तर त्याच्या आयुष्यात संकट येईल, असे त्यात लिहिले असते. या पत्रकावर विश्वास ठेऊन त्याबद्दल निर्माण झालेल्या भितीचे आणि बाल मनावर होणाऱ्या परिणामांचे वर्णन या चित्रपटात आहे.

‘जिमो – क्विन ऑफ माऊंटन्स’ या वन्यजीव माहितीपटाच्या सहदिग्दर्शिका डोएल त्रिवेदी यांनी लडाख या बर्फाळ प्रदेशातल्या बिबट्यावर हा माहितीपट बनवला आहे. हवामान बदलामुळे या स्नो लेपर्डच्या वास्तव्यावर झालेले विपरित परिणाम आणि या प्राण्याचा अस्तित्वासाठी संघर्ष या माहितीपटात दाखवण्यात आला आहे.

दिग्दर्शक गौतम पांडे यांनीही वन्यजीव माहितीपट आणि लघुपट चित्रिकरणाचे विविध अनुभव यावेळी सांगितले.

मोठ्या चित्रपटांप्रमाणेच लघुपटांनाही मल्टीप्लेक्स किंवा इतर चित्रपटगृहांमधे प्रदर्शित करणे शक्य आहे का? असे विचारले असता, यासाठी सरकारच्या पाठिंब्याची गरज आहे, असे मत सर्व दिग्दर्शकांनी व्यक्त केले.

 

 

 

B. Gokhale/R.Aghor/D. Rane

 



(Release ID: 1553696) Visitor Counter : 103


Read this release in: English