पंतप्रधान कार्यालय

7 ऑक्टोबर 2018 रोजी, डेस्टिनेशन उत्तराखंड: गुंतवणूकदार परिषद 2018 मध्ये पंतप्रधानांचे भाषण

Posted On: 07 OCT 2018 8:10PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2018

 

उत्तराखंडच्या राज्यपाल, बेबी रानी मौर्य जी, केंद्रीय मंत्रीमंडळातील माझे सर्व सहकारी, राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेन्द्र सिंह जी रावत, उत्तराखंड मंत्रिमंडळातील सर्व सदस्य, सिंगापूरचे माहिती आणि प्रसारण मंत्री एस. ईश्वरन जी, जपानचे आणि चेक रिपब्लिकचे राजदूत, देश-विदेशातून आलेले सर्व उद्योजक, बंधू आणि भगिनींनो...

बाबा केदारनाथांच्या छत्रछायेत चार धामांच्या पवित्रतेसाठी देवभूमी उत्तराखंडमध्ये देश-परदेशातून आलेल्या सर्व मित्रांचे स्वागत आहे. मला विश्वास आहे की, तुम्ही इथे भारताच्या आर्थिक परिस्थिती सोबतच हजारो वर्षांपासून चालत आलेली आमची सांस्कृतिक विविधता आणि समृद्धीचा अनुभव घ्याल आणि येथून एक नवीन उर्जा घेऊन परत जाल.

मित्रांनो, भारतात वेगाने आर्थिक आणि सामाजिक बदल होत असतानाच आपण उत्तराखंडच्या भूमीवर एकत्र आलो आहोत. देशात मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे. आपण नव भारताच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत. जगातील प्रत्येक मोठी संस्था हे म्हणत आहे की, आगामी दशकात भारत हा जागतिक विकासाचे मुख्य सुकाणू बनेल. आज भारताची अर्थव्यवस्था अधिक स्थिर झाली आहे. चालू आर्थिक तुट कमी झाली आहे, महागाई नियंत्रणात आहे. जगात सर्वाधिक वेगाने आमच्याकडे मध्यमवर्ग पसरत आहे. 80 कोटींहून अधिक युवकांची शक्ती ही, लोकशाही हित, आकांक्षा आणि सामर्थ्याचेप्रतीक आहे.

मित्रांनो, आज भारतात ज्या वेगाने आणि कौशल्याने आर्थिक सुधारणा होत आहे,ती अभूतपूर्व आहे. मागील दोन वर्षांतच केंद्र आणि राज्य सरकारांनी दहा हजारांहून अधिक चांगली पावले उचलली आहेत. यामुळेच भारताने व्यापार सुलभीकरणात 42 गुणांची सुधारणा केली आहे. या सुधारणा प्रक्रियेत आम्ही 1400 हून अधिक कायदे रद्द केले आहेत. याशिवाय भारतात करप्रणालीत देखील सुधारणा केली आहे. कर-संबंधित बाबींचे समाधान अधिक पारदर्शक आणि वेगवान करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

नादारी आणि दिवाळखोरी कायद्यामुळे व्यवसाय करणे सुलभ झाले आहे, बँकिंग व्यवस्था देखील मजबूत झाली आहे. जीएसटीच्या रुपात भारताने, स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठा कर सुधार केला आहे. जीएसटीने देशाला एकच बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे आणि कर आधार वाढविण्यात मदत केली आहे.

आमचे पायाभूत विकास क्षेत्र देखील लक्षणीय गतीने पुढे जात आहे. गेल्या वर्षी भारतात सुमारे 10,000 किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आले होते. म्हणजे, सुमारे 27 कि.मी. लांबीचे रस्ते दररोज बांधले जात आहेत. हा वेग मागील सरकारपेक्षा दुप्पट आहे.

रेल्वेमार्गाचे बांधकाम दुप्पट वेगाने होत आहे. याशिवाय, अनेक शहरांमध्ये नवीन मेट्रो, जलद गती रेल्वे प्रकल्प, समर्पित ट्रेडकॉरिडोर देखील सुरू आहेत. 400 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने सरकार मार्गक्रमण करत आहे.

जर मला उड्डयन क्षेत्राविषयी बोलायचं असेल, भारतामध्ये या क्षेत्राचा विकास देखील जलद गतीने होत आहे. या विकासाला अधिक चालना देण्यासाठी देशात जवळजवळ 100 नवीन विमानतळ आणि हेलिपॅड बांधण्याचे काम सुरु आहे. उडान योजनेच्या माध्यमातून द्वितीय आणि तृतीय दर्जाच्या शहरादरम्यान विमान सेवा उपलब्ध करून देण्याची योजना सुरू आहे. भारतात 100 पेक्षा अधिक राष्ट्रीय जलमार्ग तयार करण्याचे काम देखील सुरु आहे.

मित्रांनो, याशिवाय आज प्रत्येकासाठी घर, सर्वांसाठी उर्जा, सर्वांसाठी स्वच्छ इंधन, सर्वांसाठी आरोग्य, सर्वांसाठी बँकिंग, अशा अनेक वेगवेगळ्या योजना आपले लक्ष्य पूर्ण करण्याच्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करत आहेत. याचाच अर्थ आपण जर या सगळ्याचा एकत्रित विचार केला तर आज आपण हे म्हणू शकतो की, चौफेर परिवर्तनाच्या या युगात तुमच्यासाठी, देश-परदेशातील गुंतवणूकदारांसाठी, भारतामध्ये सर्वोत्तम वातावरण निर्मिती झाली आहे.

नुकतीच सुरु करण्यात आलेल्या ‘आयुष्‍मान भारत योजनेमुळे’ देखील भारतात वैद्यकीय क्षेत्रात गुंतवणुकीच्या खूप मोठ्या संधी निर्माण होत आहेत. यामुळे येत्या काळात द्वितीय आणि तृतीय श्रेणी दर्जाच्या शहरांमध्ये नवीन रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, पॅरामेडिकल मनुष्यबळ विकास संस्था उभारल्या जातील, पॅरामेडिकल पायाभूत विकास मजबूत होईल. तुम्ही कल्पना करू शकता की आयुषमान भारत योजने अंतर्गत देशातल्या 50 कोटी नागरिकांना, त्यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य विम्याची हमी मिळाली आहे.म्हणजेच अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोची जी एकूण लोकसंख्या आहे त्याहून जास्त लोकांना याचा फायदा होईल. संपूर्ण युरोपची जी लोकसंख्या आहे त्याहून अधिक लोकांना याचा लाभ मिळेल. आता हे फायदे देण्यासाठी किती रुग्णालयांची आवश्यकता आहे, किती डॉक्टरांची गरज आहे. किती मोठ्या गुंतवणुकीची शक्यता आहे आणि रुग्णांसाठी मोबदला देखील आतापासून तयार आहे आणि त्यामुळेच गुंतवणुकदारांसाठी देखील मोबदल्याची हमी आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये भारतात भांडवल गुंतवणूकीची एक मोठी संधी निर्माण झाली आहे, ज्यामुळे द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये उत्तम दर्जाची रुग्णालये  बांधण्याची शक्यता आहे.

मित्रांनो, आज भारतामध्ये पायाभूत सुविधांवर जितका खर्च केला जात आहे, यापूर्वी कधीही करण्यात आला नव्हता. या कारणांमुळे गुंतवणूकीच्या प्रचंड शक्यतांसोबातच रोजगाराच्या देखील लाखो नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. संभाव्य, धोरण आणि कार्यप्रदर्शन, ही प्रगतीची सूत्र आहेत.

नव भारत गुंतवणुकीचे सर्वात उत्तम ठिकाण आहे आणि उत्तराखंड हा यामधील एक महत्वाचा भाग आहे. उत्तराखंड देशातील त्या राज्यांपैकी आहे जे नव भारताच्या आमच्या लोकशाही हिताचे प्रतिनिधित्व करतात. आजचा उत्तराखंड तरुण आहे, आकांक्षानी भरलेला आहे, उर्जेने परिपूर्ण आहे. इथे असलेल्या प्रचंड शक्यतांना संधी मध्ये बदलण्यासाठी त्रिवेंद्र रावत यांचे सरकार जे प्रयत्न करत आहे ते आम्हाला काळत आहे. डेस्टिनेशन उत्तराखंडचा हा मंच याच प्रयत्नांची अभिव्यक्ती आहे. आता महत्त्वपूर्ण हे आहे की या मंचवर ज्या गोष्टी घडल्या, जो विश्वास प्रकट केला आहे, जो उत्साह प्रकट झाला आहे; त्याची त्वरित अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. ज्यामुळे उत्तराखंडच्या तरुण मित्रांना अधिकाधिक रोजगार मिळतील.

मित्रांनो, आदरणीय अटल बिहारी वाजपेयीजी यांनी जेव्हा उत्तराखंड निर्मितीचा निर्णय घेतला, तेव्हा परिस्थिती खूप कठीण होती. राजकीय अस्थिरते सोबतच चांगल्या भविष्यासाठी डोंगरा एवढी आव्हाने देखील आमच्या समोर होती. परंतु आज उत्तराखंड विकासाच्या रुळावर वेगाने धावत आहे.

गेल्या चार वर्षांत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना म्हणजेच एमएसएमईला, प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना मजबूत करण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. जास्तीत जास्त लघु उद्योगांना जास्त कर्ज, समर्थन भांडवल, व्याज अनुदान, कमी कर आणि नवकल्पना यावर लक्ष केंद्रित केले आहे. सरकारने नुकताच निर्णय घेतला आहे की आता एमएसएमईसाठी 1 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज फारच कमी वेळात मंजूर करण्यात येईल.

उत्तराखंड मध्ये कोणत्याही प्रकल्पाची मंजूरी घेण्यासाठी गुंतवणूकदारांना सरकारी कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागू नये म्हणून अनेक व्यवस्थां ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. परिवेश, परिवेश या नावाने ऑनलाईन वन मंजुरीसाठी एक पोर्टल कार्यरत आहे, यामुळे प्रक्रिया सुलभ आणि जलद झाली आहे.

गेल्या चार वर्षांत उत्तराखंडमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले आहेत. महामार्ग, रेल्वे, वायू मार्ग,प्रत्येक मार्गाने उत्तराखंडला जोडले जात आहे. प्रत्येक गावात पक्के रस्ते बांधले जात आहेत. इतकेच नाही, चार धाम बारमाही रस्ते आणि ऋषिकेष – कर्णप्रयाग रेल्वे मार्गाचे काम वेगाने चालू आहे.

मित्रांनो, चांगल्या कनेक्टिव्हिटीचा सर्वात मोठा फायदा इथल्या पर्यटन क्षेत्राला होणार आहे. निसर्गाने तर या राज्याला समृद्ध केले आहे, यासोबतच आस्था आणि संस्कृतीचे देखील वरदान मिळाले आहे. निसर्ग असो, साहस असो, संस्कृती असो किंवा मग योग, ध्यान असो, उत्तराखंड हे पर्यटनाचे एक संपूर्ण संकुल आहे, एक आदर्श ठिकाण आहे. आता तर उत्तराखंड सरकारने वेगळे पर्यटन धोरण तयार करून पर्यटनाला उद्योगाचा दर्जा दिला आहे. 18 वर्षांमध्ये पहिल्यांदाच 13 जिल्ह्यांमध्ये, पर्यटन स्थळ शोधून त्यांना विकसित करण्याची सुरवात करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील युवकांना नक्कीच रोजगाराच्या अनेक संधी मिळतील.

मित्रांनो, उत्तराखंड मध्ये सेंद्रीय राज्य बनण्याची पूर्ण क्षमता आहे. मला आनंद आहे की क्लस्टर आधारित जैविक शेती अंतर्गत, राज्याला जैविक राज्य बनवण्याच्या दिशेने काम चालू आहे. सेंद्रिय शेतीला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार देखील अनेक प्रयत्न करीत आहे.

यासोबतच देशात अन्नप्रक्रियेला देखील महत्त्व देण्यात येत आहे. अन्नप्रक्रिया क्षेत्राच्या मजबुतीकरणासाठी सरकारने अन्नप्रक्रिया क्षेत्रात 100 टक्के थेट परकीय गुंतवणूकीला मंजुरी दिली आहे. आज अन्न प्रक्रिया उद्योगात भारत जगातील अग्रगण्य देशांमध्ये आहे. मग ते अन्न उत्पादन असो, फळ आणि भाज्यांचे उत्पादन असो, दूध उत्पादन असो; अनेक क्षेत्रांत भारताचे स्थान जगातील पहिल्या तीनमध्ये आहे. आमच्या शेतकऱ्यांचे उत्पादन वाया जाऊ नये, त्यांना त्याचे जास्त फायदा मिळावेत, यासाठी अन्नधान्य प्रक्रियेवर आम्ही आमचे लक्ष केंद्रित केले आहे. यात देखील उत्तराखंडचे भविष्य सुवर्णमय आहे.

मी आपणा सर्वांना शेतीमध्ये, कृषी-व्यवसायात अधिक गुंतवणूक करण्याची विनंती करतो. कृषीमध्ये होणारे  मूल्यवर्धन, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यामध्ये, महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. आणि माझा विश्वास आहे की, जितकी जास्त गुंतवणूक, खाजगी गुंतवणूक कृषी क्षेत्रात करू, प्रक्रिया असो, मूल्यवर्धन असो, शीतगृह असो, गोदाम असो, वाहतूकसाठी खास प्रकारच्या गाड्या असतील, या सर्व गोष्टींमुळे भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्थेची शक्ती, आणि भारताच्या आर्थिक सामर्थ्याला एक नवीन आयाम देण्याची शक्यता आहे.

मित्रांनो, आज नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात भारत जागतिक नेतृत्व करण्याच्या दिशेने पुढे जात आहे. जगाचे नेतृत्व करण्याची शक्ती आज भारतात आहे. आम्ही निश्चित केले आहे की, 2030 पर्यंत आमची 40 टक्के वीज ही बगैर जीवाश्म इंधन आधारित स्रोतांपासून निर्माण होईल. एवढेच नाही तर, 2022 ला जेव्हा भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण होतील, तेव्हा 175 जीडब्ल्यू नवीकरणीय उर्जेचे लक्ष्य समोर ठेवून आम्ही पुढे मार्गक्रमण करत आहोत. यामध्ये सौर ऊर्जेची भूमिका महत्वपूर्ण असणार आहे. आंतरराष्ट्रीय सौर युती म्हणजे आयएसएच्या मागेही हीच संकल्पना आहे. जगाच्या उर्जेची गरजदेखील पूर्ण झाली पाहिजे आणि पर्यावरण देखील सुरक्षित राहिले पाहिजे, यासाठी आमचा एकमेव मंत्र आहे- एक विश्व, एक सूर्य, एक ग्रिड. उत्तराखंडमध्ये सुद्धा पुनर्नवीकरणीय ऊर्जेचा प्रसार करण्यासाठी राज्य सरकार सतत काम करत आहे. हाइडल पॉवर म्हणजेच जल ऊर्जा या राज्याची ताकद आहे, आता यात सौर ऊर्जेच्या शक्तीची साथ मिळाल्यामुळे, उत्तराखंडमध्ये अतिरिक्त ऊर्जा राज्य बनण्याची क्षमता आहे. उत्तराखंड भारताला ऊर्जावान बनवू शकतो, इतकी क्षमता उत्तराखंडमध्ये आहे.

मित्रांनो, गेल्या चार वर्षांत मेक इन इंडिया एक खूप मोठा ब्रँड बनला आहे. आमचा आग्रह आहे की, मेक इन इंडिया, केवळ भारतासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी असावे. जगाने आमचे हे आमंत्रण स्वीकारले आहे, ज्यामुळे माहिती तंत्रज्ञानाबरोबरच आता इलेक्ट्रॉनिक उत्पादनात देखील भारत एक मुख्य केंद्र बनत आहे. आज जगातील सर्वात मोठा मोबाइल फोन उत्पादन उद्योग, त्याच्याबरोबर 120 पेक्षा अधिक कारखाने भारतात कार्यरत आहेत. जगातील अनेक मोठ्या ब्रँड आज मेक इन इंडियाचा भाग आहेत.

यासोबतच ऑटोमोबाइल क्षेत्रात देखील भारत वेगाने प्रगती करत आहे. या कार्यक्रमात जपान उत्तराखंडचा भागीदार आहे. मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की, जपानची कंपनी, जपानची उत्पादने; ती कार आज भारतात तयार होते आणि ती कार जपान आयात करते.

मित्रांनो, आज हा कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुम्हा सर्वांना या सर्व क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी, उत्तराखंड आणि नव भारताच्या विकास गाथेचा हिस्सा बनण्यासाठी तुम्हाला आमंत्रित करतो.

मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या दोन दिवसात ज्या करारांवर स्वाक्षऱ्या होतील, त्या करारांचा लाभ लवकरच मिळेल, आणि मला विश्वास आहे की भारताच्या प्रगतीमध्ये आमच्या राज्यांच्या कमाल क्षमतेचा वापर केला तर , देशाच्या या विकास यात्रेला जगातील कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही. आणि ही आनंदाची बाब आहे की आज राज्यांदरम्यान निकोप स्पर्धा सुरू झाली आहे. प्रत्येक राज्य दुसऱ्या राज्यापेक्षा पुढे जाऊ इच्छितात, नवनिर्मित करू इच्छितात. आपल्या राज्यांच्या क्षमतांच्या आधारे करू इच्छितात आणि जेव्हा राज्य आपल्या क्षमतांचा विचार करून कार्य करतात तेव्हा ते कधीच मागे राहत नाहीत यावर माझा विश्वास आहे. जगातील कित्येक देशांपेक्षा आमच्या राज्यांची ताकत अधिक आहे, आमच्या राज्यांचे सामर्थ्य अधिक आहे. जगातील कित्येक छोट्या देशांच्या तुलनेत आमच्या राज्यांकडे अधिक क्षमता आहे.

प्रत्येक राज्याने स्वप्न बघितले पाहिजे, मला चांगले लक्षात आहे मी जेव्हा पहिल्यांदा गुजरातचा मुख्यमंत्री झालो, तो दिवस देखील ७ ऑक्टोबर होता, 2001, तेव्हा तर माझ्याकडे अनुभव देखील नव्हता, सरकार काय असते, मला काही माहित नव्हते, मी कोणते कार्यालय पहिले नव्हते, अगदी नवखा होतो. पत्रकार आले, आणि माझ्यावर प्रश्नांचा भडीमार सुरु केला. मी अशी काही तरी चूक करावी, असे काहीतरी उत्तर द्यावे जेणेकरून मुख्यमंत्री म्हणून माझ्या कामाला सुरवातच होणार नाही, खूप प्रयत्न सुरु होते. तेव्हा मला विचारले की, तुम्ही गुजरातचा विकास करू इच्छिता, तुमचा आदर्श कोण आहे, कोणाला बघून तुम्ही विकास करू इच्छिता. सर्वसाधारणपणे जेव्हा असा प्रश विचारला जातो तेव्हा लोकांना वाटते की उत्तर येईल अमेरिके सारखा विकास करू इच्छितो, इंग्लंड सारखा विकास करू इच्छितो. मी त्यांना वेगळे उत्तर दिले, मी सांगितले मी याला दक्षिण कोरिया सारखा बनवू इच्छितो. तेव्हा त्यांना काही माहित नव्हते. मग मी सांगितले, तुमचा कॅमेरा बंद करा, मी आरामात समजावतो. मी सांगितले गुजरातची लोकसंख्या दक्षिण कोरिया इतकी आहे. तिथला समुद्र किनारा, आपला समुद्र किनारा, तिथला विकास यात्रेचा नकाशा, इथला विकास यात्रेचा नकाशा, याचा मी सखोल अभ्यास केला आहे, त्यानंतर मला असे वाटते की, आपण त्याच मार्गावर चाललो तर आपण पुढेच चालत राहू, थांबणार नाही. 

मला माहित आहे की, भारताच्या प्रत्येक राज्यात ही शक्ती आहे. ते जगाच्या अशा अनेक देशांचा सामना करून पुढे जाऊ शकतात. जर भारतातील एक-एक राज्य या शक्तीसह पुढे जाईल, आमच्या तरुणांमध्ये ती शक्ती आहे,ते सामर्थ्य आहे.

रशियाचे राष्ट्रपती नुकतेच भारत दौऱ्यावर आले होते, आधी आम्ही एक वेगळा कार्यक्रम आयोजित केला. तिथल्या एका शैक्षणिक संस्थेवर त्यांचे खूप प्रेम आहे, मला दाखवायला घेऊन गेले होते. तेव्हा मी त्यांना विनंती केली होती की, त्या मुलांना एकदा भारतात घेऊन या. आणि मी सांगितले, माझी इच्छा आहे की, भारतातील मुलांना देखील मी तुमच्या कडे पाठवावे. तेव्हा ते यावेळी 20 मुलांना घेऊन आले होते. भारतातील मुले आणि त्याची मुले, 20-20 मुले, 5-6 दिवस एकत्र काम केले. आणि पाच-सहा दिवसांच्या आत-रशियन बुद्धी आणि भारतीय बुद्धीच्या मुलांनी एकत्र येवून अशा काही आश्चर्यकारक गोष्टी बनवल्या की , मी आणि रशियाचे राष्ट्रपती त्या पाहून आश्चर्यचकित झालो. किती सामर्थ्य आहे आमच्या मुलांमध्ये. त्यांना संधी मिळायला पाहिजे, त्यांना वाव मिळाला पाहिजे. आज उत्तराखंडने या कार्यात एक पाऊल उचलले आहे..

वयाचं 18 वं वर्ष खूप महत्वाचे असते. उत्तराखंड चिर-पुरातन आहे, परंतु उत्तराखंड सरकारचे वय 18 वर्ष आहे. 18व्या वर्षाची ऊर्जा, 18व्या वर्षाची स्वप्ने, 18 व्या वर्षात काहीतरी नवीन करून दाखवण्याचे उदिष्ट अद्भुत असते. या 18 व्या वर्षाला वाया जाऊ न देणे हे आता उत्तराखंडचे काम आहे, ही वेळ खूप मोलाची आहे.

आर्थिक विकासाच्या जगात विशेष आर्थिक क्षेत्र, सेझ, हे आम्ही अनेक दशकांपासून ऐकत आहोत. पण उत्तराखंडमध्ये एक वेगळा सेझ आहे. शतकांपासून आमच्या ऋषि-मुनींच्या तपस्येमुळे, गंगा मातेमुळे, देवाधिदेव हिमालय मुळे आहे आणि ते असे स्थान आहे आध्यात्मिक आर्थिक क्षेत्र आणि या विशेष आर्थिक क्षेत्रापेक्षा या आध्यात्मिक आर्थिक क्षेत्राचे सामर्थ्य लाखो पटींनी अधिक आहे. उत्तराखंडने यावर देखील लक्ष केंद्रित करून आपल्या योजनांचा विस्तार आणि विकास करण्याची आवश्यकता आहे.

मला विश्वास आहे की रावत जी यांच्या नेतृत्वाखाली हे 18 वर्षांचे राज्य सरकार, 18 वर्षाच्या या उर्जेने परिपूर्ण वयात नवीन उंची प्राप्त करेल आणि 2025 मध्ये जेव्हा तुम्ही 25वे वर्ष साजरे कराल तेव्हा तुमची सर्व स्वप्न पूर्ण झालेली असतील. एक शुभ सुरवात या महाभगीरथ प्रयत्नाने झाली आहे. माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि भारत सरकार कडून तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल, याची मी तुम्हाला खात्री देतो.

खूप खूप धन्यवाद !

 

B.Gokhale/S.Mhatre/P.Kor



(Release ID: 1549005) Visitor Counter : 113


Read this release in: English