राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपती राम नाथ कोविंद ऑस्ट्रेलिया भेटीवर

Posted On: 21 NOV 2018 3:53PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2018

 

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे आज ऑस्ट्रेलियात सिडनी येथे आगमन झाले. राष्ट्रपती व्हिएतनाम आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांच्या दौऱ्यावर असून भारतीय राष्ट्रपतींनी ऑस्ट्रेलियाला दिलेली ही पहिलीच भेट आहे.

ऑस्ट्रेलियातील भारतीय उच्चायुक्त डॉ. अजय एम. गोंदाणे यांनी आयोजित केलेल्या भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात राष्ट्रपती कोविंद सहभागी झाले. ऑस्ट्रेलियाची अर्थव्यवस्था आणि ऑस्ट्रेलियन समाजाप्रती भारतीय समुदायाच्या योगदानामुळे भारतीय समुदायाकडे मोठ्या आदराने पाहिले जाते आणि ही अभिमानाची बाब आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले. ऑस्ट्रेलिया तसेच जगभरात आज भारतीय व्यावसायिकांना मोठी मागणी आहे. भारतीय समुदायातील व्यावसायिक, डॉक्टर्स, शिक्षक, बँकर्स आणि तंत्रज्ञान तज्ञ हे ऑस्ट्रेलियाच्या उपयुक्ततेत मोलाची भर घालत आहेत, असे राष्ट्रपती म्हणाले.

ऑस्ट्रेलिया हे अनेक भारतीय विद्यार्थ्यांसाठी घरच आहे. हे विद्यार्थी शैक्षणिक, संशोधन आणि क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. या विद्यार्थ्यांचे परिश्रम आणि कौशल्य हे ऑस्ट्रेलिया-भारताच्या ज्ञान क्षेत्रातील भागीदाराचे प्रतीक आहे, असे राष्ट्रपती म्हणाले.

तत्पूर्वी राष्ट्रपती कोविंद यांनी सिडनीमधल्या ऍनझॅक युद्ध स्मारकाला भेट देऊन आदरांजली अर्पण केली. पहिल्या महायुद्धात देशसेवा बजावणाऱ्या ऑस्ट्रेलियन सैनिकांना आदरांजली म्हणून हे स्मारक उभारण्यात आले होते. या भेटीनंतर भारतीय समुदायाशी संवाद साधतांना राष्ट्रपतींनी पहिल्या महायुद्धात, गॅलीपोली सागरी किनाऱ्यावरील लढाईसह इतर लढायांमध्ये ऑस्ट्रेलियन सैनिकांसोबत लढा देणाऱ्या भारतीय सैनिकांचा विशेष उल्लेख केला. पहिल्या महायुद्धाच्या सांगतेच्या शताब्दी वर्षाचे स्मरण या महिन्याच्या सुरुवातीला करण्यात आले.

 

S.Tupe/J.Patankar/P.Kor



(Release ID: 1553367) Visitor Counter : 101


Read this release in: English