उपराष्ट्रपती कार्यालय

शांतता असेल तर प्रगती साध्य होईल-उपराष्ट्रपती


बंदुकीच्या गोळीपेक्षा मतपत्रिका श्रेष्ठ असल्याचे सिद्ध-उपराष्ट्रपती

Posted On: 15 OCT 2018 3:20PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2018

 

देशामध्ये शांतता असेल तर देश प्रगतीपथावरून वाटचाल करतो, भारताकडे संपूर्ण जग मोठ्या अपेक्षेने पाहत आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. ते आज राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयामध्ये आयोजित व्याख्यानात बोलत होते. भारताला एक विशिष्ट संस्कृती आहे. राष्ट्रीय मूल्य आहे. तसेच विशेष उद्दिष्टाकडे भारताची वाटचाल सुरू आहे, असेही नायडू यांनी यावेळी सांगितले. भारतीय संस्कृतीमध्ये ‘वसुधैव कुटुम्बकम्’ म्हणजे हे संपूर्ण विश्वच एक कुटुंब, एक परिवार आहे, असे मानले जाते. त्यामुळे प्रार्थना करताना आम्ही केवळ आमच्या देशात शांतता नांदावी, किंवा या पृथ्वीग्रहावरच्या मानवाचे कल्याण व्हावे इतका मर्यादित हेतु आमचा नसतो तर संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आम्ही प्रार्थना करतो, असेही उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले.

या भूतलावर सर्वांनी शांततेत, समाधानात रहावे. सर्वांचे अस्तित्व आम्हाला मान्य आहे. हिंसक विचार, हिंसक भावना आणि हिंसक कृती यांच्याशी फारकत घेतली तर सर्वांचीच प्रगती होऊ शकेल, असे आम्हाला वाटते. परंतु प्रत्यक्षात हिंसक कारवाया देशात घडतात. त्यामुळे आपल्या राष्ट्राच्या सुरक्षेसाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्याची आवश्यकता आहे. दहशतवाद, जातीयवाद, महिलांच्या विरोधात घडणारी हिंसाचार आणि इतरही विविध प्रकारांनी होणारा हिंसाचार कसा थांबवता येईल. याकडे लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे, असेही नायडू यांनी यावेळी नमूद केले.

शांतता आणि एकोप्याने वास्तव्य कसे करावे, याचे वेगळे शिक्षण देण्याची आज गरज निर्माण झाली आहे. सहानुभूती, अनुकंपा, सहिष्णुता आणि चांगलापणा हे गुण कसे वाढीस लागतील, यासाठी अभ्यासक्रम तयार करण्यात आले तर समाजात होणारा संघर्ष, विनाकारण घडवून आणला जाणारा हिंसाचार यांना आळा बसेल. समाजात सर्वांनी गुण्या-गोविंदाने राहून शांतता कायम ठेवण्याची तसेच एकमेकांशी सुसंवाद साधण्याची आवश्यकता आहे, असेही उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले.

 

N.Sapre/S.Bedekar/P.Kor


(Release ID: 1549715) Visitor Counter : 74
Read this release in: English