पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांच्या हस्ते पश्चिम द्रुतगती मार्गावरच्या कुंडली-मानेसरचे आणि बालबगढ-मुजेसर मेट्रो लिंकचे उद्‌घाटन

Posted On: 19 NOV 2018 10:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर 2018

 

हरियाणामधल्या गुरुग्रामजवळच्या सुलतानपूर येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम परिघीय द्रुतगती मार्गावरच्या कुंडली-मानेसर-पलवाल या विभागाचे उद्‌घाटन झाले. त्याशिवाय, बालबगढ-मुजेसर मेट्रो लिंकचेही उद्‌घाटन झाले तसेच विश्वकर्मा कौशल्य विद्यापीठाचे भूमीपूजनही त्यांनी केले.

यावेळी झालेल्या सभेत बोलतांना या द्रुतगती मार्ग आणि मेट्रोमुळे हरियाणात वाहतूक क्षेत्रात आमूलाग्र बदल होईल असा विश्वास, पंतप्रधानांनी व्यक्त केला.

हा द्रुतगती महामार्ग प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यास केंद्र सरकारचे प्राधान्य आहे, असे ते म्हणाले. या द्रुतगती मार्गामुळे दिल्ली आणि आसपासच्या परिसरातील प्रदूषण कमी होईल आणि जनतेचा प्रवास सुकर तसेच पर्यावरण स्नेही होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

वाहतूक आणि दळणवळणाच्या क्षेत्राला गती देण्यावर भर देत, त्यामुळे देशात समृद्धी येते असे पंतप्रधान म्हणाले. वाहतुकीमुळे सर्वसामान्य जनता त्वरीत शहरांमध्ये पोहचू शकते, असे त्यांनी सांगितले. महामार्ग, मेट्रो, जलमार्ग अशा विविध मार्गांमुळे उत्पादन, बांधकाम आणि सेवा क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, असे पंतप्रधानांनी सांगितले. सध्या देशात दररोज 27 किलोमीटर लांबीचे महामार्ग बांधले जात  असून केंद्र सरकारचा भारत बदलण्याचा संकल्पच साकार होत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

देशातल्या युवकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. हरयाणात निर्माण होणाऱ्या विश्वकर्मा कौशल्य विद्यापीठामुळे युवकांना कौशल्य विकासाचे शिक्षण आणि व्यावसायिक रोजगार उपलब्ध होतील, असे ते म्हणाले.

केंद्र सरकारच्या दृष्टीकोनानुसार हरियाणात योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्‍त केले. देशाच्या विविध क्षेत्रात, विशेषत: क्रीडा क्षेत्रात हरयाणातील युवकांनी दिलेल्या योगदानाचंही त्यांनी कौतुक केले.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar

 

 



(Release ID: 1553274) Visitor Counter : 68


Read this release in: English