माहिती आणि प्रसारण मंत्रालय

सर्वोत्कृष्ट चित्रपटाची निवड करणे ही सर्वांना उद्‌भवणारी समस्या-इफ्फी 2018 मधील इंडियन पॅनोरमाचे ज्युरी सदस्य

Posted On: 21 NOV 2018 5:52PM by PIB Mumbai

 

पणजी, 21 नोव्हेंबर 2018

 

भारतातील प्रादेशिक चित्रपटांचा विकास अचंबित करणारा असून हे चित्रपट मोठा पल्ला गाठत आहे असे 49 व्या इफ्फी महोत्सवातील इंडियन पॅनोरमा (कथाधारित) ज्युरी-मंडळाचे अध्यक्ष राहुल रवैल यांनी म्हटले आहे. लवकरच आता दिवस येईल की प्रादेशिक चित्रपट असा वेगळा विभाग राहणार नाही आणि सर्व चित्रपट एकाच विभागांतर्गत गणले जातील. ते आज गोव्याच्या पणजी येथे पत्रकार परिषदेला संबोधित करत होते. इंडियन पॅनोरमात विविध विषयांवरील चित्रपटांचा समावेश करण्यात आला असून यामध्ये लडाख, लक्षद्वीपमध्ये चित्रित झालेल्या तसेच तुळू आणि आसाम भाषेतील चित्रपटांचा समावेश असल्याचे ते म्हणाले. 100 चित्रपटांच्या यादीतून 22 चित्रपटांची निवड करणे हे मोठे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्युरी सदस्य मेजर रवी आणि के. जी. सुरेश यावेळी उपस्थित होते. यावेळी इंडियन पॅनोरमा-कथाबाह्य विभागाच्या ज्युरीचे अध्यक्ष विनोद गणात्रा तसेच पार्वती मेनन आणि सुनील पुराणिक हे ज्युरी सदस्यही उपस्थित होते.

इंडियन पॅनोरमा विभागात निवड झालेले चित्रपट जागतिक मंचावर भारताचे यथार्थ दर्शन घडवण्यासाठी पूर्णत: पात्र असल्याचे ते म्हणाले. ज्युरींपुढे येणाऱ्या सर्वच चित्रपटांकडे भारतीय चित्रपट म्हणूनच पाहिले जाते असेही रवैल यांनी स्पष्ट केले. इंडियन पॅनोरमामधील वगळलेल्या काही चित्रपटांमधून निर्माण झालेला विवाद दुर्दैवी असल्याचे सांगून निर्णय घेण्यासाठी ज्युरींना पूर्णत: स्वायत्तता देण्यात आली होती असे त्यांनी सांगितले.

डिजिटल तंत्रज्ञानाच्या आगमनाबरोबरच अनोखा आशय असलेले लघुपट मोठ्या संख्येने तयार होऊ लागले आहेत असे कथाबाह्य चित्रपट विभागाच्या ज्युरींचे अध्यक्ष विनोद गणात्रा यांनी सांगितले. मात्र चित्रपट निर्मात्यांसमोर गुणवत्तेची खात्री पटवून देण्याचे मोठे आव्हान आहे असेही ते म्हणाले. लोकांची एकाग्रता कमी होत असल्याने कथाधारित चित्रपटांची जागा लघुपट घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चित्रपट निर्मितीत येऊ इच्छिणाऱ्यांसाठी लघुपट हे अतिशय उपयुक्त ठरत आहे असेही ते म्हणाले.

देशातील सर्वोत्तम चित्रपटांच्या निवडीसाठी ज्युरी सदस्यांनी अपार कष्ट घेतल्याचे मेजर रवी यांनी सांगितले. इंडियन पॅनोरमा विभागात देशाच्या विविध भागातील चित्रपटांचा आस्वाद दर्शकांना घेता येईल याकडे ज्युरींनी पूर्ण लक्ष दिल्याचेही ते म्हणाले.

इंडियन पॅनोरमा विभागातील चित्रपटांच्या निवडीबाबत ज्युरीचे सर्व सदस्य समाधानी असल्याचे के. जी. सुरेश यांनी सांगितले. चित्रपटांची निवड करताना लोकशाही पद्धतीचा अवलंब केल्याचे ते म्हणाले. लिंगाधारित तसेच समलैंगिक मुद्यांवरील चित्रपटांचा स्वीकार करण्यासाठी आता भारतीय प्रेक्षक तयार झाले आहेत असेही त्यांनी सांगितले. लघुपटनिर्मात्यांची कल्पकता लक्षणीय असल्याचे कथाबाह्य विभागाच्या ज्युरी सदस्य पार्वती मेनन म्हणाल्या.

गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी दक्षिणेकडील राज्यातून कमी प्रवेशिका आल्या असल्या तरी मराठी आणि बंगाली भाषेतील काही उत्कृष्ट चित्रपटांची संख्या वाढल्याचे त्यांनी सांगितले.

 

S.Tupe/J.Patankar/P.Kor

 



(Release ID: 1553378) Visitor Counter : 102


Read this release in: English