पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलीह यांच्यातील चर्चेनंतर जारी करण्यात आलेले संयुक्त निवेदन

Posted On: 17 NOV 2018 8:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर 2018

 

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहीम मोहम्मद सोलीह यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल सोलीह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे.

या सोहळ्यासाठी आमंत्रण दिल्याबद्दल मोदी यांनीही राष्ट्राध्यक्ष सोलीह यांना धन्यवाद दिले. मालदीवमध्ये लोकशाही राष्ट्राची पुर्नस्थापना झाल्याबद्दल भारतीय जनतेच्या वतीने पंतप्रधानांनी मालदीवच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. कुठल्याही देशात शांतता, स्थैर्य आणि समृद्धी नांदण्यासाठी लोकशाही व्यवस्था आवश्यक असते असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत हिंदी महासागर क्षेत्रात शांतता आणि सुरक्षा अबादित राखणे महत्वाचे असल्याबद्दल सहमती व्यक्त करण्यात आली तसेच या प्रदेशाच्या स्थैर्यासाठी परस्परांच्या आकांक्षा आणि चिंता यांची दखल तसेच काळजी घेतली जाईल याबद्दल दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली.

या प्रदेशात तसेच इतरत्र वाढलेला दहशतवादाचा धोका दूर करण्यासाठी परस्पर सहकार्य वाढवण्याबाबतही दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी आपली कटिबद्धता व्यक्त केली.

सोलीह यांनी मालदीवचा कारभार स्वीकारल्यानंतर देशातल्या बिकट आर्थिक परिस्थितीविषयी त्यांनी मोदी यांना माहिती दिली. अशा परिस्थितीतून मार्ग काढत मालदीवच्या विकासासाठी भारत काय सहकार्य करु शकेल या विषयी उभय नेत्यांनी चर्चा केली. विशेषत: मालदीवमध्ये गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांच्या विकासाच्या गरजा अधिक तीव्र आहेत तसेच पाणी आणि सांडपाणी व्यवस्था निर्मितीचा प्रश्नही प्राधान्याने हाताळण्याची गरज आहे अशी माहिती सोलीह यांनी पंतप्रधान मोदी यांना दिली.

मालदीवमध्ये शाश्वत सामाजिक आणि आर्थिक विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारत सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन मोदी यांनी दिले. ज्या-ज्या क्षेत्रात शक्य होईल त्या सर्व क्षेत्रात भारत मदतीचा हात देईल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. त्याशिवाय मालदीवच्या गरजांनुसार लवकरात लवकर प्रत्यक्ष काम सुरु करण्यासाठी दोन्ही देशाच्या प्रतिनिधींनी भेटण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली.

मालदीवच्या विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी भारतीय कंपन्यांना संधी उपलब्ध केल्याचे पंतप्रधानांनी स्वागत केले. ही गुंतवणूक दोन्ही देशांसाठी लाभदायक ठरेल असेही ते म्हणाले. दोन्ही देशांचे नागरिक परस्परांच्या देशात पर्यटन आणि इतर कारणांसाठी वारंवार प्रवास करतात हे लक्षात घेऊन व्हिसा प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.

मोदी यांनी सोलीह यांना लवकरात लवकर भारत भेटीवर येण्याचे आमंत्रण दिले. सोलीह यांनी या आमंत्रणाचा स्वीकार केला आहे.

मालदीवचे परराष्ट्र व्यवहार मंत्री येत्या 26 नोव्हेंबरला भारतात येणार असून त्यावेळी ते राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्याविषयी चर्चा करतील.

पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा मालदीवचा औपचारिक दौरा करावा अशी अपेक्षा सोलीह यांनी व्यक्त केली. मोदी यांनी या आमंत्रणाचा स्वीकार केला.  

 

B.Gokhale/ R.Aghor/P.Malandkar

 

 


(Release ID: 1553154) Visitor Counter : 138


Read this release in: English