पंतप्रधान कार्यालय

हरियाणामधील पश्चिम द्रुतगती मार्गावरील कुंडली-मानेसर भागाच्या कामाच्या आणि बल्लभगढ-मुजेसर मेट्रो लिंकच्या उद्‌घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

Posted On: 19 NOV 2018 10:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19  नोव्हेंबर 2018

 

हरियाणाचे राज्यपाल श्री सत्यदेव नारायण आर्य जी, हरियाणाचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री मनोहर लाल खट्टर, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी चौधरी वीरेंद्र सिंहजी, राव इंद्रजीत सिंहजी, राज्य सरकार मधील सर्व मंत्री महोदय, काही इथे तर काही तिथे बसले आहेत आणि त्याचबरोबर मोठ्या संख्येने उपस्थित हरियाणामधील माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो,

आताच हरियाणाचे मुख्यमंत्री मला सांगत होते की मला अनेक वेळा आपल्याकडे येण्याची संधी मिळाली आहे आणि गेल्या काही दिवसात मी दोन वेळा आपल्याकडे आलो आहे. मागच्या वेळी जेव्हा मी आलो होतो, तेव्हा मला चौधरी छोटू राम जी यांच्या विशाल प्रतिमेचे अनावरण करण्याची संधी मिळाली होती. ती प्रतिमा हरियाणाच्या गौरवाचे प्रतीक आहे. आज पुन्हा एकदा मी हरियाणामध्ये आहे, जेथे या प्रदेशाला 3300 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याची भेट मिळाली आहे. आज हरियाणाने सर्वंकष विकासाच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलले आहे. मित्रहो, हरियाणाच्या या भूमीवर ज्ञानाचा प्रकाश आहे, त्याचबरोबर साहसाची गौरवगाथा सुद्धा आहे. लडाखमध्ये रेजांग ला येथे 18 हजार फूट उंचीवर सुरू असणाऱ्या संघर्षाला काल 56 वर्षे पूर्ण झाली. या लढाईमध्ये हरियाणाच्या सुपुत्रांनी परमवीर चक्र विजेते मेजर शैतान सिंह यांच्या नेतृत्वाखाली अतुलनीय पराक्रम गाजवला होता. या युद्धातील शहिदांपैकी अनेक जण हरियाणाच्या याच भागातील रहिवासी होते. हरियाणा म्हणजे हिम्मत, साहस, धाडस आणि सहकार्य, हे या वीरांनी दाखवून दिले. रेजांग ला चौकीवर शहीद झालेल्या देशाच्या त्या वीर जवानांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांना वंदन करतो.

मित्रहो, आजचा दिवस हरियाणासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आता कुंडली-मानेसर-पलवल द्रुतमार्ग देशाला समर्पित करण्याची संधी मिळाली आहे. याचा पहिला टप्पा दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाला होता. कुंडली पासून मानेसर पर्यंतच्या 83 किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे आज लोकार्पण झाले आहे. त्याचबरोबर आता 135 किलोमीटर अंतराचा हा द्रुतगती मार्गही पूर्ण झाला आहे. तसेच सुमारे 500 कोटी रुपये खर्चून तयार होणाऱ्या बल्लभगड मुजेसर मेट्रो लाईन प्रकल्पाची सुरुवातही झाली आहे. या सर्व योजनांमुळे अनेक क्षेत्रे परस्परांशी जोडण्याबरोबरच या भागात नवी क्रांती घडून येईल, तसेच श्री विश्वकर्मा कौशल्य विद्यापीठाच्या माध्यमातून येथील युवकांना नवीन ताकद मिळेल.

बंधू आणि भगिनींनो, दोन वेगवेगळ्या प्रतिमांचे स्मरण करण्याचा आजचा हा विशेष दिवस आहे. त्यातील एक प्रतिमा वर्तमानाची आहे. जेव्हा संकल्पासह एखादे काम केले जाते, तेव्हा ते निश्चितच सिद्धीला जाते, हे दर्शविणारी ही प्रतिमा आहे. ही प्रतिमा भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या कार्यसंस्कृतीची आहे, आमच्या काम करण्याच्या पद्धतीची आहे. तर   दुसरी प्रतिमा, यापूर्वीच्या सरकारच्या काळात कशाप्रकारे काम होत असे, याचे स्मरण करून देणारी आहे. या द्रुतगती मार्गावर तब्बल बारा वर्षे काम सुरू होते, हे त्या प्रतिमेवरून लक्षात येते. हा द्रुतगती मार्ग  आठ - नऊ वर्षांपूर्वी तयार व्हायला हवा होता, मात्र असे झाले नाही. आधीच्या सरकारच्या कार्य पद्धतींमुळे हा द्रुतगती मार्ग पूर्ण व्हायला तब्बल 12 वर्षांचा अवधी लागला.

मित्रहो, या द्रुतगती मार्गाचा वापर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये होणार होता, जेव्हा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा झाल्या तेव्हा हा द्रुतगती मार्ग वापरात येणार होता. मात्र राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची जी गत झाली, तीच कहाणी या द्रुतगती मार्गाची साक्षीदार ठरली. मला आठवते आहे की जेव्हा प्रगतीच्या बैठकांमध्ये मी या प्रकल्पाचा आढावा घ्यायला सुरुवात केली, तेव्हा त्यातील अनेक बाबी नव्याने समोर आल्या होत्या. केंद्र सरकारचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यानंतर या कामाला वेग आला आणि आज हे काम पूर्ण झाले आहे. कित्येक वर्षांची प्रतीक्षा संपली आहे.

बंधू आणि भगिनींनो, विचार करा. अडकवणे, थकवणे आणि दिशाभूल करण्याच्या संस्कृतीने हरियाणाचे, येथील जनतेचे, संपूर्ण दिल्लीचे किती मोठे नुकसान केले आहे... मित्रहो, आधीच्या सरकारच्या काळात ज्याप्रकारे या प्रकल्पावर काम करण्यात आले, तो एक अभ्यासाचा विषय आहे, ज्यातून जनतेच्या पैशांचा कशा प्रकारे गैरवापर केला जातो, हे लक्षात येते. जनतेवर कशा प्रकारे अन्याय केला जातो, हे लक्षात येते. जेव्हा हा प्रकल्प सुरू झाला होता, तेव्हा यावर बाराशे कोटी रुपये खर्च होतील, असा अंदाज होता. आज इतक्या वर्षांच्या विलंबामुळे हा खर्च तिपटीपेक्षा जास्त वाढला आहे. मित्रहो, द्रुतगती मार्गाचे हे काम वेळेत पूर्ण झाले असते तर आज दिल्लीमध्ये वाहतुक यंत्रणेचे वेगळे चित्र दिसले असते. आता हा द्रुतगती मार्ग तयार झाल्यामुळे इतर राज्यांमधून येणाऱ्या मोठमोठ्या गाड्यांसमोर दिल्लीमधून जाण्याची अपरिहार्यता संपुष्टात आली आहे. दिल्लीत दाखल न होताच, तेथील वाहतुक कोंडीला सामोरे न जाता परस्पर पुढच्या प्रवासाला निघून जाऊ शकतात. या द्रुतगती मार्गामुळे आता दिल्लीमध्ये दाखल होणाऱ्या गाड्यांची संख्याही कमी होईल.

मित्रहो, हा द्रुतगती मार्ग दिल्ली आणि परिसरातील प्रदूषण कमी करण्यातही मोठी भूमिका बजावेल. एकप्रकारे हा द्रुतगती मार्ग, अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि जगण्यातील सुलभतेसह प्रवासातील सुलभतेलाही गती देणारा ठरणार आहे. याबद्दल मी हरियाणामधील जनतेला, दिल्ली एनसीआर मधील जनतेला अनेकानेक शुभेच्छा देतो. आता दिल्लीच्या चारही बाजूंना सुमारे 270 किलोमीटर अंतराचे द्रुत मार्गांचे जाळे पूर्ण झाले आहे.

बंधू आणि भगिनींनो, आज वल्लभगड पासून मुजेसरला मेट्रो द्वारे जोडण्यात आले आहे. आता वल्लभगड सुद्धा मेट्रोच्या नकाशावर दिसू लागला आहे. यामुळे येथील लोकांना दिल्लीला जाणे सोयीचे होईल, त्याचबरोबर वेळेची आणि पैशांची बचतही होईल. मित्रहो, आमचे सरकार जोडणी ही केवळ आवश्यकता मानत नाही तर देशाची समृद्धी, संरक्षण आणि सशक्तीकरणाचे माध्यम आहे, असे मानते.  देशांमध्ये रस्ते जोडणी, रेल्वे जोडणी, जलमार्ग जोडणी, महामार्ग जोडणी आणि आय वे जोडणीच्या अशा पायाभूत सुविधा तयार व्हाव्यात, ज्या एकविसाव्या शतकाच्या सर्व आवश्यकता पूर्ण करणाऱ्या असतील, ज्या परस्परांना पूरक असतील. अशा सुविधा देण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. सध्या देशात अनेक रेल्वे कॉरिडोर तसेच महामार्ग कॉरिडोरची कामे वेगाने सुरू आहेत. देशाच्या अनेक शहरांमध्ये एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन यंत्रणेची कामेही वेगाने सुरू आहेत. लोकांचा प्रवास कमीत कमी वेळेत व्हावा, शहरांमधील वाहतूक कोंडीची समस्या दूर व्हावी, आमच्या उद्योगांकडे वाहतुकीची अत्याधुनिक साधने तसेच स्वस्त साधनांचा पर्याय असावा, या दृष्टीने काम केले जात आहे. या सर्व प्रयत्नांमध्ये पर्यावरणाची हानी होणार नाही, रक्षण होईल, याकडे सुद्धा विशेष लक्ष दिले जात आहे. त्यासाठी प्रदूषण कमी करण्यात सहाय्यक ठरणार्‍या साधनांना वाहतुकीसाठी प्राधान्य प्रोत्साहन दिले जात आहे. इलेक्ट्रिक रेल्वे मार्गाचा विस्तार, इलेक्ट्रिक कारसाठी स्रोतांचा विस्तार, हे याच दिशेने सुरू असणारे प्रयत्न आहेत.

मित्रहो, देशात  नवनव्या आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारतांना आम्ही वेगाकडेही विशेष लक्ष दिले आहे. गेल्या चार वर्षांमध्ये सरकारने तीन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करत सुमारे 33 हजार किलोमिटर अंतरापेक्षा जास्त लांबीचे नवीन महामार्ग तयार केले आहेत. यापूर्वीच्या सरकारने आपल्या कारकिर्दीतील साडे सात वर्षांमध्ये जितके महामार्ग तयार केले, त्यापेक्षा जास्त आम्ही चार वर्षांमध्ये तयार केले. मित्रहो, तेच लोक आहेत, काम करणारे तेच आहेत, कार्यालये तीच आहेत, फाईल सुद्धा त्याच आहेत मात्र जेव्हा इच्छाशक्ती असते, संकल्पशक्ती असते, तेव्हा कोणतेही उद्दिष्ट साध्य करणे कठीण नसते. त्याचमुळे 2014 पूर्वी एका दिवसात केवळ 12 किलोमीटर अंतराचा महामार्ग तयार होत असे, आज मात्र प्रतिदिन सुमारे 27 किलोमीटर अंतराचा महामार्ग तयार केला जात आहे. या गतीने भारतमाला प्रकल्पांतर्गत देशात 35 हजार किलोमीटर अंतराचे महामार्गाचे जाळे निर्माण करण्याचे काम वेगाने पूर्ण केले जात आहे. केवळ महामार्गच नाही तर रेल्वे जोडणीचे कामही देशात वेगाने होत आहे. जेथे रेल्वेचे रूळ नव्हते, तेथे वेगाने रेल्वेचे जाळे विस्तारले जात आहे. आवश्यक तेथे रूळांचा विस्तार केला जात आहे. मित्रहो, आमच्या सरकारने नेहमीच देशाच्या आवश्यकता आणि लोकांच्या आशा-आकांक्षा प्रमाणभूत मानून काम केले आहे. त्यांच्या सोयीनुसार रेल्वे गाड्यांचा वेग वाढवला जात आहे. रेल्वेगाड्यांचे, स्थानकांचे आधुनिकीकरण केले जात आहे. आपण पाहिले असेल की, देशात तयार करण्यात आलेली इंजिन रहित आधुनिक रेल्वेगाडीसुद्धा आता रुळांवर लावण्यास सज्ज झाली आहे. ही रेल्वेगाडी, मेक इन इंडियाच्या दिमाखात भर घालत आहे.

बंधू आणि भगिनींनो, सरकार देशाची जनशक्ती तसेच देशाच्या जलस्रोतांच्या पुरेपूर वापरावर सुद्धा भर देत आहे. देशात 100 पेक्षा जास्त नवे जलमार्ग तयार केले जात आहेत. आत्ताच काही दिवसांपूर्वी बनारसमध्ये नदीमार्गे देशातील पहिला मालवाहू कंटेनर दाखल झाला. बनारस-हल्दिया जलमार्गावर आता जहाजांमधून मालवाहतुकीला सुरुवात झाली आहे. गंगा नदीच्या माध्यमातून उत्तर प्रदेश ईशान्येकडील राज्यांशी जोडले गेले आहे. त्याचबरोबर देशात हवाई वाहतूक स्वस्त करण्यासाठी उडान सारखी योजना राबवली जात आहे. येथे हिसार मध्ये सुद्धा विमानतळ बांधण्यात आला आहे, ज्यायोगे हिसार सुद्धा उडान योजनेत समाविष्ट होऊ शकेल.

बंधू आणि भगिनींनो, सरकारच्या धोरणांचा हा परिणाम आहे की, हवाई चप्पल वापरणारे माझे बंधु-भगिनी आता हवाई प्रवास करू शकणार आहेत. मित्रहो, डिजिटल भारत अभियानांतर्गत देशातील प्रत्येक पंचायत  ब्रॉडबँड कनेक्टिविटीने जोडण्याच्या योजनेवर काम सुरू आहे. यापूर्वीच्या सरकारने, लक्षात घ्या, यापूर्वीच्या सरकारने जेथे चार वर्षांमध्ये केवळ 59 पंचायतींना ऑप्टिकल फायबरच्या माध्यमातून जोडले, तिथेच आमच्या सरकारने चार वर्षांमध्ये आतापर्यंत एक लाख पेक्षा जास्त पंचायतींना ऑप्टिकल फायबरने जोडले आहे. 59 कुठे आणि एक लाख पेक्षा जास्त कुठे.

मित्रहो, कोणत्याही क्षेत्रातील वाढती जोडणी आपल्यासोबत रोजगाराच्या नव्या संधी घेऊन येते. महामार्गांचे निर्माण होते, मेट्रो किंवा रेल्वे मार्ग किंवा जलमार्ग विकसित होतात, तेव्हा वाहतूक बांधणीपासून उत्पादन आणि सेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध होतात. हरियाणा सरकार युवकांना रोजगाराच्या नव्या संधी प्रदान करण्याबरोबरच रोजगाराचे बदलते स्वरूप स्वीकारण्यासाठी त्यांना सज्ज करण्यावर सुद्धा भर देत असल्याचे पाहून मला आनंद होतो आहे. श्री विश्वकर्मा कौशल्य विद्यापीठाची पायाभरणी, हे या दिशेने टाकलेले फार मोठे पाऊल आहे. हे विद्यापीठ, हरियाणा आणि या क्षेत्रातील युवकांना नोकर्‍यांच्या बदलत्या स्वरूपानुसार कौशल्य प्रशिक्षण देण्याचे महत्त्वाचे काम करणार आहे. हे विद्यापीठ युवकांना आपल्या हिमतीवर स्वतःचा उद्योग सुरू करण्याचे शिक्षण देईल आणि शक्ती देईल. कौशल्याचे दैवत असणारे भगवान विश्वकर्मा यांच्या आशीर्वादाने या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील मार्गक्रमणा सोपी होईल, असा विश्वास मला वाटतो.

बंधु आणि भगिनींनो, आज हरियाणा निर्यात करण्याच्या बाबतीत देशातील एक अग्रणी राज्य आहे. यात राज्यातील 22 हजार पेक्षा जास्त लहान-मोठे तसेच मध्यम उद्योग, यांचे फार मोठे योगदान आहे. हे कौशल्य विद्यापीठ, येथील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रालाही सक्षम करणार आहे. येथून शिक्षण प्राप्त करून बाहेर पडणारे विद्यार्थी, कुशल साधनांची निर्मिती करतील आणि मेक इन इंडियाच्या गौरवात आणखी भर घालतील.

मित्रहो, आपल्याला माहिती असेल की सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी नुकतेच 12 महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. जीएसटीशी जोडल्या गेलेल्या हरियाणामध्ये लहान उद्योजकांना आता एक कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज केवळ 59 मिनिटांमध्ये मिळू शकेल. त्या व्यतिरिक्त उत्पादन वाढवण्यासाठी, उत्पादनाच्या बाजारपेठेची व्याप्ती वाढविण्यासाठी आणि प्रक्रियांच्या सुलभीकरणासाठी सुद्धा अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. बंधू आणि भगिनींनो, हे सरकार देशातील उद्योजकांना सक्षम करू इच्छिते, युवकांना गती देऊ इच्छिते, आपल्या युवकांना नाविन्यतेच्या माध्यमातून उद्योजकांच्या दिशेने पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देऊ इच्छिते. त्यांच्या संकल्पनेनुसार काम करण्यासाठी भांडवल कमी पडू नये, याची काळजी घेतली जात आहे. स्टार्ट अप इंडिया,  stand-up इंडिया अशा योजना या दृष्टीने काम करत आहेत. याच विचारांमुळे देशातील युवकांना मुद्रा योजनेअंतर्गत हमी शिवाय सहा लाख 70 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज देण्यात आले आहे. यात सर्वात महत्त्वाची बाब अशी की मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज घेणाऱ्यांमध्ये 70 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त महिलांचा समावेश आहे. ही योजना एका प्रकारे देशातील महिलांसाठी स्वयंरोजगाराचे मोठे साधन झाली आहे आणि हरियाणामधील माझ्या भगिनी आणि लेकींना याचा निश्चितच लाभ होतो आहे.

मित्रहो,  आमचे सरकार महिलांचे जीवन सुलभ करण्यासाठी निरंतर कार्य करत आहे. देशात स्वच्छ भारत अभियानांतर्गत तयार करण्यात आलेली नऊ कोटी प्रसाधनगृहे असोत किंवा उज्वला योजनेच्या माध्यमातून प्रदान करण्यात आलेल्या सुमारे सहा कोटी गॅस जोडण्या असोत, या दोन्ही योजनांच्या माध्यमातून महिलांचे आयुष्य सोपे झाले आहे. केंद्र सरकारच्या या धोरणाला स्वीकारत हरियाणाने सुद्धा संपूर्ण सहकार्य दिले आहे. बेटी बचाव बेटी पढाव योजना, खेलो इंडिया योजना यांचे यश, हे फार मोठे उदाहरण आहे. येथील मुले आणि मुलींनी क्रीडा स्पर्धांमधून देशासाठी सर्वात जास्त पदकांची कमाई केली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असो किंवा आशियाई क्रीडा स्पर्धा असो, हरियाणाच्या मुलींनी, युवकांनी आपल्या कर्तबगारीने हरियाणाचे नाव उंचावले आहे.

बंधू आणि भगिनींनो, भाजपची सरकारे केंद्रात असो वा राज्यात, हरियाणामध्ये असो किंवा राजस्थानमध्ये, मध्यप्रदेशमध्ये असो किंवा छत्तीसगडमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये असो किंवा उत्तर पूर्वेमध्ये, सबका साथ, सबका विकास या मंत्रासह आम्ही सर्व काम करत आहोत. देशात व्यापक स्तरावर याचा परिणाम दिसून येऊ लागला आहे. हरियाणातील जनता या सर्व प्रयत्नांमध्ये सक्रिय सहभागी होत आहे,  याचा मला मनापासून आनंद होत आहे. वेस्टन पेरिफेरल एक्सप्रेस वे मेट्रो आणि कौशल्य विद्यापीठाचे लोकार्पण आणि पायाभरणी बद्दल मी पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो आपले सर्वांचे मनापासून आभार मानतो!!

 

B.Gokhale/M.Pange/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1553311) Visitor Counter : 95


Read this release in: English