उपराष्ट्रपती कार्यालय

12 व्या एएसईएम शिखर परिषदेसाठी उपराष्ट्रपती बेल्जियमच्या दौऱ्यावर

Posted On: 17 OCT 2018 2:06PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर 2018

 

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आज बेल्जियमच्या दौऱ्यावर रवाना झाले. ब्रुसेन्स येथे 12वी (एएसईएम) आशिया-युरोप शिखर परिषद होत आहे. या परिषदेला नायडू उपस्थित राहणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या परिषदेसाठी ‘ग्लोबल पार्टनर्स फॉर ग्लोबल चॅलेंजेस’ अशी मध्यवर्ती संकल्पना निश्चित करण्यात आली आहे.

आशिया आणि युरोप यांच्या दरम्यान व्यापार, गुंतवणूक, सुरक्षा आणि पर्यटन यासारख्या विषयांवर चर्चा करण्यासाठी या द्वैवार्षिक परिषदेमुळे एक चांगले व्यासपीठ मिळते. यंदाच्या वर्षी या परिषदेत जवळपास 51 देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यावर्षी हवामान बदल तसेच वाढता दहशतवाद यासारख्या महत्वपूर्ण विषयांवर विस्तृत चर्चा परिषदेत होईल, अशी अपेक्षा आहे.

ऑगस्ट 2017 मध्ये व्यंकय्या नायडू यांनी उपराष्ट्रपतीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते पहिल्यांदाच अशा प्रकारच्या बहुराष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

या दौऱ्यात उपराष्ट्रपती इतरही विविध कार्यक्रमांच्या सत्रांमध्ये सहभागी होणार आहेत. तसेच ऑस्ट्रिया, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड आणि इतर काही देशांच्या प्रमुख नेत्यांशी द्विपक्षीय चर्चाही करणार आहेत.

नायडू बेल्जियममधल्या भारतीयांशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम अँटरेपमधल्या जैन सांस्कृतिक केंद्रामध्ये होणार आहे. तसेच अँटरेपमध्ये उभारण्यात आलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला नायडू पुष्पांजली अर्पण करणार आहेत. हा दौरा संपवून उपराष्ट्रपती दि. 21 ऑक्टोबर रोजी मायदेशी येणार आहेत.

 

N.Sapre/S.Bedekar/P.Kor



(Release ID: 1549934) Visitor Counter : 86


Read this release in: English