पंतप्रधान कार्यालय

चौथ्या औद्योगिक क्रांती केंद्राच्या शुभारंभी पंतप्रधानांचे संबोधन

Posted On: 12 OCT 2018 9:44PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2018

 

जागतिक आर्थिक मंचाचे अध्यक्ष श्री बोर्गे ब्रेंडे, उद्योग जगतातील सन्माननीय सदस्य, देशविदेशातून आलेले इतर अतिथी आणि माझ्या सहकाऱ्यांनो,

या विशेष कार्यक्रमात आल्याबद्दल मी आपणा सर्वांना अभिवादन करतो, आभार व्यक्त करतो. जागतिक आर्थिक मंचाने भारतातील पहिल्या आणि जगातील चौथ्या औद्योगिक क्रांती केंद्राच्या शुभारंभी माझे स्मरण करावे, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.

मित्रहो ‘इंडस्ट्री फोर पॉइंट झीरो’ ऐकल्यानंतर पहिल्यांदा असे वाटते की आपण उद्योगाविषयी बोलतो आहोत. मात्र याचे जे घटक आहेत, त्यांची जी ताकत आहे, त्यात मानवी आयुष्याचे वर्तमान आणि भवितव्य बदलण्याची क्षमता आहे.

आज जागतिक स्तरावर ज्याप्रमाणे विघटनकारी आणि परस्परांशी जोडलेल्या तंत्रज्ञानांचा उदय होत आहे, तो अभूतपूर्व असा आहे. वेगवेगळ्या तंत्रज्ञानांचे परस्परांतले हे सामंजस्य-समन्वय चौथ्या औद्योगिक क्रांतीचा आधार ठरत आहे. या तंत्रज्ञानाचे विविध पैलू संपूर्ण जगभरात, प्रत्येक स्तर, प्रत्येक समाजात राहणाऱ्या लोकांचे जीवनमान, काम करण्याची पद्धत, संवादाची पद्धत, यात सातत्याने बदल घडवून आणत आहेत.

अशा परिस्थितीत सॅन फ्रान्सिस्को, टोकीयो आणि बीजिंगनंतर आता भारतामध्ये हे महत्त्वाचे केंद्र सुरू झाल्यामुळे भविष्यातील अनंत शक्यतांचे दरवाजेही खुले झाले आहेत. या उपक्रमाबद्दल मी जागतिक आर्थिक मंचाचे मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो

चौथ्या जागतिक क्रांतीचा अशाप्रकारे विस्तार होतो आहे, ही क्रांती जगभरात आपला प्रभाव कशाप्रकारे दाखवत आहे, याची आपणा सर्वांना कल्पना आहे. आपण यातील तज्ञ आहात, यातील प्रत्येक तपशील आपण जाणता.

याचे महत्त्व ओळखून आणि त्यापुढे एक पाऊल टाकत आज ही क्रांती भारतासाठी महत्त्वाची का आहे, या क्रांतीचा पुरेपूर लाभ घेण्याचे सामर्थ्य भारताकडे कशाप्रकारे पुरेपूर आहे आणि भारत याच्याशी संबंधित सर्व तंत्रे संपूर्ण क्षमतेने कशाप्रकारे लागू करू शकतो, हे जाणून घेणे अतिशय आवश्यक आहे.

Artificial Intelligence, Machine Learning, Internet of Things, Block chain, Big Data आणि अशा अनेक विविध नव्या तंत्रज्ञानांमध्ये भारताला विकासाची नवी शिखरे गाठून देण्याची, रोजगाराच्या लाखो नव्या संधी निर्माण करण्याची आणि देशातील प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य अधिक चांगले घडवण्याची क्षमता आहे.

भारताची युवा उर्जा, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताचा कित्येक दशकांचा अनुभव, स्टार्ट अप्सची विकसित यंत्रणा या क्षमतेत अधिक भर घालते.

आज जेव्हा भारत नवभारताच्या संकल्पासह आगेकूच करत आहे, आपले सामर्थ्य आणि  स्रोत सक्षम करत आहे, अशा वेळी भारताला चौथ्या औद्योगिक क्रांतीची साथ मिळणे, हे सोन्याहून पिवळे आहे.

भारत याकडे केवळ उद्योगातील परिवर्तन म्हणून नाही तर सामाजिक परिवर्तनाचा आधार म्हणूनही पाहत आहे. उद्योग हा एक मंच आहे, उत्पादनाचा, एक प्रक्रिया आहे आणि तंत्रज्ञान हे एक साधन आहे. मात्र समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत, शेवटच्या व्यक्तीचे आयुष्य सोपे करणे, त्यात बदल घडवून आणणे, हे त्याचे अंतिम लक्ष्य आहे.

मित्रहो ‘इंडस्ट्री फोर पॉइंट झीरो’ मध्ये मला अशी क्षमता दिसते आहे, जी सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेशी संबंधित अनेक समस्या कायमच्या संपवून टाकेल, भारतामध्ये एक फार मोठा सकारात्मक बदल घडवून आणेल.

‘इंडस्ट्री फोर पॉइंट झीरो’ चा वापर केल्यामुळे भारतातील दारिद्र्य समाप्त करता येईल, असा मला दृढ विश्वास वाटतो. देशातील गरीब, वंचित वर्गाचे, समाजातील उपेक्षित वर्गाचे आयुष्य अधिक चांगले करता येईल. भारतासारख्या विशाल आणि विविधतेने भरलेल्या देशात वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर काम करण्याची आवश्यकता आहे. त्या कामी ही क्रांती आपल्यासाठी सहायक ठरू शकेल.

मित्रहो, पायाशिवाय कोणतीही इमारत उभी राहात नाही. ‘इंडस्ट्री फोर पॉइंट झीरो’ चे यशही याच बाबीवर अवलंबून आहे की देशात यासाठी आवश्यक तो पाया तयार आहे, तो सर्वात दृढ आहे. गेल्या चार-साडेचार वर्षांमध्ये आमच्या सरकारने चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी भारताला सज्ज करण्यात मोठे यश मिळवले आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या आत्मविश्वासामागे, या उत्साहामागे जे कारण आहे, ते मी आपल्यासमोर सविस्तर सांगू इच्छितो.

बंधू आणि भगिनींनो, ‘इंडस्ट्री फोर पॉइंट झीरो’ मधून केवळ एक शब्द काढून टाकला, तर त्यात फारसा अर्थ उरणार नाही. तो शब्द आहे डिजिटल. मात्र हाच शब्द आज बदलत्या भारताची सर्वात मोठी ओळख आहे. डिजिटल इंडिया मोहिमेने भारताच्या गावागावात डेटा पोहोचवला आहे.

गेल्या चार-साडेचार वर्षांमध्ये देशाच्या दूरसंचार संबंधित पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी सरकारने आधीच्या तुलनेत सहा पट जास्त गुंतवणूक केली आहे.

मित्रहो,

  • 2014 मध्ये भारतातील 61 कोटी लोकांकडे डिजिटल ओळख होती. आज भारतातील 120 कोटी पेक्षा जास्त लोकांकडे आधार कार्ड आहे, स्वतःची डिजिटल ओळख आहे
  • 2014 मध्ये भारतामध्ये आठ लाख पेक्षा कमी मोबाईल आधारित ट्रान्सीव्हर स्थानके होती, आज त्यांची संख्या18 लाखापेक्षा जास्त आहे.
  • 2014 मध्ये भारतात Overall Tele-Density 75 टक्के होती, आज त्यात वाढ होऊन ती 93 टक्के पेक्षा जास्त झाली आहे.
  • 2014 मध्ये मोबाईल वर इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या 23 कोटी होती. आज या संख्येत दुपटीपेक्षा जास्त वाढ होऊन ती पन्नास कोटी पर्यंत पोहोचली आहे.
  • भारतात गेल्या चार वर्षात इंटरनेटची व्याप्ती 75 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे. ह्या वर्षांमध्ये भारत सरकारने तीन लाख किलोमीटरपेक्षा जास्त ऑप्टिकल फायबरचे जाळे विस्तारले आहे.

याचाच परिणाम असा झाला आहे की 2014 पूर्वी देशाच्या केवळ 59 पंचायती ऑप्टिकल फायबरने जोडल्या गेल्या होत्या, आज एक लाख पेक्षा जास्त पंचायतींपर्यंत ऑप्टिकल फायबर पोहोचले आहे. लवकरच आम्ही देशातील सर्व अडीच लाख पंचायती, ऑप्टिकल फायबरच्या जाळ्याने जोडण्याचे उद्दिष्ट साध्य करू.

मित्रहो, 2014 मध्ये देशात केवळ 83 हजार  कॉमन सर्विस सेंटर होती, आज भारतात तीन लाखापेक्षा जास्त कॉमन सर्विस सेंटर कार्यरत आहेत. देशाच्या ग्रामीण भागांमध्ये, दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांसाठी केंद्र सरकार बत्तीस हजार पेक्षा जास्त वाय-फाय हॉटस्पॉट प्रदान करण्यावर काम करत आहे.

डिजिटल इंडिया मोहिमेने गेल्या चार वर्षांमध्ये भारतीयांचे जीवनमान बदलून टाकले आहे. मित्रहो, ‘इंडस्ट्री फोर पॉइंट झीरो’ मुळेच...

  • 2014 मध्ये एक भारतीय नागरिक जितका मोबाईल डेटा वापरत असे, आज त्याच्या 30 पट पेक्षा जास्त मोबाइल डेटा वापरला जात आहे.
  • आणखी एक लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे आज जगात सर्वात जास्त मोबाईल डेटा भारतात वापरला जात आहे. त्याचप्रमाणे जगात सर्वात जास्त स्वस्त डेटा भारतातच उपलब्ध आहे.
  • याचे कारण असे की 2014 सालानंतर भारतामध्ये मोबाइल डेटाचे दर नव्वद टक्क्यांपेक्षा कमी झाले आहेत.

मित्रहो, विकासाची अशी गाथा आपल्याला जगातील कोणत्याही देशात ऐकायला मिळणार नाही. भारताची ही यशोगाथा अगदीच अनपेक्षित अशी आहे.

आज भारत हा जगातील सर्वात विशाल डिजिटल पायाभूत सुविधा असणाऱ्या देशांपैकी एक आहे. आधार Payments Interface अर्थात  UPI, e-Sign, e-National Agriculture Market अर्थात  e-NAM, Government e-Marketplace अथवा GeM (जेम), Digilocker अशा Unique Interfaces मुळे भारत Artificial Intelligence माध्यमातून तंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्व म्हणून उदयाला येत आहे. यामुळे जास्तीत जास्त लोक वेगाने डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडले जात आहेत.

भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांनी देशातील स्टार्ट अप्सना सुद्धा या मंचावर नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याची संधी दिली आहे. ही नाविन्यता, देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला अधिक सक्षम करण्याचे काम करत आहे.

मित्रहो, भारतात कृत्रिम बुद्धीमत्तेसंदर्भात संशोधनाशी संबंधित मजबूत यंत्रणा तयार करण्यासाठीचे राष्ट्रीय धोरण काही महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आले आहे. सबका साथ - सबका विकास हा दृष्टिकोन साध्य करताना याला "आर्टिफिशिअल इंटेलिजन्स फॉर ऑल असे नाव देण्यात आले आहे.

संशोधनासाठी यंत्रणा कशा प्रकारे तयार केली जाईल, हे स्वीकारण्याला प्रोत्साहन दिले जाईल, कौशल्यप्राप्ती समोरील आव्हानांचा मुकाबला केला जाईल, अशा सर्व महत्त्वपूर्ण विषयांवर यात सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. कृषी, आरोग्य आणि शिक्षण अशा भारतीय जनमानसाशी थेट जोडल्या गेलेल्या क्षेत्रांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. या क्षेत्रांमध्ये सरकारने अनेक प्रायोगिक तत्वावरील प्रकल्प सुरू केले आहेत. याच संदर्भात मोबिलिटी विषयक एक मोठी परिषद सुद्धा नुकतीच झाली.

मित्रहो, मुंबईमधील डब्ल्यू ई एफ चे हे नवे केंद्र, ही शृंखला अधिक सक्षम करण्याचे काम करेल. हे केंद्र सबका साथ - सबका विकास साध्य करण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांसाठी प्रेरक आणि पूरक पद्धतीने काम करेल.

हे केंद्र नवनव्या तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने सरकारी धोरणे निश्चित करण्यास मदत करेल. हे केंद्र भारतातील सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र तसेच विविध राज्य सरकारांच्या कामांमध्ये नवी प्रेरणा देणे तसेच ‘इंडस्ट्री फोर पॉइंट झीरो’ च्या विविध पैलूंना पुढे घेऊन जाण्यास मदत करेल.

मला सांगण्यात आले आहे की महाराष्ट्र सरकारबरोबर या केंद्राने ड्रोन आणि इंटरनेट ऑफ थिंग्स च्या माध्यमातून शासकीय सेवा सुधारण्यासाठी एका प्रकल्पावर काम सुरू केले आहे. याबद्दल मी येथे उपस्थित महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो. आगामी काळात प्रत्येक राज्यात अशा प्रकारचे अनेक प्रकल्प सुरू होतील, अशी आशा मला वाटते.

मित्रहो, भारतामध्ये ‘इंडस्ट्री फोर पॉइंट झीरो’ च्या सक्षमीकरणामुळे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या विस्तारामुळे,

एकीकडे देशातील लोकांना आरोग्याशी संबंधित अधिक चांगल्या सुविधा मिळतील तर दुसरीकडे उपचारांवर होणारा खर्च कमी होईल.

कृषी क्षेत्रात याचा विस्तार झाल्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांचे धान्याचे उत्पादन वाढेल, अन्नधान्याची नासाडी थांबेल तर दुसरीकडे त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. हे तंत्रज्ञान भारतीय शेतकऱ्यांना हवामान, शेती आणि पेरणीच्या चक्राबाबत योग्य निर्णय घेण्यास मदत करू शकते.

स्मार्ट शहरे आणि भारतात एकविसाव्या शतकातील पायाभूत सुविधा सक्षम करण्याबरोबरच देशातील प्रत्येक गाव जोडण्याच्या कामी हे सहाय्यक ठरेल.

स्मार्ट मोबिलिटी पासून वाहतुकीपर्यंत आणि शहरांमधील वाहतूक कोंडीच्या समस्येतून बाहेर काढण्याच्या दृष्टीने नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारताला सहाय्य मिळू शकते.

आपला देश विविध भाषांनी समृद्ध आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने विविध बोली आणि भाषांमधील विचारांची देवाण-घेवाण अधिक सोपी होऊ शकते.

त्याचप्रमाणे भारतातील माझ्या दिव्यांग बंधू भगिनींचे सामर्थ्य अधिक वाढविण्यासाठी, त्यांच्या आयुष्यातील अडचणी कमी करण्यात सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स फार मोठी भूमिका बजावणार आहे. त्याचे अनेक उपयोग आहेत.

मित्रहो, या सर्व प्रमुख विषयांमध्ये वेगवेगळ्या स्तरांवर भारतात काम सुरू झाले आहे. या कामांमध्ये   ‘Solve for India, Solve for the World’ हे लक्ष्यही समाविष्ट आहे.

आम्ही ‘local solution पासून Global application’ ज्या दिशेने प्रवास करत आहोत. यात आणखी एका तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची आहे, ते म्हणजे Blockchain तंत्रज्ञान. हे तंत्रज्ञान Minimum Government Maximum Governance हा सरकारचा दृष्टीकोन योग्य प्रकारे आत्मसात करते आणि त्याला अनुसरून काम करते.

याच्या मदतीने स्वयम् प्रशासन आणि स्वयम् प्रमाणन या बाबींचाही विस्तार केला जातो आहे आणि भविष्यातील संधींची चाचपणी केली जात आहे.

अनेक शासकीय प्रक्रिया आणि अडचणी याच्या सहाय्याने दूर करता येतील. या प्रक्रियांमध्ये सुधारणा केल्यामुळे पारदर्शकता वाढेल, भ्रष्टाचार कमी होईल, गुन्हे कमी होतील आणि भारताच्या नागरिकांचे आयुष्य सोपे करण्याच्या कामी याचा मोठा परिणाम दिसून येईल.

मित्रहो, Blockchain तंत्रज्ञानाचा विस्तार, भारताला उद्योग करण्यातील सुलभतेविषयक क्रमवारीत फार वरचे स्थान मिळवून देण्यास सक्षम आहे. सरकारच्या सर्व सेवा, नैसर्गिक साधन संपत्तीचे व्यवस्थापन, संपत्तीची नोंदणी, कंत्राटे, वीज जोडण्या अशी अनेक कामे याच्या सहाय्याने वेगाने करता येतील.

हे समजून घेत Blockchain संदर्भात राष्ट्रीय धोरण तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. यात मुंबईमधील डब्ल्यू ई एफ च्या नव्या केंद्राची मदत होणार आहे. भारत लवकरच आपल्या ड्रोन धोरणाची घोषणा करेल, अशी माहितीही मी आपणास देऊ इच्छितो.

मित्रहो जेव्हा पहिली औद्योगिक क्रांती झाली, तेव्हा भारत गुलामगिरीत होता. जेव्हा दुसरी औद्योगिक क्रांती झाली, तेव्हाही भारत गुलामगिरीत होता. जेव्हा तिसरी औद्योगिक क्रांती झाली, तेव्हा भारत स्वातंत्र्यप्राप्तीनंतर समोर आलेल्या आव्हानांचा मुकाबला करत होता, संघर्ष करत होता. मात्र आता एकविसाव्या शतकातील भारत बदललेला आहे.

मी आज पूर्ण विश्वासाने, आपल्या देशातील 130 कोटी लोकांच्या सामर्थ्यासह सांगतो आहे की भारत चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या लाभांपासून वंचित राहणार नाही. खरे तर मला असे वाटते की चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये भारताच्या योगदानामुळे संपूर्ण जग विस्मयचकित होणार आहे. हे योगदान अभूतपूर्व, अनपेक्षित, अकल्पित असे असणार आहे.

आमची विविधता, आमच्या लोकसंख्येचे सामर्थ्य, वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठा आणि डिजिटल पायाभूत सुविधा यांच्यात भारताला संशोधन आणि अंमलबजावणीचा जागतिक मंच करण्याची क्षमता आहे. भारतात होणाऱ्या नाविन्यतेचा लाभ संपूर्ण जगाला मिळेल, संपूर्ण मानवतेला मिळेल.

मित्रहो, आज या मंचावर मी आणखी एक महत्त्वाच्या विषयासंदर्भात माझे मत मांडू इच्छितो. काही लोकांना अशी काळजी वाटते की तंत्रज्ञानाच्या या बहरामुळे रोजगार कमी होईल. मात्र सत्य हे आहे की मानवी आयुष्याच्या ज्या पैलूंना आजवर आपण स्पर्शही केलेला नाही, त्यांची कवाडे ‘इंडस्ट्री फोर पॉइंट झीरो’ मुळे उघडणार आहेत. त्यामुळे कामाचे स्वरूप फार मोठ्या प्रमाणावर बदलणार आहे.

हेच वास्तव जाणून घेत भारत सरकार स्किल इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्टैंड अप इंडिया, अटल इनोवेशन मिशन असे उपक्रम राबवत आहे. आपल्या देशातील युवा वर्ग बदलणाऱ्या तंत्रज्ञानासाठी सज्ज असावा, यासाठी पूर्वतयारी सुरू आहे.

मित्रहो, दहा वर्षानंतर आपण कोठे असू, हे येथे उपस्थित कोणतीही व्यक्ती सांगू शकणार नाही. पाचवी औद्योगिक क्रांती किती दूर आहे, हे सुद्धा कोणीही सांगू शकणार नाही. यापूर्वीच्या तिन्ही औद्योगिक क्रांती प्रत्येकी सुमारे शंभर वर्षांच्या अंतराने आल्या होत्या, हे खरे आहे. मात्र चौथी क्रांती तीस-चाळीस वर्ष आधीच आपल्या आगमनाची चाहूल देते आहे, हे आपण पाहत आहोत.

मागची एक दोन दशके पाहिली तर त्या काळात असंख्य शोध लागले आणि ते लुप्त सुद्धा झाले. तंत्रज्ञानाने काळ संकुचित करून टाकला. ‘इंडस्ट्री फोर पॉइंट झीरो’ वरून ‘फाइव्ह पॉइंट झीरो’ व्हायला शंभर वर्षे घेणार नाही.

म्हणूनच भारत ‘इंडस्ट्री फोर पॉइंट झीरो’ बाबत इतका गंभीर आहे. आपले संपूर्ण सामर्थ्य एकवटण्याचा हाच काळ आहे. मला असे वाटते की आपण येत्या काही महिन्यांत भारतातच एक ‘इंडस्ट्री फोर पॉइंट झीरो’  पार्क स्थापन करावे.

मी आपणा सर्वांना, देशातील उद्योग जगताला, सर्व राज्य सरकारांना, समाजाला आणि उद्योजकांना आवाहन करतो की या क्रांतीमध्ये सोबत या, एकत्र या आणि ही क्रांती धरतीवर अवतरू द्या.

मित्रहो, आमचे सरकार खुल्या विचारांचे आहे. जो आराखडा तयार करायचा आहे, जे शिष्टाचार तयार करायचे आहेत, जे धोरण तयार करायचे आहे, नव्या भारताच्या हितासाठी, भारताच्या हितासाठी जे काही करायचे असेल, ते आम्ही करणार आहोत.

आपली प्रत्येक सूचना, आपल्या प्रत्येक अनुभवाचे आम्ही कायमच स्वागत करतो. सरकार नेहमीच तयार आहे, तत्पर आहे. यावेळी भारताची कोणतीही संधी हुकणार नाही, असा निश्चय आम्ही केला आहे.

मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना चौथ्या औद्योगिक क्रांती केंद्रासाठी अनेक शुभेच्छा देतो आणि माझे बोलणे येथेच थांबवतो.

अनेकानेक आभार!!!

 

N.Sapre/M.Pange/P.Kor



(Release ID: 1549831) Visitor Counter : 94


Read this release in: English