दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

"आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (आयटीयू) परिषदेचा सदस्य म्हणून भारताची 4-वर्षांच्या कालावधीकरीता (2019 -2022) निवड": मनोज सिन्हा

Posted On: 06 NOV 2018 5:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली 6 नोव्हेंबर 2018

आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (आयटीयू) परिषदेचा सदस्य म्हणून भारताची 2019  ते 2022 अशा 4-वर्षांच्या  कालावधीकरीता पुन्हा निवड झाली आहे. दुबई,संयुक्त अरब अमीरात येथे चालू असलेल्या आयटीयू प्लेनिपोटेन्टरीरी कॉन्फरन्स 2018 दरम्यान या परिषदेच्या निवडणुका आयोजित करण्यात आल्या होत्या.

165 मते मिळवून आशिया-ऑस्ट्रेलेशिया क्षेत्रामधून परिषदेसाठी निवडलेल्या 13 देशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि जागतिक पातळीवर परिषदेसाठी निवडलेल्या 48 देशांमध्ये भारत आठव्या  क्रमांकावर आहे. आयटीयूमधील 193 सदस्य देशामार्फंत परिषदेच्या प्रतिनिधींची निवड  केली जाते.

या प्रगतीवर भाष्य करताना, केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्री मनोज सिन्हा म्हणाले, "पुन्हा एकदा आयटीयू परिषदेचे सदस्य म्हणून भारताला बघून आम्हाला आनंद होतो आहे. जागतिक स्तरावर दूरसंचार आणि  माहिती, संवाद व तंत्रज्ञान क्षेत्रात आमचा देश जी भूमिका बजावत आहे त्यालाच ही  अधिमान्यता आहे. "

1869 पासून भारत आयटीयूचा सक्रिय सदस्य असून जागतिक समुदायातील दूरसंचार विकास आणि प्रसार  यासाठी प्रामाणिकपणे पाठींबा देत आहे. 1952पासून देश आयटीयू परिषदेचा नियमित सदस्य म्हणून कार्यरत आहे आणि या क्षेत्रातील सदस्य देशामधील  आपसातील योगदान सुसंगत करण्यासाठी त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.भारताने सदैव समानता व सर्वसमंत्तीच्या भूमिकेचा आदर केला आहे.

" विश्वाला एक राष्ट्र आणि ज्ञानाधिष्ठीत समाज म्हणून ओळख  निर्माण करण्याच्या आयटीयूच्या स्वप्न व  दृष्टीमध्ये भारतही सहभागी आहे  .नवी दिल्ली येथे आयटीयू दक्षिण आशिया क्षेत्र कार्यालय आणि तंत्रज्ञान इनोव्हेशन सेंटर स्थापन करण्यासंदर्भात  आयटीयूद्वारे नुकतेच घेण्यात आलेले निर्णय हे आयटीयू सोबत आमची मजबूत भागीदारी दर्शवितात. जानेवारी, 2019 पर्यंत ही केंद्रे कार्यान्वित करण्याचे आमचे लक्ष्य आहे. " असेही  श्री सिन्हा म्हणाले.

***  

D.Wankhede



(Release ID: 1552028) Visitor Counter : 84


Read this release in: English