माहिती आणि प्रसारण मंत्रालय

उरोनचोंडी चित्रपट रस्ते, आकाश आणि निसर्गाचा – दिग्दर्शक अभिषेक सहा

पणजी, 22 नोव्हेंबर 2018

 

‘बहुतांश करुन माध्यमांमध्ये चर्चा असते ती शहरी लोकांची. या चित्रपटाच्या माध्यमातून मला गावात राहणाऱ्या लोकांबद्दल, त्यांच्या समस्यांबद्दल बोलायचे होते.’ उरोनचोंडी या बंगाली चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक सहा हे 22 नोव्हेंबर रोजी आयोजित इफ्फी महोत्सवात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी अभिनेता अमर्त्य रॉय आणि चित्रपटातील मुख्य अभिनेत्री राजनंदिनी पॉलही उपस्थित होते. इफ्फी महोत्सवात इंडियन पॅनोरमाअंतर्गत, ‘उरोनचोंडी’ चित्रपट दाखवण्यात आला.

दैनंदिन रहाटगाड्यातून विराम आवश्यक असणाऱ्या तीन पिढ्यांच्या तीन स्त्रियांची गोष्‍ट या चित्रपटात चित्रीत केली आहे. जीवनातील चैतन्य, विरामाची आवश्यकता, दैनंदिन रहाटगाड्यातून मोकळीक याबाबत हा चित्रपट आहे. चित्रपटाचे संपूर्ण चित्रिकरण रस्त्यावर झाले आहे. कुठल्याही भिंती नाहीत. हा चित्रपट आकाश, रस्ता आणि निसर्गाचा असल्याचे सहा यांनी सांगितले.

या चित्रपटात दिग्दर्शकाने कोणतेही धडे दिलेले नाहीत, तर केवळ आपला दृष्टिकोन मांडला आहे, असे अभिनेता अर्मत्यने सांगितले. केवळ 13 दिवसात या चित्रपटाचे चित्रिकरण झाले असून, या चित्रपटामुळे पदार्पणातच खूप शिकायला मिळाले आहे. झारखंड सीमेवरचा लॉरी ड्रायव्हर रंगवण्यासाठी संपूर्णपणे बदलायला लागले, असे अमर्त्यने सांगितले.

अभिनेत्री राजनंदिनीनेही या चित्रपटामुळे पदार्पणातच खूप शिकायला मिळाल्याचे सांगितले. या चित्रपटातल्या भूमिकांसाठी भरपूर मानसिक आणि भावनिक अभ्यास करावा लागला, असे ती म्हणाली.

या चित्रपटातून दिग्दर्शकाने पुरुलियाची संस्कृती दाखवली आहे. तसेच बंगालच्या दुर्गम जिल्ह्यातल्या बंगालीच्या बोलीभाषा, हस्तकला, चित्रपटात वापरल्याचे अमर्त्यने सांगितले.

यापूर्वी पुरुलियाचे असे दर्शन कुठल्या चित्रपटातून घडले नसल्याचे मत राजनंदिनीने व्यक्त केले. इफ्फीमध्ये या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे तिने सांगितले. परदेशी प्रेक्षकांनाही तो आवडल्याचे ती म्हणाली.

वेगवेगळ्या वयोगटातल्या आणि वेगवेगळी सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या तीन महिलांच्या स्वप्नांची, इच्छांची आणि भावनांची गोष्ट या चित्रपटात आहे. सुदिप्ता चक्रवर्ती आणि चित्रा सेन यांच्या भूमिकाही चित्रपटात आहेत.

 

B. Gokhale/S. Kakade/D. Rane


(रिलीज़ आईडी: 1553661) आगंतुक पटल : 120
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English