पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी त्यांच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन सल्लागार परिषदेच्या सदस्यांशी साधला संवाद

Posted On: 13 NOV 2018 4:24PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन सल्लागार परिषदेच्या सदस्यांशी संवाद साधला. ही परिषद विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनाशी संबंधित सर्व बाबींवर सल्ला देते तसेच या मुद्यांवर पंतप्रधानांच्या कल्पनेची अंमलबजावणी करण्यावर देखरेख ठेवते.

विज्ञान आणि तंत्रज्ञान या प्रमुख क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संशोधनाला चालना देण्यासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांबाबत परिषदेच्या सदस्यांनी पंतप्रधानांना अवगत केले.

विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधनाचा लाभ सामान्य माणसापर्यंत पोहोचायला हवा, त्यांच्या दैनंदिन समस्या सुटायला हव्यात तसेच देशातील जनतेचे जगणे सुलभ व्हावे यावर पंतप्रधानांनी भर दिला. यासंदर्भात त्यांनी परिषदेच्या सदस्यांना शैक्षणिक संस्था, संशोधन आणि विकास प्रयोगशाळा तसेच विविध सरकारी विभाग यांच्यात मजबूत संपर्क स्थापन करण्याच्या दिशेने काम करायचे आवाहन केले. शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमधील संकुचितपणा दूर करण्याच्या गरजेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

शालेय विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक गुणवत्तेचा शोध घेऊन त्याला खतपाणी घालणारी योग्य यंत्रणा विकसित करून जिल्हा आणि प्रादेशिक स्तरावर अटल टिंकरिंग प्रयोग शाळांशी त्यांना जोडण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. कृषी उत्पन्न वाढवणे, सिकल सेल पंडूरोग सारख्या गंभीर आणि जनुकीय आजारांवर उपाय, कचरा व्यवस्थापन आणि सायबर सुरक्षा यांसारख्या संशोधनाच्या प्राधान्य क्षेत्रांचा त्यांनी यावेळी उल्लेख केला.

पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रा. के. विजय राघवन, परिषदेचे सदस्य आणि वरिष्ठ सहकारी अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor



(Release ID: 1552600) Visitor Counter : 81


Read this release in: English